Kshitish Date Interview • Me vs Me Marathi Natak

Shilpa Tulaskar Interview • Me vs Me Natak

Me vs Me Natak Promo – Kshitish Date




— जाहिरात —
मी vs मी” – एक वेगळा नाट्यानुभव! ”
मराठी नाटकांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. मीही त्यातलाच एक. नाटक बघण्याआधी नाटकाविषयी जाणुन घेणे मला आवश्यक वाटते. यात थिएटरमध्ये घालवणार असलेल्या तीन तासांचा हिशोब तर मनात असतोच. पण त्याबरोबरच आजकालच्या ‘एक नाटक म्हणजे कमीतकमी हजार बाराशे रुपयांचा विनीयोग’ पचनी पडेल ना? ही काळजी पण त्याबरोबर असते. सरसकट येईल ते नवे नाटक पाहिलेच पाहिजे असा अट्टाहास कधीच नसतो.
त्यातही नाटकांचे काही काही ट्रेंडस ठरलेले असतात असा माझा समज आहे. म्हणजे प्रशांत दामलेंचा एक ट्रेंड, संतोष पवार चा एक, भरत जाधवचा एक असे काही ट्रेंडस अभिनेत्यांच्या नावाला चिकटून गेलेले असतात. मग त्याच त्याच धाटणीची नाटके पहात गेले की मनात कुठेतरी तोच तो पणाची भावना नकळतपणे घर करुन असते. काही नाटके थोड्याबहुत प्रमाणात बदल करतातही. तर नवीन नाटक बघण्यासाठी निवडतांना काहीतरी वेगळं बघायला मिळेल का हा चोखंदळपणा नेहेमीच मनात असतो. ‘मी vs मी’ बघायला जाण्याआधी या वेगळेपणाची खात्री होती. कारण क्षितीश दाते या आमच्या तरुण मित्राने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पणासाठी निवडलेलं हे नाटक आहे याची कल्पना होती. क्षितीश आमच्या परीमलचा SP पासूनचा खास मित्र! त्यामुळे त्याच्या नाटकाविषयीची उत्सुकता पण होतीच.
नाटक सुरु झालं तेच रंगमंचावरील क्षितीश च्या पाठमोर्या स्पॉटलाईटमधील फ्रेमने…. इथून सुरु झालेला नाटकाचा प्रवाह शेवटपर्यंत मनावर वाहता ठेवण्यासाठी नाटकाची संहिता, दिग्दर्शन, अभिनय, ध्वनि संयोजन, प्रकाश योजना आणि नेपथ्य या नाटकाच्या सर्वच अंगांनी जी काही देखणी कामगिरी केली, ती निश्चितच माझी वेगळेपणाची अपेक्षा पुरेशी पुर्ण करणारी ठरली.
सायको थ्रिलर या प्रकारात मोडणारं हे नाटक प्रेक्षकांचं कुतुहल शेवटपर्यंत टीकवून ठेवण्यात यशस्वी झालं आहे. रहस्य किंवा गुढ ही मध्यवर्ती कल्पना असली तरी हे रहस्यमय नाटक नाही. एका बाजूला मनाची स्थित्यंतरे आणि अस्वस्थता तर दुसरीकडे अनुभवातून आलेली आयुष्याची समज यामधून हे नाटक प्रवास करतं. हा प्रवास कोडं या स्वरुपात आपल्या समोर येत रहातो आणि हळुहळु ते कोडं सावकाश उलगडत जातं. अर्थात ही कोडी आहेत ती नात्यांमधल्या ताणतणावांची.
आपल्या अगदी जवळची नाती असतात ती म्हणजे आपल्या कुटुंबातली नाती. या नात्यांपैकी वडील आणि तरुण मुलाच्या नात्यातला तणाव, समज, गैरसमज, दुरावा, ओढ, प्रेम, तिरस्कार, कटुता, संकोच, ममत्व, राग लोभ अशा खुपशा भावनांची सरमिसळ इथे मांडलेली आहे. सहसा एक अंतर राखुन असलेलं बाप-लेकाचं नातं मनमोकळ्या संवादाच्या अभावामुळे अनाकलनीय आणि पराकोटीच्या तिरस्कारापर्यंत जाऊन पोहोचतं. त्यातून आलेल्या नैराश्याचा भस्मासुर एक फुलण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आयुष्याला जाळून टाकायला निघतो. या भावनिक कोड्याची उकल वेगळ्या धाटणीने प्रेक्षकांसमोर मांडणारं हे नाटक आहे.
यात अनेक टेक्निकल गोष्टी खुप समर्थपणे सांभाळण्यात नाटकाची बॅकस्टेज टीम यशस्वी झाली आहे. नाटकाचे नेपथ्य नेत्रदीपक आहे. विशेषतः रंगमंचावरील सरोवरामधील शिकारा, बर्फवृष्टी, निळे आकाश, नौकाविहार हे लक्षात रहाते. एकुण सहा सात वेगवेगळ्या रंगमंच व्यवस्था सफाईदार पणे नेमक्या वेळात बदलण्याची कसरत बॅकस्टेज टीमने समर्थ पणे केली आहे. त्यासाठी या टीमचे विशेष कौतुक.
या नेपथ्यरचनांना साजेशी प्रकाशयोजनासुद्धा मनात भरणारी आहे. एकंदरीत उच्च निर्मितीमूल्ये असलेले हे एक देखणे नाटक आहे. रंगमंचावर बॅटरी ऑपरेटेड व्हिल चेअर लिलया वापरण्यात आली आहे. तलावाच्या थंड पाण्यावरचा धुक्याचा पडदा आणि ढग हे पण प्रेक्षणीय. नाटक पहातांना सिनेमॅटीक दृश्यांचा परीणाम दाखवायचा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे.
अभिनयात आमच्या क्षितीशने पुर्ण नाटकात बाजी मारली आहे यात शंकाच नाही. हा एक गुणी कलाकार आहे आणि त्याच्या जॉनरला साजेशी भुमिका त्याला मिळाली आहे. नैराश्याने ग्रासलेल्या अस्वस्थ तरुणाची घालमेल दाखवण्यात त्या कमालीचा अभिनय केला आहे. तगमग वाढल्यावर होत असलेली ह्रदयातली धडधड, हातापायांमधला कंप, थरथर, औषधाच्या गोळ्या घेतांना झालेली अस्वस्थ धावपळ, चेहेऱ्यावर वेगवेगळ्या प्रसंगी येत गेलेले भावनिक बदल हे सारं क्षितीशने खुप छान सादर केलंय. माझ्या मते तो ही भुमिका जगला आहे. ह्रषिकेश जोशी हे तर कसलेले अभिनेते आहेत. त्यांचा रुबाब आणि बाज त्यांचा रंगमंचावरील वावर आणि संवादांच्या धाटणीवरुन कळतो. काही प्रसंगात ते भाव खाऊन जातात. त्यांची अभिनयातली सहजता लक्षात रहाते. काही ठीकाणी अजून जास्त संयत आणि शांत संवादफेकीची आवश्यकता होती असं वाटून गेलं. हालचालींमधे पण प्रथितयश डॉक्टरांमधे आपोआप येत गेलेला पोक्तपणा हवा होता.
शिल्पा तुळसकरांनी आपल्या भुमिकेला योग्य असा परीपक्व न्याय दिला आहे. व्हिल चेअर वर हालचाली न करता रंगमंचावर वावरणे यातली सहजता त्यांनी अचूक दाखवली आहे.
दिग्दर्शन आणि लेखन केलेले सचीन जमखिंडी यांचा रंगभूमीला काहीतरी नवे देण्याची धडपड या नाटकातून निश्चितच दिसते. त्यांच्याकडून यानंतरही अशाच ट्रेंडबदल असणाऱ्या एकाहून एक सरस कलाकृतींची अपेक्षा वाढवणारे हे नाटक आहे.
नेहेमी चार घटका करमणुकीसाठी खुसखुशीत विनोद आणि पंचेस, दर पाचव्या मिनिटाला हंशा अशाच नाटकांची आवड असणाऱ्या बहुसंख्य मराठी नाट्यरसीकांना हे नाटक तितकेसे भावणार नाही. पण काहीतरी वेगळे पहाण्याची भुक असणार्या नाट्य वेड्या रसीकांची भुक ‘मी vs मी’ ने नक्की भागेल.
• लेखक: संजय जमखंडी
• दिग्दर्शक: संजय जमखंडी
• कलाकार: क्षितीश दाते, शिल्पा तुळसकर, चिन्मय पटवर्धन, महेश सुभेदार, दिनेश सिंह, आणि हृषिकेश जोशी
• नेपथ्य: संदेश बेंद्रे
• प्रकाश: अमोघ फडके
• संगीत: समीर म्हात्रे
• वेशभूषाकार: तृशाला नायक
• निर्माते: भारत नारायणदास ठक्कर, प्रवीण भोसले
• सूत्रधार: दीपक गोडबोले
• कार्यकारी निर्माता: प्रणत भोसले • गीतकार: अभिषेक खणकर • रंगभूषा: राजेश परब • ध्वनी आरेखन: मंदार कमलापूरकर • सहाय्यक दिग्दर्शक: संदेश दुग्जे, व्यवस्थापक: प्रसाद खडके
महेश सोनवणे. पुणे.
9420696264
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
You must be logged in to submit a review.