Tuesday, November 30, 2021

व्हॅक्यूम क्लीनर [Review] — मनोरंजन आणि एनर्जीचा ‘४४० वोल्ट’!

व्हॅक्यूम क्लीनर – मनोरंजन आणि एनर्जीचा ‘४४० वोल्ट’!

हल्लीच्या जमान्यात नवरा-बायकोला प्रोफेशनल आयुष्यासमोर पर्सनल आयुष्य तसे कमीच मिळते. त्यात नवरा कमावता आणि बायको गृहिणी असेल तर संसाराची समीकरणे नव्याने तयार होतात. आपल्या बायकोला पिरीयड काळात काय त्रास होत असेल ? किंवा आपला नवरा ऑफिसात चौदा-पंधरा तास ड्युटी करून आल्यावर त्याची मन:स्थिती कशी असेल ? असा एकमेकांबद्दल विचार करणारी जोडपी दुर्मिळच. संसाराच्या रामरगाड्यात त्यांना एकमेकांसाठी ही काळजी वाटत असेल तर ठीक, परंतु जर दोघांमधील एक जरी त्याचा विचार करत नसेल तर नात्यात तेढ निर्माण होऊ लागते. त्यामुळे नवऱ्याने बायकोला आणि बायकोने नवऱ्याला त्यांच्या-त्यांच्या लाइफस्टाइल सकट समजून घ्यायला हवेच. याविषयी जर कोणी आपल्याला काही सांगू लागले तर ती प्रवचनपर चर्चा वाटू लागते पण त्याला जर विनोदी अंगाने सादर केले गेले तर त्यातील मर्म समजून घेणे, काहीसे सोपे होते. नवरा-बायकोच्या नेहमीच्याच जीवनात अचानक एखादा ट्वीस्ट आला तर ? तर काय होते, हेच सांगतय अष्टविनायक निर्मित आणि चिन्मय मांडलेकर लिखित – दिग्दर्शित नाटक ‘व्हॅक्यूम क्लीनर’.

Vacuum Cleaner Marathi Natak Review

रंजन आणि नयना हे दोघे तब्बल २८ वर्षे संसार केलेले पती-पत्नी. रंजन एका बड्या कंपनीचा मालक जो सतत कामात व्यस्त आणि नयना एक गृहिणी. त्यामुळे त्यांच्यात हवा तसा आणि हवा तितका संवाद होत नाही किंबहुना झालाच तर त्याचा शेवट वादानेच होतो. त्यामुळेच त्यांच्या नात्यात काहीसा दुरावा निर्माण झालेला असतो जो काळासोबत त्यांचे नाते अधिकाधिक गढूळ करत असतो. त्यांची मुलगी प्रियांका आणि जावई शक्ती त्यांच्या जवळच राहत असल्याने दोघांचेही घरी येणे-जाणे चालू असते. त्यात शक्ती रंजनच्याच कंपनीत काम करत असल्याने त्यांच्यात एक वेगळा संवाद घडत असे. रंजन-नयनाचा मुलगा परीक्षित हा कॉलेजात शिकणारा आणि नृत्याची आवड असणारा तरुण मुलगा असतो. त्याचे हे नृत्याचे वेड त्याच्या प्रोफेशनल वडिलांना कधीच कळलेले नसते आणि त्यामुळेच ते नेहमी त्याचा द्वेष करत असतात, त्याला वाट्टेल ते बोलून आपला राग व्यक्त करत असतात. याउलट शक्तीचे त्यांच्या ऑफीसातील काम पाहून रंजन सतत परीक्षितची त्याच्याशी तुलना करत असतो. ह्या सगळ्यात नयनाचे मात्र आपल्या मुलांकडे एक आई म्हणून बरोबर लक्ष असते. कामाच्या व्यापात शक्ती आणि प्रियांकाच्या नात्यातील वाढत असलेले मतभेद तिला ठावूक असतात तर परीक्षितच्या म्हणजेच तिच्या लाडक्या परीच्या उमेदीचीही तिला काळजी असते.

सततच्या तणावामुळे रंजनसुद्धा बाहेर जलपा नामक स्त्रीच्या संपर्कात आलेला असतो. त्याचे हे वागणे नयनाला कायम खटकत असते. घरात त्याचा सहभाग फक्त आर्थिक बाबींसाठी आणि पुरुषी हेका मिरविण्यासाठी आहे, हे ती त्याला कायम तिच्या खोचक शब्दांनी सांगत असते, ज्यामुळे अनेकदा त्यांच्यात खटकेही उडतात. जलपासोबतची रंजनची जवळीक नयनाला ठावूक असतेच पण परिस्थितीसमोर आणि रंजनच्या हेकेखोर स्वभावासमोर ती न बोलणेच पसंत करते. तिचा मनस्ताप ती कायम महागड्या वस्तू ऑनलाईन खरेदी करून व्यक्त करत असते. वेगवेगळे शोपीस, झाडे, स्टीम क्लीनर, तसेच व्हॅक्यूम क्लीनर तिने खरेदी करण्याचा सपाटा लावलेला असतो. रंजन सुद्धा एक क्रेडीट कार्ड देऊन पैश्यासमोर आपल्या बायकोच्या भावना विकत घेऊ पाहत असतो पण नयनाचे अव्वाच्या सव्वा शॉपिंग पाहून त्यांच्यात पुन्हा खटके उडतात. बघताना ही नेहमीच्या संसारातील गोष्ट वाटू लागते. ज्यात एकमेकांना समजून न घेणारं जोडपं दिसत राहतं. एका दिवशी अशाच एका भांडणात दोघांनाही खराब झालेल्या ‘व्हॅक्यूम क्लीनर’चा जबरदस्त शॉक लागतो आणि…??? आणि काय घडते ते प्रत्यक्ष नाट्यगृहात जाऊन नाटक पाहिल्यावरच समजेल. रंजन आणि नयनाच्या डेली सोपसारख्या आयुष्यात अचानकच ‘कहानी में ट्वीस्ट’ येतो आणि जी धम्माल उडते ते म्हणजे ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक.

खुशखुशीत आणि काहीशा बोल्ड संवादांची जोड देत चिन्मय मांडलेकरानी नाटक आजचं ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अनेक प्रसंगात येणारे मार्मिक टोले विनोदासोबतच एक मोलाचा संदेशही देत राहतात.

Vacuum Cleaner Marathi Natak Details

नाटकाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही चिन्मय मांडलेकर यांचे असल्याने लेखकाला अपेक्षित जागा त्यांनी दिग्दर्शनात अत्यंत सुंदर पद्धतीने घेतल्या आहेत. खुशखुशीत आणि काहीशा बोल्ड संवादांची जोड देत मांडलेकरानी नाटक आजचं ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अनेक प्रसंगात येणारे मार्मिक टोले विनोदासोबतच एक मोलाचा संदेशही देत राहतात. नाटक सतत प्रेक्षकांना खेळवत राहील आणि त्याचा वेग कुठेही मंदावणार नाही याची दक्षता दिग्दर्शक म्हणून त्यांनी पुरेपूर घेतली.

Vacuum Cleaner Marathi Natak Actors

प्रियांकाच्या भूमिकेतील तन्वी पालव हिने तिच्या व्यक्तीरेखेला समजून घेतल्यामुळे ती साकारताना तिची सहजता दिसून येते. मुळात नृत्यात निपुण असल्याने तन्वी उत्तम रिदम पकडते. आईसोबत आपले आयुष्य शेयर करणारी प्रियांका तिने उत्तम उभारली. सोबत सागर खेडेकरचा शक्ती एक महत्त्वाकांक्षी तरुण होता. प्रोफेशनल आयुष्य आणि पर्सनल आयुष्य यांची सांगड घालताना होणाऱ्या चुका आणि त्यामुळे त्याची होणारी धडपड दिसत राहिली. परीक्षितच्या भूमिकेतील प्रथमेश चेउलकर यानेही त्याच्या भूमिकेतील वेगळेपण दाखवून दिले. वडिलांशी अगदीच मोजके आणि दबून बोलणारा पण आईसोबत दिलखुलास जगणारा परीक्षित त्याने उत्तम साकारला. त्याचे एका प्रसंगातील फुलवा खामकर दिग्दर्शित नृत्य लक्षवेधी होते. दोनच प्रसंगात आलेली पण लक्षात राहिलेली जलपा म्हणजेच रेणुका बोधनकर हिने जलपाचे म्हणणे किंवा तिची बाजू फार उत्तम समजावली.

सबंध नाटकात कुठेही नयनामध्ये कृत्रिम भावना दिसणार नाहीत, ह्याची पुरेपूर काळजी निर्मिती सावंत ताईंनी घेतली आहे. त्यांचा रंगमंचावरचा वावर अप्रतिम असतो आणि त्यांना पाहणे हीच रसिकांसाठी एक मेजवानी असते.

…आणि कॉमेडीक्वीन निर्मिती ताई सावंत. ताईंचे उत्कृष्ट टायमिंग आणि अफलातून संवादफेक हे सर्वश्रुत आहेच. सबंध नाटकात कुठेही नयनामध्ये कृत्रिम भावना दिसणार नाहीत, ह्याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. त्यांचा रंगमंचावरचा वावर अप्रतिम असतो आणि त्यांना पाहणे हीच रसिकांसाठी एक मेजवानी असते. दुसऱ्या अंकात खासकरून त्यांच्यातील बदल प्रयोगाची उंची वाढवणारा ठरला. सोबत होते द ग्रेट अशोक सराफ मामा. त्यांच्याबद्दल मी लिहावे इतकी माझी पात्रता मुळीच नाहीये. पण मामांना नाटकात पाहणे ही एक गोष्टच आपल्याला पराकोटीचा आनंद देते.

द ग्रेट अशोक सराफ मामा. ‘वय’ ही फक्त एक संख्या आहे आणि एका नटाची नाटकातील एनर्जी काय असते, हे पाहायचे असेल तर मामांना ‘व्हॅक्यूम क्लीनर’मध्ये पाहावेच.

‘वय’ ही फक्त एक संख्या आहे आणि एका नटाची नाटकातील एनर्जी काय असते, हे पाहायचे असेल तर मामांना ‘व्हॅक्यूम क्लीनर’मध्ये पाहावेच. निर्मिती ताई आणि अशोक मामा या जोडगोळीने दोन तास जो धुमशान धुडगूस घातला त्याला तोड नाही. दुसऱ्या अंकात दोघांनी व्यक्तिरेखेचे पकडलेले बियरींग कमाल होते. ज्यामुळे त्यांच्या वावरण्यात झालेला फरक नाटकात मज्जा आणत होता. कुठेही ओढून ताणून न बोलण्याची आणि कथेच्या प्रवाहामध्येच विनोदनिर्मिती करण्याची कला दोघांमध्ये उपजत आहेच आणि त्याच्या पुन:प्रत्यय नाटकाच्या प्रयोगात आला.

Vacuum Cleaner Marathi Natak Details

प्रदीप मुळे मामांनी त्यांच्या नेहमीच्या सुंदर कल्पकतेने एका कंपनी मालकाच्या घराचे नेपथ्य उभारले. भिंतीची रंगसंगती, उंची वस्तूंची मांडणी अतिशय उत्तम केलेली आहे. रवी-रसिक यांनी प्रसंगांना त्यांच्या प्रकाशयोजनेने अधिक महत्त्व प्राप्त करून दिले. राहुल रानडे यांनी केलेले नाटकाचे संगीत अतिशय सुंदर होते. खासकरून मोक्याच्या ठिकाणी येणारा एक खास पंचबीट खूप आवडत होता. तसेच शेवटच्या मिनिटाला सर्वानी धरलेला ताल नाटक एका उत्कृष्ट उंचीवर नेऊन संपवत होता. रंगभूषाकार उलेश खंदारे आणि वेशभूषाकार अश्विनी कोचरेकर यांच्या समर्पक संगतीचे विशेष कौतुक. अष्टविनायक नाट्यसंस्थेतर्फे आलेले हे नाटक आणि त्याचे चार खंबीर निर्माते निवेदिता सराफ, संजोत वैद्य, श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव यांचेही मन:पूर्वक अभिनंदन.

रोजच्याच झालेल्या जीवनाला जरासा ट्वीस्ट मिळाला कि नात्यात खोलवर लपलेली दु:ख सुद्धा प्रकर्षाने जाणवू लागतात. नवरा आणि बायको किंवा अगदीच स्त्री – पुरुष यांना एका फँटसीमुळे का होईना एकमेकांचे म्हणणे कळले तर नात्यातील दुरावा कायमचा नष्ट होईल. आणि ‘४४० वोल्ट’चा झटका लागल्यागत आपले नाते पुन्हा एकदा एनर्जीने भरून जाईल. हा निराळा अनुभव घ्यायला आणि दोन तास निखळ मनोरंजन मिळवायला ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटक जरूर पाहा…
सर्व टीमचे अभिनंदन आणि पुढील सर्व प्रयोगांसाठी खूप शुभेच्छा!


Vacuum Cleaner Marathi Natak Cast

नाटक : व्हॅक्यूम क्लीनर
लेखक – दिग्दर्शक : चिन्मय मांडलेकर
नेपथ्य : प्रदीप मुळ्ये
प्रकाशयोजना : रवी – रसिक
निर्माती संस्था : अष्टविनायक
निर्माते : निवेदिता सराफ, संजोत वैद्य, श्रीपाद पद्माकर, दिलीप जाधव
कलाकार : तन्वी पालव, प्रथमेश चेउलकर, रेणुका बोधनकर, सागर खेडेकर आणि निर्मिती सावंत व अशोक सराफ

🚨 Tickets Available Here 🚨


इतर मराठी नाटकांचे रिव्ह्यूज / समीक्षणे वाचण्यासाठी येथे क्लिक करा → Marathi Natak Reviews

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

1 COMMENT

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles

%d bloggers like this: