Tuesday, November 30, 2021

अनिल कासकर यांचा अभिनेता ते रंगभूषाकारापर्यंतचा प्रवास

मी आणि रंगभूमी…

नमस्कार मित्रांनो, 

मी रंगभूषाकार

रंगभूषा आणि कलाकार ह्यांच नातं खरंच अतुलनीय असे आहे असं म्हणायला हरकत नाही, बरोबर नां…?? कां…??? आणि कसे..???? 

कलाकार रंगमंचावर प्रवेश करण्याआधी चेह-याला रंग लावून प्रवेश करतो.  कारण अभिनय, आपली अदाकारी आणि भूमिकेला साजेशी रंगभूषा शेवटच्या प्रेक्षकापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. आणि ते काम रंगभूषा व त्याचा अभिनय करीत असतात.

आता मी रंगभूषाकार कसा झालो?  खरं म्हणजे मी अभिनेता. एका बालनाटकात छोटाशी भूमिका करीत होतो. दोन दिवस अगोदर लेखक श्री. बबन परब ह्यांना एका प्रसिद्ध रंगभूषाकाराने येणार नसल्याचे कळवले. लगेचच आम्ही ओळखीच्या, जास्त नाही पण चार / पाच लोकांना विचारणा केली.  काही रंगभूषाकार तयार झाले. पण आमचं बजेट म्हणजेच मानधनाची सुत्र जमत नव्हती. काही वेळ नाही म्हणून टाळले….

आली कां पंचाईत…. 

आता जबाबदारी कोण घेणार? नाटक तर व्यावसायिक होते. मग मीच म्हणालो, एक जण आहे. मी त्याला उद्या घेऊन येतो. पण त्याच्याकडे सामान नाहीय. रंगभूषेचे सामान भरायला थोडे पैसे लागतील. ठरलं, दुस-या दिवशी रविवार – सकाळी लवकर अकादमीत तालमीच्या ठिकाणी पोहोचलो. सगळे कलाकार आले होते. लेखक/दिग्दर्शक श्री. बबन परब आले. मला विचारायला लागले रंगभूषाकार कोठे आहेत? बोलव त्यांना.  मी त्यांना रंगपटात घेऊन गेलो. तिथे अगोदर सामान मांडून ठेवले होते. आणि त्यांनी पून्हा तेच विचारले रंगभूषाकार कुठे आहेत?  मी त्यांना आरशासमोर उभे केले आणि सांगितले हे समोर आहेत…. 

आणि एका रंगभूषाकाराचा जन्म झाला.

असाच एक दिवस बसलो होतो. रविवार होता. (वर्ष आठवत नाही, पण १९९५ -९६ असावे.) आविष्कार मधून फोन आला, सुलभा ताई देशपांडे यांचा. 

सुलभाताई : कुठे आहेस, 

मी : आपण कोण बोलताय 

सुलभाताई : मी अविष्कारमधुन बोलतेय…

मी : बोला ना मॅडम 

सुलभाताई : आपण आता कुठे आहात?  ताबडतोब माहीमला म्युनिसिपल शाळेत या. आपल्याला काही लोकांना  मेकअप करायचा आहे. 

नविनच मोबाईल होता. पैसे जास्त जायला नको म्हणून मी म्हटले मी तिथे येतो मग बोलू. मी माझा मित्र चंदर पाटील (रंगभूषाकार: भद्रकाली प्रॉडक्शन) ह्याला घेऊन गेलो.  सगळे कलाकार चक्रीवाचन करीत होते. सुलभाताई मला गोडाऊन वजा ऑफीसजवळ भेटल्या. 

सुलभाताई : कोण आपण, 

मी : अनिल कासकर, रंगभूषाकार, मला फोन आला   होता, 

सुलभाताई : हा, मी केला होता फोन, या…

मी : कीती कलाकार आहेत? आणि बेसिक आहे  का?

सुलभाताई : नाही.  चल तुला  दाखवते. कलाकारांची भेट घालुन देते. नाटक रात्री ७:३० वाजता आहे.

रंगपटात गेलो. ताईंनी सगळ्यांना बोलावले. प्रथम प्रवेश – प्रकाश बुद्धीसागर दिग्दर्शक यांचा झाला. मागे शरद पोंक्षे, उमेश बने, उमेश ठाकूर, सुशांत शेलार आणि कै. अतुल अभ्यंकर आणि सोबत इतर महिला कलाकार (सगळेच व्यावसायिक).  सुकन्याताई आणि त्यांच्या मागे पहातो तर आताचे बहुतेक कलाकार.  नावे आता लक्षात नाहीत. खरं म्हणजे मी इतक्या मोठ्या कलाकारांना / अभिनेत्यांना कधी रंगभूषा केली नव्हती. त्यात माझ्यासोबत आलेला मित्र / रंगभूषाकार काहीतरी निमित्त काढुन घरी गेला होता. आता रंगभूषा करायची आली का पंचाईत? १५ /२० कलाकार, बहुतेक सगळ्यांना दाढी-मिशा वापरायच्या होत्या आणि मला म्हणावा तितका अनुभव नव्हता. अनुभव नव्हता म्हणजे (प्रॅक्टिकल-सराव) नव्हता. पण मी निश्चःय केला. मी हे काम करायला हो म्हणालोय. मग मी ते पुर्ण करणार..

मी कार्यक्रमाला (रंगभूषा करायला) सुरूवात केली. पहिलाच मेकअप मी शरद पोंक्षे यांना केला. मग सगळ्यांचा मेकअप झाला आणि सुलभाताई शरद पोंक्षेना माझ्याकडे घेऊन आल्या…

सुलभाताई : अरे अनिल हा शरद लाल झाला रे त्याला जरा पांढरा कर.

… मी हो म्हटले आणि पुन्हा व्यवस्थित केला तर प्रकाश बुद्धीसागर – दिग्दर्शक म्हणाले कशाला बदललास?

मी : चेंज करु कां मी..??   नको म्हणत प्रकाशसर रंगपटातून बाहेर गेले….

सगळ्यांना रंगभूषा करून झाली. मी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. नाटक सुरू होणार तेव्हढ्यात प्रकाशसरांनी सगळ्यांना रंगमंचावर बोलावले.  गणेशस्तवन (नांदीसाठी) करण्यासाठी. अर्थात मला सुद्धा बोलावले…

नाटक सुरु झाले मला थोडा आराम मिळतोय न मिळतो तोच सुलभाताई लवकर बोलावतायत असा निरोप आला मी धावतच गेलो…

सुलभाताई : शरदची मिशी आणि दाढी निघतेय असे त्याला जाणवत होतं. 

ते दिग्दर्शकाने पाहीले आणि ताईंना सांगितले मग मला निरोप आला होता. मी स्पिरीट, गम घेऊन आलो आणि विंगेत सगळे व्यवस्थित केलं. नंतर नाटक व्यवस्थित पार पडले.  माझी त्या दिवसाची जबाबदारी पार पडली. नंतर दोन एक वर्ष रंगभुषेची कामं मिळाली.

रंगभूषा करण्याअगोदर मी अभिनय क्षेत्रात वावरलो. इयत्ता पाचवीत असताना एका ऐतिहासिक एकपात्रीमध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केली आणि पारितोषिक सुध्दा घेतले.

नंतर अनेक सेमी-प्रोफेशनल नाटकाचे दिग्दर्शन केले. त्यात कामही केली….

E-TV मराठी वर क्राईम डायरी ह्या सिरीयल मध्ये २० ते २५ एपिसोडमध्ये काम केले. दूरदर्शनवर एकांकिका केल्या.

राज्य नाट्य, कामगार नाट्य स्पर्धांमधून अभिनयाची पारितोषिके मिळाली. दोन गुजराती नाटकात कामं केली.  एक होते “हुँ अने तु, पुछवानु सु?”.  दुस-या नाटकाचे नांव आठवत नाहीय. ह्या दोन्ही नाटकांना रंगभूषा करायचो आणि अभिनय सुद्धा…

नंतर एका नाटकादरम्यान जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक कै. आत्माराम भेंडे त्यांच्याशी ओळख झाली. त्या ओळखीमुळे श्री. प्रफूलचंद्र दिघे ह्यांचे नाटक करायला मिळाले. जेष्ठ नागरीक ह्या वर्षानिमित्त नाटक आले होते. त्याची रंगभूषा करण्यासाठी मला भेंडे काकांनी विचारले. आणि मी हो म्हटले. त्या नाटकात कै. आनंद अभ्यंकर ह्या अतिशय गुणी नटाशी माझी चांगली ओळख झाली आणि त्यांच्या ओळखीमुळे कामं मिळत गेली.

ह्या दरम्यान कै. मच्छिंद्र कांबळी ह्यांचे वस्त्रहरण नव्याने सुरू झाले. कै. संतोष पवार ह्यांना घेऊन त्यावेळेस सचिन वारीक, चंदर पाटील आणि मी आम्ही तिघे मिळुन मेकअपची कामे घेतली.

एका सेमी प्रोफेशनल (हौशी) नाटकात एका कलाकाराचा चेहरा आणि हात जळलेल्या अवस्थेत मला दाखवायचा होता. त्या कलाकाराला मी तालमीत भेटायला गेलो आणि त्याच्या हाताचे व चेह-याचे मेजरमेंट घेऊन आलो आणि त्यांची रंगभूषा लेटेक्सच्या सहाय्याने दोन मिनीटात करुन त्याला रंगमंचावर पाठवले. असे भरपूर प्रसंग आणि भरपूर जादूगरी म्हणा, किमया म्हणा किंवा अजून काहीही…

काही नाटकात मी असिस्टंट मेकअप मॅन म्हणून काम केले. दूरदर्शनवर नाटक, दिग्दर्शक – सतिश सलागरे आणि श्री. कुलदीप पवार ह्यांच्यासाठी रंगभूषा काम केले.  सगळ्यात महत्वाचे काम मिळाले ते श्री. महेश मांजरेकर ह्यांच्या “शाहरूख मांजरेकर सुंभेकर” आणि “करुन गेलो गांव” ह्या नाटकात. आणि इतर कार्यक्रमातही खुप काम त्यांच्यासोबत केले.

प्रयोग मालाड ह्या संस्थेसोबत (गेली ५-६ वर्षे ) काम करतोय ते प्रकाश योजनाकार संजय तोडणकर ह्यांच्यामुळे. आणि श्री. प्रदिप देवरूखकर, उदय तायशेट्ये, अजित कोरगांवकर हे सगळे एक कुटूंब मिळाले असं वाटतेय. काम करताना आनंद मिळतोच, पण माणुसकीचे रंग लावलेली माणसंसुद्धा इथेच दिसतात.

अमर हिंद मंडळ, रविंद्र ढवळे सर, समीर चव्हाण, धी. गोवा हिंदु असोसिएशन,  ह्या सगळ्यांसोबत काम करताना खूप आनंद मिळतो..

रंगभूषेचे काम करण्याअगोदर अभिनय, पार्श्वसंगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन घेतले.  रंगभूषाकार : शशीकांत सकपाळ, मिलींद कोचरेकर, पार्श्वसंगीत : कै. अरुण कानविंदे, दादा परसनाईक, नेपथ्य: प्रदिप पाटील आणि सगळ्यात महत्वाचं – माझे मित्र आणि प्रत्येक वेळेस मोलाचा सल्ला देणारे प्रकाशयोजनाकार मित्र संजय तोडणकर.

रंगदेवता आणि सगळ्यांना वंदन करुन इथेच थांबतो…

धन्यवाद

अनिल कासकर

अभिनेता, रंगभूषाकार

विविध कलाकारांना रंगमंचावर जाण्याआधीच त्यांच्या व्यक्तिरेखेत शिरण्यासाठी मदत करणारा किमयागार!

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

2 COMMENTS

  1. Khupach chan lihalay…..aani tyacha yashach pravas pan khup mast….kharach kalakarala phakkt sandhi milana garjech asta ….pan ti milalu ki tyach sona karana aaplya hatat asta….khup chan?????

  2. प्रकाशयोजना कशी असावी ह्याचे उत्तम उदाहरण आपण आपल्या लिखाणातून दाखवून दिलेत धन्यवाद….

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles

%d bloggers like this: