मराठी रंगभूमीवर सद्ध्या गाजत असलेल्या ‘द दमयंती दामले’ या सुपरहिट नाटकाचा २५वा प्रयोग १७ मे रोजी रंगभूमीवर सादर होणार आहे. विशाखा सुभेदार यांचं विनोदाचं अचूक टायमिंग, संतोष पवार यांचं लेखन-दिग्दर्शन आणि त्याला सर्व सहकलाकार व तंत्रज्ञांची योग्य साथ, अशा भन्नाट रसायनातलं हे धमाल विनोदी नाटक बघून प्रेक्षक दोन अडीच तास नाटकाचाच एक भाग होऊन जातात.
‘द दमयंती दामले’ ही कथा आहे दमयंती दामले या ठाम, स्पष्टवक्त्या आणि हट्टी स्त्रीची! तिचे दोन मुलगे — सुधांशू आणि अंशुमन, आणि त्यांच्या बायका मृण्मयी व तन्मयी, हे आपापले स्वतंत्र संसार थाटण्याच्या तयारीत असतात. पण दमयंतीला मात्र सर्वांना एकाच छताखाली ठेवायचं असतं! घरगुती गोंधळ, हसवा-हसवी, आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या धमाल शक्कली—या सगळ्यांचं खुमासदार मिश्रण म्हणजे ‘द दमयंती दामले’! या नाटकाने आतापर्यंत सर्व प्रेक्षकांना पोट धरून हसवलं आहे, आणि २५वा प्रयोग हा एक विशेष टप्पा आता हे नाटक गाठणार आहे. जर तुम्ही अजून हे नाटक पाहिलं नसेल, तर १७ मेचा २५वा प्रयोग चुकवू नका. कारण, हे अतरंगी दामले कुटुंबीय रंगमंचावर गोंधळ घालण्यासाठी सज्ज आहेत. विलेपार्लेच्या दीनानाथ नाट्यगृहात दुपारी ४ वाजता हा २५ वा प्रयोग पार अपडणार आहे.
प्रत्येक पात्राच्या खास शैलीतून रंगणारी ही कथा बघून तुम्ही ताण विसरून जाल हे नक्की! २५ व्या प्रयोगाचा आनंद घ्या आणि सासू-सुनेच्या गमतीजमतींसह पोट धरून हसा! रंगभूमी.com कडून ‘द दमयंती दामले’ नाटकाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा!


![कुर्रर्रर्रर्र [Review] — निखळ मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी! Kurrrr Marathi Natak Review](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2021/12/kurrrrnatak-review-feature-1067x600.jpg)
