कुणी मला विचारलं की मालिका, नाटक की चित्रपट ? तर माझं पहिलं उत्तर नेहमीच ‘नाटक’ हे असेल. कारण आजवर मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकाने मला खूप काही दिलंय. ती कोणतीही आर्थिक मदत नव्हती’ त्यामुळेच बहुतेक ती मदत अनमोल होती असे मला कायम वाटते. दरवेळी नाटक पाहिले, की एखादा तरी सकारात्मक बदल माझ्यात आणि माझ्या विचारांमध्ये होतोच, असे मला आजवरच्या अनुभवावरून वाटते आहे. हे असेच एक नाटक ज्याने माझ्या आयुष्यात मला एक लेखक म्हणून आणि एक माणूस म्हणून घडवले, जे नाटक पाहिल्यावर मी एखाद्या गोष्टीत आकंठ बुडणे म्हणजे काय हा अनुभव घेतला. ते नाटक म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’.
२० डिसेंबर २०१४. दुपारी ०४:३० वाजता बोरीवलीचा प्रयोग. दरवेळीप्रमाणे मी नाटक बघायला उत्सुकतेने आलो. नाटक पाहिलं आणि नाटकाचाच एक भाग होऊन गेलो. जेष्ठ नाटककार श्री. महेश एलकुंचवार यांच्या लेखणीतून आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनातून रंगमंचावर साकार झालेले ‘वाडा चिरेबंदी’ नाटक, आज विचाराल तर त्या दिवसापासून माझ्या जीवनाचा भाग झाले आहे. त्यातील देशपांडे कुटुंब प्रत्येक प्रेक्षकाला आपलेसे वाटेल, असेच आहे. १९८५ साल म्हणजेच आजपासून तब्बल ३५ वर्षांपूर्वीच्या काळात घडणाऱ्या नाटकात माझ्यासारखा आजचा तरुण इतका गुंतून जाऊ शकतो ? ह्याचे माझे मलाच नवल वाटे. पण म्हणतात ना, आपल्याला तेच भावतं जे आपल्या मनात किंवा आजूबाजूला घडत असतं. ह्या नाटकाचे वेगळेपण म्हणजे नाटकाची ‘त्रिनाट्यधारा’. एकाच कुटुंबात, एकाच घरात किबहुना वाड्यात वेगवेगळ्या काळात घडणाऱ्या घटना आणि त्याचा घरातील नात्यांबर होणारा परिणाम अधोरेखित करणारे हे कौटुंबिक नाटक आहे. पुढे २०१६ साली त्याचा पुढील भाग ‘मग्न तळ्याकाठी’ रंगमंचावर आले. अपेक्षेप्रमाणे त्याही नाटकाने एक मोठा परिणामकारक प्रभाव माझ्या मनावर पाडला. गरीबीतून श्रीमंतीकडे वाटचाल केलेल्या आणि पुढच्या पिढीच्या हातात सत्तांतर आलेल्या कुटुंबाचे चित्र मनात साठवून मी अंतिम भाग कसा असेल, ह्याबद्दल कुतूहल बाळगत राहिलो. १७ नोव्हेंबर २०१७, ह्यावेळी वाडाची ही ‘त्रिनाट्यधारा’ सलग अनुभवण्याची संधी मिळाली. सकाळी अकरापासून रात्री साडेनऊ – दहापर्यंत नाट्यगृहाच्या त्या वास्तूत आयुष्यभरासाठी सुखावणारा आणि विचारांनी समृद्ध करणारा एक खूप मोठा अनुभव मिळाला. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, आणि आता ‘युगान्त’. जितकी उत्सुकता सगळे भाग पुन्हा पाहण्याची होती तितकीच हुरहूर शेवटाची होती. मला आठवतंय, ‘युगान्त’ला पडदा उघडला आणि पुढे काही क्षण मोठ्या धक्क्यात होतो. कारण जे कुटुंब. जो वाडा मला आपलासा झाला होता त्याची आताची अवस्था बघून काळजाचे पाणीपाणी झाले होते. हे तेव्हाच घडतं जेव्हा तुम्ही नाटकात आकंठ बुडून जाता. त्यादिवशी मी नाट्यगृहातून बाहेर पडताना सोबत एका अविस्मरणीय दिवसाची आठवण मनात साठवली होती. आयुष्यभर पुरतील अशा अनेक आठवणी, सुखद प्रसंग मी तेव्हा अनुभवले होते.
त्या सगळ्यातच ‘मग्न’चा प्रयोग झाल्यावर मेकपरूममध्ये अनेक प्रेक्षकांसोबत कलाकारांशी गप्पा मारताना मला एक कल्पना सुचली. ह्या दिवसाचा अविस्मरणीय अनुभव गाठीशी घेऊन मी ती कल्पना पुढे सत्यात उतरवली. वाड्यातील प्रत्येक व्यक्तीबद्दल एक प्रेक्षक म्हणून लिहीण्याचा सफल घाट घातला आणि शेवटी माझी ‘वाड्यात जोडलेली माणसे’ नावाने सुरु केलेली एक सबंध लेखमालाच घडली. ज्याने लेखक म्हणून एक वेगळी ओळख मिळाली. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे, ‘प्रत्येक नाटक आपल्याला काहीतरी सकारात्मक गोष्ट देतं’. तसेच मला ‘वाडा चिरेबंदी’ नाटकाने आणि एकंदर त्रिनाट्यधारेने खूप काही दिलंय. एक माणूस म्हणून, एक लेखक म्हणून मन काठोकाठ भरेल इतकं दिलंय आणि म्हणूनच हे माझ्या आयुष्यातील ‘अविस्मरणीय नाटक’ आहे.

अभिषेक महाडिक
हौशी लेखक आणि इंजिनीअर


![मर्डरवाले कुलकर्णी — विनोद, नृत्य, संगीत आणि उत्कृष्ट अभिनयाची चटकदार मिसळ [Murderwale Kulkarni Review] Murderwale Kulkarni Marathi Natak](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2022/10/murderwaale-kulkarni-cover-450x253.jpg)

2 Comments
खूप छान
Pingback: OMT — तब्बल २० कलाकारांचा Online नाट्यानुभव • रंगभूमी.com