“ठकीशी संवाद”
“ठकीशी संवाद” या नाटकाचा प्रयोग नुकताच नवी दिल्ली येथे मला बघण्याची संधी मिळाली. दिल्लीतील ‘पुढचे पाऊल’ या संस्थेने या नाटकाचे अतिशय सुंदर असे आयोजन केले त्याबद्दल ‘पुढचे पाऊल’चे मनापासून आभार. नाटक बघायला दिल्लीतील मराठी परिवार बहुसंख्येने तिथे उपस्थित होता. माझे आवडते लेखक सतीश आळेकर यांचे इतक्या दिवसांनी आलेलं नाटक बघण्याची संधी मला दवडायची नव्हती. कारण पुण्या-मुंबईत ती संधी सहज मिळते पण दिल्लीत मराठी नाटक पाहायला मिळणं हा एक दुग्ध शर्करा योग! तो योग सोडू नये म्हणून मी ‘ठकीशी संवाद’ बघायला आवर्जून गेलो.
सतीश आळेकर म्हणजे मराठी प्रायोगिक रंगभूमीवरचे एक गाजलेले नाटककार. बेगम बर्वे, मिकी आणि मेमसाहेब, महानिर्वाण आणि महापूर सारखी दर्जेदार नाटक लिहिणारे. ‘ठकीशी संवाद’ हे आळेकरांनी खूप वर्षानंतर लिहिलेले नाटक. त्यामुळे सहाजिकच ‘ठकीशी संवाद कडून खूप अपेक्षा होत्या आणि नाटक बघितल्यावर एक अतिशय सुचक आणि मार्मिक अशी कलाकृती अनुभवायला मिळाली याचा आनंद झाला. तसेच एक अस्सल “आळेकरी धाटणीचं” नाटक बघितलं याचे समाधान मिळाले.
सुव्रत जोशी आणि गिरीजा ओक यांचा कसदार आणि तितकाच दर्जेदार अभिनय, अनुपम बर्वे यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन, म्हणजे आळेकरांच्या विशिष्ट शैलीतल्या संहितेला रंगमंचावर अतिशय प्रभावीपणे सादर करण्याचे इंद्रधनुष्य तरुण दिग्दर्शक अनुपम बर्वे यांनी लीलया पेलले याची प्रचीती नाटक बघताना आली. सोबतच उत्कृष्ट कथानक, प्रभावी आणि उत्कंठावर्धक संवाद, त्याला साजेसे नेपथ्य आणि ध्वनी-संगीत तसेच अप्रतिम प्रकाशयोजना आणि सर्जनशील, समर्पक असा रंगमंच या सर्व बाबींमुळे ‘ठकीशी संवाद’ हे नाटक एका वेगळ्याच उंचीवर गेले आहे. वाह.. क्या बात है! मला नाटक खूप आवडले आणि म्हणूनच ‘ठकीशी संवाद’च्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
तर नाटकाची सुरुवात होते कोरोना काळापासून म्हणजेच कोविड-19 चा काळ. ज्या काळात लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि क्वारंटाईन जगावर अचानक लादले गेले. मग त्यातून उद्भवलेला एकाकीपणा. एक पंच्याहत्तर-ऐंशी वर्षांचा वयस्कर वृद्ध या नाटकाचा नायक. बरं! हा नायक कुठल्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो? तर या नायकाचा जन्म स्वातंत्र्योत्तर काळातला आणि त्याचे वडील १९४२ च्या आंदोलनामध्ये स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्यात तुरुंगवास सोसून आलेले आणि हा नायक सुद्धा स्वतः १९७५ च्या आणीबाणीत सहभाग घेऊन स्वतःची अशी वेगळी ठाम आणि ठोस भूमिका घेतलेला. म्हणूनच हा नायक स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. मध्यमवर्गीय समाजमनाचा मागोवा घेत आजच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिस्थितीवर केलेले परखड भाष्य म्हणजे ‘ठकीशी संवाद’.
COVID-19 सारख्या भयाण पँडेमिकमुळे आलेला एकलकोंडेपणा.. तो घालवण्यासाठी त्या वृद्धाला पडलेले अनेक प्रश्न. तर प्रश्न कोणते? करमणुक म्हणजे काय? ती कशी करावी? स्वतःचे अस्तित्व विसरायला लावणारी गोष्ट म्हणजे करमणूक म्हणावी का? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा नायक प्रयत्न करतो. मग त्या प्रश्नांच्या शोध घेण्यासाठी नायक संवाद तरी कुणाशी साधणार? त्यामुळे नायकासमोर स्पेस म्हणजे एक मोठी पोकळी निर्माण होते आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी नायक एक संशोधन हाती घेतो, आणि त्यातूनच मग पुढे एक अतिशय भन्नाट अन अफलातून ‘करगोटा पुराण’ जन्माला येतं. नायकाशी संवाद साधण्यासाठी एक सुंदर स्त्री म्हणजे ठकी तिथे येते. मग नायक एकटेपणा घालवण्यासाठी त्या ठकीशी संवाद साधतो. बरं ही ठकी कोण? ही ठकी म्हणजे कोणी एकेकाळी खेळण्यात असणारी ती लाकडी बाहुली की अजून कोण? राम गणेश गडकरी यांची ठकी की आजच्या काळातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून जन्माला आलेली ती ‘अलेक्सा वा सिरी किंवा एक AI रोबोट की अजून काही…अनडीफाइंड की त्या मध्यमवर्गीय भावविश्वाची सखी! त्या वयस्कर वृद्धाची मग ती कोण? ती कधी नर्स बनून तर कधी केअरटेकर बनून तर कधी मुलाखत घेणारी, नायकाला कोर्टाच्या कचेरीत उभे केल्यासारखी बेधडक प्रश्न विचारणारी ठकी.
आज आपण सगळे ई-विश्वात जगतोय आणि ई-विश्वात आता बऱ्याच ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नकळतच जागा घेतली आहे. तर ती ठकी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रतिनिधित्व करणारी आहे का ? नाटकाच्या अगदी सुरुवातीला एक पंच्याहत्तर-ऐंशी वर्षांचा वयस्कर वृद्ध म्हणजेच नाटकाचा नायक रंगमंचावर प्रवेश करतो आणि म्हणतो की, “माणसाला कणा असतो तो वाकलेला असतो की सरळ? आणि तो वाकलेला असलाच तर त्याच्यापुरता तो त्याला सरळ वाटत असेल तर..? या डायलॉगने नाटकाची सुरुवात होते आणि मला वाटते आळेकरांच्या संहितेमधील ह्याच ‘स्टॅन्डआऊट लाईन्स’ आहेत. २०१४ नंतरचा बदललेला भारत, झालेले राजकीय ध्रुवीकरण, झालेले सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक बदल आणि तेव्हापासून व्यक्त होणे कमी झाले. कुणाची ठाम मतच उरली नाहीत. म्हणजे माणसाला स्वतःचं मत असावं की नको? तुमची भूमिका काय? तुम्ही डावीकडे झुकला आहात की उजवीकडे? की फक्त कोणाला दुखवू नये म्हणून घेतलेली भूमिका.. किंवा कोणाची नाराजी नाही याची घेतलेली विशेष काळजी.. म्हणजे शेवटी नाईलाजाने तुम्ही सुद्धा या ‘सायलेंट मेजॉरिटी’चाच भाग झालात का? तुमच्यामध्ये व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस उरले नाही आहे का? तुम्ही कधी टोकदार भूमिका घेतली आहे का? असे अनेक प्रश्न पुढे ठकी नायकाला विचारत राहते. त्या ठकीचे वारंवार बदलणारे पात्रे, तिची दिलखेचक देहबोली, तिने साधलेले संवाद, शब्दांची फेक आणि आवाजातील चढ-उतार निव्वळ अप्रतिम आहे.
रंगमंचावरची मांडणी सुद्धा अतिशय आगळीवेगळी… अतिशय प्रभावीपणे ती स्पेस हुशारीने सजविली आहे. एक विलक्षण, सृजनशील आणि सर्जनशीलतेचा देखावा उभा केलाय. म्हणजे आजच्या ऑनलाइन शॉपिंगच्या जमान्यातील ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या विविध कंपन्यांतून ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या लहान-मोठ्या बॉक्सेस एकमेकांवर नीट रचवून तयार केलेला रंगमंच.. टेबल–खुर्ची, शिलाई मशीन, पुस्तके, टेबल लॅम्प आणि वैद्यकीय उपकरणे.. तो रंगमंच म्हणजे आपल्या जीवनातील अडगळ. घरात जश्या आपण अनेक गोष्टी साठवून ठेवतो, काही कारण नसताना नको असलेल्या वस्तू सुद्धा जमा करून ठेवतो अगदी तश्या आणि त्यामध्ये उभी असणारी एक आयताकृती स्क्रीन म्हणजे पांढरा पडदा अगदी मोबाईल सारखा दिसणारा. त्यावर दिसणारे ते सोशल मिडियाचे व्हाट्सअप चॅट. म्हणजे त्या पांढऱ्या पडद्याचा मोबाईल स्क्रीनसारखा केलेला अतिशय प्रभावी वापर. मध्ये-मध्ये येणारे ऑडिओ व्हिज्युअल् इफेक्ट्स… सुप्रसिद्ध मराठी-हिंदी गाणी जसे की, ‘मेरा नाम चीन चिन चू’, ‘आपकी नजरो ने समझा’ अनेक जुनी भावगीते आणि नाट्यगीते यांचे सादरीकरण, तर व्ही. शांताराम पासून ते जग हे बंदीशाला पर्यंत… स्क्रीनच्या माध्यमातून दाखविले गेलेले अनेक व्हिडिओज म्हणजे सावरकरांचं ते अजरामर काव्य ‘जयोस्तुते’ द्वारे ग्लोबलायझेशनचे परिणाम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पार्श्वसंगीत पण उत्तम.. जेव्हा दिवाकर यांचे निधन होते तेव्हा एखादी काच फुटल्याचा आवाज येतो. तसेच मोबाईल स्क्रीनवर सुलोचनाबाईंचे एकटी चित्रपटामधील ‘लिंबलोण उतरू कशी’ हे गाणे चालू असताना ठकी सुद्धा शिलाई मशीनवर तेच गाणे म्हणत असते. त्यांच्या ओठांच्या हालचाली हुबेहूब जुळणे केवळ अफलातून!
आजकाल इंटरनेट मधून वाढलेला प्रचंड माहितीचा भडीमार आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या असंख्य शक्यता आणि आव्हाने .. त्यातून निर्माण झालेल्या समस्या, मोबाईल ॲप्सचे आभासी जग, त्या सगळ्यांचे झालेले मानवी जीवनावर अतिक्रमण. कारण आपण सगळेच आज ई-विश्वात जगत आहोत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर कसा प्रभाव झालेला आहे? सोशल मीडिया सारख्या आभासी जगात माणूस कसा गुरफटून गेला आहे? कसा गुदमरून गेला आहे? याचे उत्तम उदाहरण यात दाखविले आहे. रंगमंचावरील उत्कृष्ट मांडणी म्हणजे नायकांसाठी एन्ट्री एक्झिटचे वेगळे गेट, अतिशय सुसज्ज आणि समर्पक अशी प्रकाशयोजना, बाजूला ठेवलेले शिलाई मशीन, वैद्यकीय उपकरणे आणि व्हीलचेअर वर बसलेला तो नायक.. या सगळ्या परिप्रेक्ष्यातून नायकाची झालेली घुसमट आणि घालमेल.. मग तो एकटेपणा घालवण्यासाठी स्वतःची अशी एक नवीन स्पेस निर्माण करतो. ती ओपन स्पेस मग त्याच्या संशोधनाची जागा घेते, त्यातूनच पुढे ‘करगोटा पुराण’ येतं. ती पोकळी भरून काढण्यासाठी, संवादासाठी ती ठकी कधी नायकाची मैत्रीण, तर कधी केअरटेकर, तर कधी नर्स बनून तिथे नायकाशी संवाद साधत राहते.
ती ठकी स्वतःच प्रेक्षकांना प्रश्न विचारते की, मी कोण आहे असं तुम्हाला वाटतं? आणि ही ठकी कोण हे नाटकाच्या शेवटापर्यंत येताना प्रेक्षकांना कळून चुकते. शेवटचा जो प्रसंग दाखवला आहे त्यामध्ये मोबाईल स्क्रीन परत चालू म्हणजेच रिबूट होताना दिसते आणि ठकी परत त्या बॉक्सेसमधून आपल्या नव्या मोहिमेला जाण्यासाठी तयार होत असते, परत एका कुठल्यातरी नव्या कोरोनाग्रस्त वा कोरोनाबळीकडे जाण्यास एका रोबोटसारखी सज्ज होते. वयस्कर वृद्ध नायक जो पुढे कोरोनाग्रस्त झालाय आणि लॉकडाऊनमुळे घरी व्हील चेअरवर अडकून पडलाय. त्याच्या सभोवताली आहेत वैद्यकीय उपकरणे.. N-95 मास्क, हँड सॅनिटायझर्स, डिस-इनफेक्टंट, हॅन्ड ग्लोव्हज, पीपीई किट्स, ऑक्सिमीटर, फेस शील्ड, रेस्पिरेटर, प्रोटेक्शन क्लोथ्स आणि ते ग्रीन, रेड, ऑरेंज झोन्स या सगळ्यांमध्ये गुरफटलेला… त्यातून एका मध्यमवर्गीय समाजमनाचा घेतलेला मागोवा.
‘ठकीशी संवाद’ म्हणजे केवळ नायक आणि ठकी यांच्यातील संवाद नव्हे तर तो प्रेक्षकांशी सुद्धा आहे. तो संवाद विचार करायला लावणारा आहे. आजच्या समाजमनाचा खरा आरसा दाखविणारा आहे. कारण एक वयस्कर वृद्ध आणि त्याच्याशी गप्पा मारणारी ती ठकी… यांच्यातील संवाद हा प्रेक्षक आणि पात्रांमधील जी एक ‘थिन ईमॅजिनरी लाईन’ आहे, ती दूर करतात, दरी भरून काढतात. कारण मध्ये-मध्ये ती पात्रे सुद्धा थेट प्रेक्षकांची संवाद साधतात. सतीश आळेकरांना काय म्हणायचं आहे ते नाटकात सदैव जाणवत राहतं आणि त्यातील संवाद हे आपल्याला अंतर्मुख करायला लावणारे आहेत. आळेकरांचा राजकीय हस्तक्षेप तर नाही ना! तो एक पॉलिटिकल डिस्कोर्स आहे का? हा प्रश्न आपल्याला नाटक बघताना भेडसावत राहतो.
सुव्रत जोशी आणि गिरिजा ओक यांनी तितक्याच ताकतीने ‘ठकीशी संवाद’ प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. खरंतर हे नाटक जवळपास दोन तासांचे एक दीर्घांक आहे आणि पात्र ही फक्त दोनच! ती पात्रे एकमेकांशी तर कधी प्रेक्षकांची संवाद साधतात. त्यात टिपिकल आळेकरी शैलीचे मोठ-मोठे मोनोलॉग्स येत राहतात. या नाटकातील नायक हा सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत एकाच वेषात दाखवलाय. एकाच भूमिकेत, पण ठकी मात्र अनेक भूमिकेत दाखविली आहे. म्हणजे जेव्हा ती पहिल्यांदा प्रवेश करते तेव्हा ती साडीत असते, सुंदर नाथ घातलेली, मग थोड्यावेळाने ती अगदी स्किन टाईट असा ड्रेस घालून येते तर कधी पांढरा झगा घालून येते. तिची बदलणारी भूमिका नाटकाला एका वेगळ्या आशयापर्यंत घेऊन जाते. ठकी नायकाला नेहमी ‘धनी’ म्हणते. ही ठकी मध्यमवर्गीय भावविश्वाची एक सखी. ठकी एक काल्पनिक पात्र, जे भावनाशून्य तर कधी भावनाप्रधान, नायकाच्या अगदी शेवटच्या क्षणाला स्थितप्रज्ञ राहून एका सामान्य मृत्यूला सामोरे जाते.
या नाटकामध्ये अख्या शंभर वर्षांचा इतिहास कवेत घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. म्हणजे 2017 साली आलेला स्पॅनिश फ्लू ते आता आलेला कोरोना COVID-19. मध्ये-मध्ये येणारे अनेक सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भ. ‘करगोटा’ नावाची अतिशय साधी अशी शुल्लक गोष्ट! एक मेटाफर.. जे अतिशय उत्कृष्टरीत्या ‘सटायर’ म्हणून कमरेला बांधायच्या दोरीच्या तुकड्याला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त करून दिले आहे. म्हणजे अगदी स्थानिक, राष्ट्रीय पातळीवरून थेट जागतिक पातळीवर त्या करगोटाचा कसा प्रभाव आहे ते नाटकात ज्या प्रोफेशनल पावर पॉइंट प्रेझेंटेशनमधून दाखवले गेले आहे. ते खरंच खूपच विनोदी आणि व्यंगात्मक आहे. त्यामध्ये करगोट्याला अँथ्रोपोलॉजिकल युनिव्हर्सल दर्जा देत थेट अलेक्झांडर द ग्रेट पासून ते जगातील अनेक संस्कृती, प्राचीन, अतिप्राचीन आणि वैश्विक म्हणजे मोहेंजोदारो ते आजच्या काळापर्यंत… जागतिकीकरण, चीनचे आव्हान पर्यंत त्या करगोट्याचे धागेदोरे बांधले गेले आहेत. जागतिक परिस्थितीवर भाष्य करणारे आणि तरीही अस्सल देशी, ग्रामीण म्हणजे आपल्या मातीची घट्ट असलेले समकालीन नाटक म्हणजे ‘ठकीशी संवाद’.
नाटकात येणाऱ्या अनेक ऐतिहासिक गोष्टींचा उल्लेख, वेदिक काळापासून ते ग्रीक रोमन काळापर्यंत तसेच मोहेंजोदारो सारख्या अनेक संस्कृतींचा उल्लेख, शिवाजी महाराज, स्वातंत्र्य लढ्यामधील अनेक घटनांचा उल्लेख, अचानक १९७५ ला आलेली आणीबाणी, पुढे 1990 नंतर आलेला चंगळवाद, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण त्यामुळे बदललेले जगण्याचे निकष आणि या सगळ्यांमधील एक दुवा तो म्हणजे करगोटा. १९९२ चा बाबरी मशीद विध्वंस, मुंबई बॉम्बस्फोट आणि आणखी बरेच काही.. करगोट्याला प्रतिमाकात्मक रूप देऊन त्यातून इतिहास आणि वास्तव यांचा सुरेख मेळ लेखकाने घालून दिलाय. तो इतिहास – भूगोल आणि वर्तमान काळाला जोडणारा एक रेशीम धागा आहे. नाटकात अतिशय व्यंगात्मक विनोदांद्वारे सादर केलेले करगोटा पुराण आहे.
खरंतर कुठेतरी लेखकाची प्रख्यात व्यवस्थेविरुद्ध असलेली प्रचंड नाराजी. २०१४ नंतरचा मोदी-शहांचा बदललेला भारत, त्यात झालेले राजकीय ध्रुवीकरण, राज्यसंस्थेची होणारी दडपशाही, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश सारख्या अनेक बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या झालेल्या हत्या, दरम्यान अनेक घोषित करण्यात आलेले अर्बन नक्षल आणि स्वतःची ठोस भूमिका न घेता एका ‘सायलेंट मेजॉरिटी’चाच हिस्सा झालेला आजचा वैचारिक वर्ग. सोबतच आलेला कोविड-19 च्या काळात झालेली घुसमट आणि कुठेतरी सशक्त लोकशाहीची होणारी हुकूमशाही कडे वाटचाल असे एकूणच अनेक गोष्टी ‘ठकीशी संवाद’ मध्ये प्रकर्षाने येतात. तेव्हा मला तर रविश कुमार, ध्रुव राठी आणि वरून ग्रोवर यांच्यासारख्या आवाज उठाविणार्यांचे चेहरे आठवत होते.
राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज एकच प्याला, प्रेम सन्यास, भावबंधन सारखी प्रसिध्द नाटके लिहिणारे,आणि त्यांचे जिवलग मित्र एकांकीकाकार, नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे उर्फ दिवाकर यांच्या मैत्रीचे अनेक किस्से, तपकीरचा गमतीशीर संदर्भ आणि विनोदात्मक संवाद नाटकात येतात. १९१७ साली पुण्यात आलेली स्पॅनीश फ्लूची साथ, तेव्हा गडकरींना कळून चुकते की आता आपण यातून काही बचावणार नाही. तशी त्यांना मृत्यूची चाहूल लागली असते. तेव्हा गडकरी दिवाकर यांना म्हणतात की, माझी परिस्थिती आता गंभीर आहे. आता माझं मन काही पुण्यात लागत नाही. म्हणून ते स्वतःच्या गावी सावनेरला निघून जातात. जाताना एक लाल रंगाचं पाकीट दिवाकरच्या हातात ठेवून जातात. आणि दिवाकरला एवढंच सांगतात की, माझ्या मृत्युनंतरच ते पाकीट उघडशील. पुढे १९१९ च्या दरम्यान गडकरींचा मृत्यू होतो. नंतर दिवाकर ते पाकीट उघडतात. तर काय असतं त्या पाकिटात? एक करगोटा, कंबरेला बांधायचा धागा. दिवाकर यांना कळून चुकते की हा गडकरींचा करगोटा आहे.
आळेकरांनी अतिशय साधी अशी शुल्लक गोष्ट कमरेला बांधायच्या त्या दोरीच्या तुकड्याला एक मोलाचे ऐतिहासिक महात्म्य प्राप्त करून दिले आहे. दिवाकरच्या हाती गवसलेल्या लाल पाकिटाचा प्रवास खूपच रंजक आणि गमतीदार आहे. पुण्यातील अनेक सुंदर स्थळांचा त्यात उल्लेख आहे शनिवार पेठ, कसबा पेठ, ओंकारेश्वर, मुळा-मुठा नदी ते अम्य़ुझमेंट थीम पार्क, पॅरीसमधील ल्युव्ह्र म्युझियम पर्यंत जगाच्या पटलावर उमटलेले करगोटा.. तो आपल्याला अनेक जागतिक इतिहासाचे दाखले देतो सोबतच मानववंशशास्त्रीय वैश्विकाचा कुठेतरी संदर्भ सुद्धा जोडल्या गेला आहे. पुढे दिवाकर ते लाल रंगाचं पाकीट पुण्यातील नूतन मराठी विद्यालयातील शिक्षक वि. वि. बोकील यांना देतात. नंतर ते पाकीट त्यांचे विद्यार्थी विजय तेंडूलकर आणि दि. बा. मोकाशी यांच्या हाती पडते. शेवटी ते पाकीट कथेच्या नायकाच्या पदरी येऊन पडते. त्या करगोट्याच्या प्रवासातून घेतलेला इतिहासाचा मागोवा… म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट पासून हिटलर, नेहरू,गांधी, टिळक, टागोर ते आईनस्टाईन, आजच्या काळातील अटल बिहारी वाजपेयी, मोदी-शहा पर्यंत येऊन पोहोचतो. त्यात गेल्या शंभर वर्ष्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय स्थित्यंतराचा आढावा घेण्याचा एक यशस्वी प्रयत्न केला गेला आहे. अतिशय प्रभावी सादरीकरणामुळे करगोटा पुराण प्रेषकांचा मनाचा ठाव घेते.
आळेकरांच्या या संहितेतील अबसर्ड विनोद समाजमनाचे आणि मानवी स्वभावाचे केलेले टोकदार निरीक्षण अनेक पातळ्यांवर रचलेला आशय आणि वैशिष्ट्यपूर्ण कृतीबंद म्हणजे ठकीशी संवाद. पोस्ट ट्रुथ वर्ल्ड नंतरचा बदलेला भारत. खरी वस्तुस्थिती काय? ती वास्तविकता सांगण्याचा प्रयत्न. सामाजिक उतरंड म्हणजे ‘सोशल स्ट्राटिफीकेशन’ कसं बदललं? आधी आपले सोशल फॅब्रीक हे ‘कलरफुल’ होते पण आता ते ‘ब्लॅक अँड व्हाईट’ होत चालले आहे हे आळेकर ठकीशी संवाद मधून प्रेषित करतात. आळेकर यांनी अनेकदा ‘ठकीशी संवाद’चे वाचन सुद्धा केले आहे.
ठकीशी संवाद मध्ये रियालिजम आणि अब्सर्डिझम यांतील द्वंद्व, कॉमेडी आणि ट्रॅजेडी यातील संवाद अधोरेखित होतो. तसेच निरर्थकता आणि अर्थपूर्णता यातील तणाव, काळ आणि इतिहास, कल्पना आणि वास्तव यातील संघर्ष दाखविलेला आहे. सायलेंट मेजॉरिटी आणि अर्बन नक्षल यावर लेखकाने कटाक्षाने ताशेरे ओढलेले आहे. खरंतर आळेकर यांना काय म्हणायचे हे त्यांच्या टोकदार टिप्पणीतून दिसतंच आणि त्यांची संहिताच इतक्या ताकदीची आहे, लिखाणाची शैली इतकी वेगळी आहे की संवाद थेट मनाला भिडतात आणि अंतर्मुख करायला लावतात. तेव्हा ‘सखाराम बाईंडर आणि घाशीराम कोतवाल’ची आठवण झाली, विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार आठवलेत.
शेवटी, मला खंत एवढीच वाटते की, आजची तरुण पिढी अशी प्रायोगिक नाटके बघत नाहीत. ती त्यांनी बघायला हवीत अशी आशा आहे आणि ‘ठकीशी संवाद’ हे नाटक तर आवर्जून बघायला हवे. ‘ठकीशी संवाद’ हे पुस्तक मिळवून ते वाचण्याचा माझा कयास असेल. परत एकदा ठकीशी संवाद’च्या टीमला मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!
जय हिंद!
: डॉ. चेतन शेलोटकर
असिस्टंट कमांडण्ट CRPF