‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे विद्यार्थी असलेल्या ऋषिकेश जोशी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रभाकर वर्तक यांनी बसवलेल्या ‘अंकुर’ या एकांकिकेतून बालकलाकार म्हणून केली. कोल्हापूरमधल्या डॉ. शरद भुताडिया यांच्या हौशी नाट्यसंस्थेत त्यांनी नाटकाचे धडे गिरवले. सत्यदेव दुबे यांनी राज्यनाट्य स्पर्धेतलं त्यांचं काम पाहिलं आणि त्यांच्या शिबिरासाठी बोलावून घेतलं जिथे जोशींना दिल्लीच्या ‘एनएसडी’ची माहिती मिळाली. मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषेसह ५० हून अधिक नाटकात ऋषिकेश जोशी यांनी लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा वेगवेगळ्या विभागातून त्यांचं प्रतिभाकौशल्य सिद्ध केलं. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘संगीत लग्नकल्लोळ’, ‘मुक्कामपोस्ट बोंबीलवाडी’, ‘नांदी’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं.