महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि नाट्य चळवळीसाठी एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी आहे! मराठी रंगभूमीला विविध स्पर्धा व उपक्रमांमधून सातत्याने नवे आणि प्रतिभावान चेहरे देणाऱ्या राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत यावर्षीपासून प्रथमच ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५‘ आयोजित करण्यात येत आहे. महाविद्यालयीन नाट्यकलाकारांसाठी शासनाने थेट राज्य स्तरावर ही स्पर्धा आयोजित करण्याचा घेतलेला निर्णय कला आणि संस्कृती क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि उत्साहाचे पाऊल मानला जात असून, यामुळे महाविद्यालयीन रंगभूमीला भव्य व्यासपीठ मिळणार आहे.
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५
महाराष्ट्र शासन
सांस्कृतिक कार्य संचालनालय
आयोजित
आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा
स्पर्धेचे वैशिष्ट्य
- राज्य शासनाची ही स्पर्धा इतर अन्य स्पर्धेपेक्षा अनोखी आहे. सहभागी संघांनी जमा केलेली अनामत रक्कम ₹2,000/- स्पर्धा संपल्यावर पुन्हा परत केली जाणार आहे.
- प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरीत दाखल झालेल्या स्पर्धक संघांना प्रत्येकी ₹10,000 निर्मिती खर्च तसेच जाण्या-येण्याचा प्रवासखर्च आणि दैनिक भत्ता अदा करण्यात येईल.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केल्यानुसार, राज्यातील सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. या अभूतपूर्व सरकारी पाठिंब्यामुळे महाविद्यालयीन नाट्यक्षेत्रात मोठा उत्साह संचारला आहे.
ही महत्त्वाकांक्षी स्पर्धा अत्यंत सुनियोजित पद्धतीने तीन टप्प्यांत पार पडणार आहे. स्पर्धेच्या स्वरूपानुसार यात तालीम फेरी (Rehearsal Round/Initial Scrutiny), प्राथमिक फेरी (Preliminary Round) आणि अंतिम फेरी (Final Round) यांचा समावेश असेल. तालीम फेरीतून निवडले गेलेले संघ प्राथमिक फेरीत, तर प्राथमिक फेरीत उत्कृष्ट ठरलेले संघ अंतिम फेरीत आपली कला सादर करतील. या बहुस्तरीय आयोजनामुळे, केवळ उत्कृष्ट आणि कसदार सादरीकरण करणाऱ्या संघांनाच अंतिम फेरीत आपली कला सादर करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे स्पर्धेचा दर्जा निश्चितच उच्च राहील.
तालीम फेरी डिसेंबर महिन्यात, वा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी या जानेवारी महिन्यात घेण्यात येतील. प्राथमिक फेरी 6 महसुली विभागाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल तर अंतिम फेरी ही मुंबईत आयोजित केली जाईल. प्राथमिक फेरीत (६ ठिकाणी) व अंतिम फेरीत खालील पारितोषिके दिली जातील.

तसेच उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री यांना रौप्यपदक, लेखक, दिग्दशर्क, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेषभूशा यांसाठीही रोख रकमेची बक्षिसे आहेत.
राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२५ – प्रवेशिका अर्ज
या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी प्रवेशिका १ ऑक्टोबर पासून उपलब्ध होणार आहेत. प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील इच्छुक महाविद्यालयांनी २५ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे सादर करणे अनिवार्य आहे. प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी फक्त एक महिना असल्याने, सर्व महाविद्यालयांनी विहित वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्यातील सर्व महाविद्यालयांना आवाहन केले आहे की, त्यांनी या सांस्कृतिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाराष्ट्राची नाट्य-परंपरा अधिक समृद्ध करावी. ही स्पर्धा केवळ पारितोषिके जिंकण्याची संधी नसून, भविष्यातील व्यावसायिक रंगभूमीसाठी उत्तम कलाकार, लेखक आणि दिग्दर्शक तयार करणारी एक महत्त्वपूर्ण ‘पाठशाळा’ ठरणार आहे. शासनाच्या या उपक्रमाने निश्चितच मराठी नाट्य चळवळीला एक नवी, तरुण आणि उत्साही ऊर्जा प्राप्त होणार आहे.
महाराष्ट्र राज्य एकांकिका स्पर्धा २०२५ – महाविद्यालय नोंदणी
![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-1067x600.jpg)


