“अरे केशवरावला आग लागली, ये लवकर” पासून रडत रडत “डोळ्यांसमोर सगळं संपलं रे” पर्यंतचा प्रवास कोल्हापूरकरांनी ८ ऑगस्टच्या रात्री केला. कोल्हापूरचे वैभव मानलं जाणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह रविवारी रात्री आगीच्या भक्षस्थानी पडलं. लहानपणापासून शालेय बाल राज्य नाट्य स्पर्धा, ते आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, ते हौशी राज्य नाट्य स्पर्धा, ते प्रायोगिक नाट्य महोत्सव आणि शेवटी एखादं व्यावसायिक नाटक.. असा प्रवास कोल्हापुरातील प्रत्येक रंगकर्मींनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात केला असावा. कोल्हापुरातील एकमेव सुसज्ज नाट्यगृह असल्यामुळे बऱ्यापैकी सगळी व्यावसायिक नाटकं इथेच सादर होतात. त्यामुळे कोल्हापुरातील अनेक दिग्गज कलाकार याच रंगमंचावर घडले. आता सुद्धा जी नवी पिढी आहे ती सुद्धा याच रंगमंचावर घडत होती. त्यादिवशी नाट्यगृह जळत असताना कोल्हापुरातील प्रत्येक कलाकाराला आपणच त्या आगीत अडकलो आहोत अशी भावना होती. दिग्गजांपासून नवोदित कलाकारांपर्यंत सगळ्यांसाठीच ते नाटकाचं अंगण आहे असं म्हणता येईल. आपल्या आयुष्यातील पहिलं फंबल, पहिल्यांदा ब्लँक होणं ते सर्वोत्तम काम आणि पारितोषिक जिंकणं हे सगळं त्याच रंगमंचावर झालंय. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व नाट्यकलाकार तिथेच पडले आणि तिथेच घडले सुद्धा.
आग लागली, प्रशासनाच्या गाड्या आल्या, अग्निशमन दलाच्या गाड्या आल्या, बंदोबस्त लागला, गर्दी जमू लागली, पण दुर्दैवाने कलाकारांना मागे सारून बघ्यांची फोटो व्हिडिओ काढणारी गर्दी पुढे जात होती. चारही बाजूला नुसती धावपळ होत असताना, कोल्हापूरचा कलाकार मात्र गर्दीच्या मागे उभा राहून त्याला काहीच करता येत नाहीये म्हणून स्वतःला सावरत होता पण नकळत त्याचा डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. ज्या वास्तूमध्ये आपण आपले घर म्हणून वावरलो तिची अशी अवस्था बघवत न्हवती. नाट्यगृहाच्या ज्या खिडक्यांमधून एकेकाळी केशवराव, बालगंधर्व यांसारख्या कलावंतांचे स्वर बाहेर यायचे, त्याच खिडक्यातून आगीचे लोट बाहेर येत होते!
या सगळ्यातून सावरून कोल्हापूरकरांनी शासानासमोर आता एकच मागणी ठामपणे मांडली आहे ती म्हणजे, “आमचं नाट्यगृह जसं होतं तसंच पुन्हा हवंय!” त्यात कोणत्याही प्रकारचं व्यावसायिकीकरण नको आहे. #keshavraobhosalerevival हा hashtag सध्या सोशल मीडिया वरती ट्रेण्ड करतोय. पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाट्यगृहाला स्वतंत्र भेटी दिल्या. दोघांचेही म्हणणे हेच होते की “तुम्हाला हे नाट्यगृह जसं होतं तसं करून द्यायची जबाबदारी सरकारची!”. कलाकार आणि प्रशासन दोन्ही एकाच मतावर असल्यामुळे कलाकारांना थोडा दिलासा मिळाला आहे. तत्पूर्वी कोल्हापुरातील अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा राजकारण बाजूला ठेऊन शक्य तितकी मदत केली. खा. शाहू महाराज छत्रपती, आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर यांनी एकत्रित रू. ५ कोटी, आ. राजेश क्षीरसागर यांनी आपल्या निधीतून रू. १० कोटी तर स्वखर्चातून लाईट, साऊंड आणि नेपथ्याचे नुकसान झालेल्या लोकांसाठी रू. ५ लाखाचा धनादेश दिला आहे. त्याचप्रमाणे शासनाकडून रू. २० कोटी मंजूर झाले असून त्याशिवयही जो काही खर्च होईल तो करून नाट्यगृह उभा करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
या घटनेनंतर बऱ्याच चर्चा रंगत होत्या जसं की, “हे पुन्हा उभा राहणं शक्य नाही”, “नाट्यगृहाला अखेरचा सलाम”, “शेवटचा पडदा पडला” पण ज्या अर्थी अशी भीषण आग लागून सुद्धा, संपूर्ण नाट्यगृह उद्ध्वस्त होऊन सुद्धा, रंगमंचाला मात्र धक्काही लागलेला नाही… हो! हे खरंय! रंगमंच इतक्या भीषण आगीतही तसाच उभा राहिला. याचाच अर्थ असा आहे की तो रंगमंच आपल्याला खुणावतोय की मी अजून संपलो नाहीये आणि लवकरच मी पुन्हा सजेन, लवकरच तिसरी घंटा पुन्हा वाजेल, लवकरच कोल्हापुरात नाटकाची नांदी ऐकू येईल आणि लवकरच हे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभे राहील. हे फक्त एक मध्यंतर आहे आणि याचा दुसरा अंक लवकरच सुरू होईल. या नाट्यगृहात नाटक घडलं, नाटकं घडत होतं आणि नाटक या पुढेही घडत राहणार!
[With inputs from Parth Ghorpade]