Tuesday, November 30, 2021

तू म्हणशील तसं [Review] — सुखी संसाराचा मूलमंत्र

सुखी संसाराचा मूलमंत्र ‘तू म्हणशील तसं’

नवरा बायको जोवर मित्रमैत्रिण किंवा प्रियकर – प्रेयसी असतात तोवर त्यांच्यातील Understanding एका वेगळ्याच Level वर असते. सुख-दु:ख, रुसवे-फुगवे, गैरसमज हे सगळच प्रेमाने सोडवलं जातं. पण अनेकदा लग्न झाल्यावर गोष्टी बदलतात. कधीकाळी प्रियकराचा आवडणारा स्वभाव अचानक आवडेनासा होतो, तर कधीतरी प्रेयसीची असलेली एखादी जुनी सवय अचानकच खटकायला लागते. लग्नानंतर हेच खटके टाळण्यासाठी आणि संसाराची गाडी रुळावर ठेवण्यासाठी दोघांपैकी एकाला तरी म्हणावच लागतं – ‘तू म्हणशील तसं’.

Tu Mhanshil Tasa Marathi Natak Review

गौरव कुलकर्णी आणि आदिती कुलकर्णी हे दोघेही मित्र मैत्रीण, मग प्रियकर प्रेयसी असा नात्याचा प्रवास करून आता दीड वर्षे एकत्र नांदणारे नवरा बायको. दोघेही एकाच बँकेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये कार्यरत असतात. गौरव अतिशय दिलखुलास, आयुष्य भरभरून जगणारा, स्वत:मधील लहान मूल आजही जपलेला मुलगा तर आदिती नेमकेपणाने राहणारी, Image Conscious, संसार आणि नोकरी ह्यात समतोल राखणारी मुलगी. एक दिवस अचानक गौरवची आदितीच्या शाखेत बदली होते जिथे तो ऑफिसर आणि आदिती त्याची मॅनेजर म्हणजेच बॉस. एकाच शाखेत काम करायला मिळणे हे जसे गौरवसाठी आनंदाचे असते तसेच आदितीसाठी ती एक कसरत ठरते. गौरवसाठी आदिती ऑफिसातही ‘बायको’च असते, मात्र आदितीसाठी घर आणि ऑफीसमधली नाती वेगळी असतात. अशा दोन टोकाच्या स्वभावांमुळे त्या दोघांची ऑफिसात अनेकदा गोची होते तर कधीकधी त्यांच्यात ठिणग्याही पडतात. पण नवरा बायको म्हणजे ‘तुझं माझं जमेना, तुझ्याशिवाय करमेना’. सोबत ऑफिसमध्ये नव्याने आलेली क्लार्क अबोली आणि शिपाई रुद्रकंठेवार मामा यांच्यामुळे त्या दोघांच्या नात्याला नव्याने घडण्यास मदत होते. शेवटी संसार आणि ऑफीसच्या रोलरकोस्टर राईडवर प्रवास केलेलं दोघांचं नातं एका positive note वर येतं आणि एक छानसा मेसेज देतं.

Tu Mhanshil Tasa Marathi Natak Script

लेखक संकर्षण कऱ्हाडे यानी नाटकाचा विषय फार मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. नवरा बायको यांच्या नात्यातील विविध छटा दाखवताना कथानक तणावपूर्ण करण्यापेक्षा delightful केले आहे.

दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी लेखनाला पूर्णपणे न्याय देत दोन वाक्यातल्या छोट्याछोट्या जागाही भरून काढल्या आहेत. नाटक कुठेही रेंगाळत नाही, तसेच मनोरंजनात ते कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे सबंध दोन तास खेळतं राहतं.

लेखक संकर्षण कऱ्हाडे यानी नाटकाचा विषय फार मनोरंजक पद्धतीने मांडला आहे. नवरा बायको यांच्या नात्यातील विविध छटा दाखवताना कथानक तणावपूर्ण करण्यापेक्षा delightful केले आहे. जेणेकरून मनोरंजनासोबत दिला जाणारा संदेश प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतो. ह्यातल्या व्यक्तीरेखांचे स्वभाव लेखकाने अचूक हेरून त्यांना विशिष्ट असे वेगळेपण देण्याचा प्रयत्न केला आहे. नवरा बायकोच्या स्वभावातील contrast हे ह्या नाटकाचे एक वैशिष्ट्य. काळानुरूप नाटकात केलेला बदल कोरोना, लॉकडाऊन, सॅनिटायझर अशा शब्दांमुळे कळून येतो. पहिल्या अंकात कधीकधी कथानकात एखाद्या विनोदी प्रहसनाचं रूप दिसत राहतं त्यामुळे पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक उजवा वाटतो. दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी लेखनाला पूर्णपणे न्याय देत दोन वाक्यातल्या छोट्याछोट्या जागाही भरून काढल्या आहेत. नाटक कुठेही रेंगाळत नाही, तसेच मनोरंजनात ते कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे सबंध दोन तास खेळतं राहतं.

Tu Mhanshil Tasa Marathi Natak Actors

संकर्षण कऱ्हाडे ह्या नटाचे भाषेवरचे प्रभुत्व त्याचे वेगळेपण सिद्ध करते. त्याने साकारलेला गौरव फारच खेळकर आणि आनंदी आहे. काही ठिकाणी बायकोशी वागताना तो बालिशपणा करतो, तर अबोलीची मदत करताना एक जबाबदार भाऊ होतो. व्यक्तिरेखेच्या अशा छटा संकर्षणने फार सुरेख साकारल्या आहेत. भक्ती देसाई आदिती म्हणून अगदी योग्यपणे शोभली आहे. तिची देहबोली, आणि आवाजाचा पोत आदिती ह्या व्यक्तीरेखेला उभी करण्यात महत्त्वाचा ठरतो. ऑफिसमधील बॉस आणि घरात बायको अशा दोन्ही ठिकाणी तिच्या डोक्यात असलेली अपेक्षित जबाबदारीची Clarity दिसून येते. गौरवला समजून घेताना, त्याला जपताना कधी तिच्यात मैत्रीण दिसते, तर कधी प्रेयसी; कधी बायको तर कधी आईसुद्धा. अमोल कुलकर्णी यांचा रुद्रकंठेवार मामा आणि सूत्रधार फारच प्रभावशाली होता. अनेक प्रसंगात त्यांच्या शब्दांचे फटकारे आणि प्रतिक्रिया अफलातून होत्या. अधेमधे कथानकाबाहेर येत त्यांनी मारलेले punches एकच हशा पिकवतात. प्रिया करकमकर हिने अबोलीची भूमिकाही फार छान साकारली आहे. तिच्यातील निरागसता अबोलीला साजेशी होती.

Tu Mhanshil Tasa Marathi Natak Details

नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांनी फारच साधेसोपे, म्हणायला Common असे नेपथ्य उभारले आहे. पण त्यातही twist म्हणून जेव्हा हे नेपथ्य प्रेक्षकांसमोर बदलले जाते तेव्हा घरातून ऑफिस आणि ऑफिसातून घर हा प्रवास बसल्या जागी अनुभवता येतो. एरवी black out मधे घडणाऱ्या गोष्टी समोर घडताना पाहणे प्रेक्षकांना वेगळा अनुभव देते. घरातील सोफ्याचा ऑफीस टेबल किंवा दरवाज्याची दिशाबदल असे नेपथ्य बदल फार कल्पकतेने केले आहेत. अशोक पत्की यांनी नेहमीप्रमाणेच फार सुंदर संगीत नाटकाला दिले आहे. ह्या संगीतामुळे प्रसंग खुलतातच पण सोबत आलेल्या संकर्षणच्या कवितांना देखील बहार येते. वेशभूषा नेमकी आणि साजेशी होती.

हे नाटक जितके एखाद्या प्रियकर प्रेयसीचे आहे तितकेच नवरा बायकोचेही आहे. खरंतर कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकाला हे नाटक आवडणारे आहे. चार घटका उत्तम मनोरंजन करणाऱ्या ह्या नाटकाला ‘प्रशांत दामले’ touch नक्कीच आहे. नाटकाच्या सुरुवातीला प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांच्या आवाजातील हटके घोषणाच लक्ष वेधून घेते आणि पुढे दोन पूर्णपणे निखळ मनोरंजन. त्यामुळे सुखी संसाराचा हा मूलमंत्र जाणून घ्यायला हे नाटक अवश्य बघा.


Tu Mhanshil Tasa Marathi Natak Cast

नाटक : तू म्हणशील तसं !
लेखक : संकर्षण कऱ्हाडे
दिग्दर्शक : प्रसाद ओक
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
संगीत : अशोक पत्की
निर्माती : गौरी प्रशांत दामले
निर्मिती संस्था : प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि पुणे टॉकीज
कलाकार : संकर्षण कऱ्हाडे, भक्ती देसाई, अमोल कुलकर्णी, प्रिया करकमकर

Tickets Available Here


इतर मराठी नाटकांचे रिव्ह्यूज / समीक्षणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा → Marathi Natak Reviews

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles