वसई गावातील संदेश नायक यांचे ‘नायक्स फूड कोर्ट’ तिथल्या रुचकर मिष्टांन्नांसाठी तर प्रसिद्ध होतेच. पण आता ते अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध झाले आहे. हॉटेलमध्ये सादर होणाऱ्या नाट्य कलाकृतींसाठी!
संदेश नायक यांना अभिनय व दिग्दर्शनाचीही आवड आहे. लॉकडाऊनमुळे बराच काळ काहीच नाट्य उपक्रम करता न आल्यामुळे संदेश नायक यांनी त्यांच्या हॉटेलमध्येच ‘प्रयत्न रंगमंच, वसई’ या संस्थेतर्फे कलाकारांसाठी खुला रंगमंच उभा करून दिला आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई गावात संदेश नायक यांनी हा अभिनव प्रयोग यशस्वीरीत्या करून दाखवला आहे. एवढंच नाही तर हे करताना त्यांनी कोविड संबंधित सगळी खबरदारीही बाळगली आहे. त्यांच्याच हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर काही सुंदर नाट्य कलाकृतींचे सादरीकरण केले जाते. उपलब्ध जागा आणि तेवढ्या जागेत प्रेक्षकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवण्याच्या विचाराने संदेश नायक यांनी प्रयोगासाठी जास्तीत जास्त ३० प्रेक्षकांचीच मर्यादा ठेवली आहे. संदेश नायक असेही सांगतात की प्रत्येक प्रयोगाचे तिकीट मात्र ५०/- रुपये ठेवण्यात आले आहे, जेणेकरून सामान्य प्रेक्षक या सुंदर एकांकिका, दीर्घांक व नाटकांचा माफक दरात आस्वाद घेऊ शकतील. त्यांचे मित्र तुषार घरत हे देखील अभिनेता व दिग्दर्शक असून तेही संदेश नायक यांना या उपक्रमात बरीच मदत करत आहेत.
रविवारी म्हणजेच १४ मार्च रोजी दुपारी ३ वाजल्यापासून तुम्हाला अशाच दोन एकांकिका एकापाठोपाठ एक नायक्स फूड कोर्ट हॉटेलमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यापैकी पहिल्या एकपात्री एकांकिकेचे नाव “प्रियांका” असून दुसऱ्या एकांकिकेचे नाव “अपवाद आणि नियम” असे आहे. त्यामुळे तुम्ही नक्की या दोन्ही एकांकिकांचा आनंद घ्या.


स्वतःच्या व्यवसाय आणि छंद याचा मिलाप घडवून आणणे फार कमी लोकांना जमते. त्यापैकी एक संदेश नायक आहेत. एक हाडाचा रंगकर्मीच अशा प्रकारचे पाऊल उचलू शकतो. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रेम व प्रतिसाद मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे.

![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-450x253.jpg)


2 Comments
Amezing Sandesh sir , Great job done , Keep it up !
अभिनंदन आणि शुभेच्छा संदेश नायक आणि तुषार घरत