Bhumika Marathi Natak Video
Natak Scene Previews & Artist Interviews

Subscribe to रंगभूमी.com on YouTube to know more about Bhumika Marathi Natak.
Natak Scene Previews & Artist Interviews

Subscribe to रंगभूमी.com on YouTube to know more about Bhumika Marathi Natak.
— जाहिरात —
अतिशय आशयघन, विचारप्रवर्तक, सच्ची भूमिका निभावणारं नाटक. आपले घासून गुळगुळीत, मुलमुलीत झालेले विचार परत धार काढून देणारं.उत्तम अभिनय, पात्रयोजना, नेपथ्य, संगीत. सर्व मनपसंत आणि अस्वस्थ करणारेही!!
रविवार, ११ मे २०२५ ला कोथरूडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरात सादर झालेला ‘भूमिका’ नाटकाचा प्रयोग शुभारंभाचा होता की पुण्यातला पहिला होता की आणखी काही हे ठाऊक नसले तरी, या प्रयोगाची जाहिरात बघताक्षणी, ‘मना’ने बुद्धीशी मसलत न करता हे अनुभवण्याचा निर्णय परस्पर घेतला होता हे पक्के आठवतेय. चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर, क्षितिज पटवर्धन या प्रलोभनांपेक्षा सगळ्यात मोठे आकर्षण होते नाटकाचा आशय-विषय.
नाटक सुरु झाल्यापासून, प्रत्येक कलाकाराच्या प्रवेशाने, त्याच्या-तिच्या सादरीकरणाने, लेखक-दिग्दर्शक-तंत्रज्ञ या साऱ्यांनी उत्तरोत्तर साधलेली कमाल यामुळे प्रसंगागणिक वाढत जाणारी अस्वस्थता नाटकाच्या शेवटाकडे शिगेला पोहोचली तेव्हा तिची झिंग तुरिया अवस्थेस प्राप्त झाली होती. खरे तर तेव्हाच या नाटकाबद्दल मिळालेल्या पहिल्या संधीवर लिहायचे असे ठरवले होते, आज ४ महिन्यांनंतर सॅबीच्या रसग्रहणाच्या रूपाने ती संधी मिळाली.
पुण्यासारख्या ठिकाणी मंचावर ‘वेगळे’ प्रयोग झाले नाहीत असे म्हणणे म्हणजे मुंबईकर घड्याळ बघत नाहीत म्हणण्यापैकी आहे. पुण्याच्या रंगावकाशाने प्रच्छन्न पुणेरी ‘घाशीराम कोतवाल’ पासून, ‘बेगम बर्वे’, ‘उत्तररात्र’, ‘लाईट्स आउट’, ‘गाईच्या शापाने…’(उपेंद्र लिमयेच्या पदार्पणाची एकांकिका), ‘मि. बेहराम’, ‘महापूर’, ‘काही अडलंय का?’ असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न विचारणारे प्रयोग बघितले आणि त्यातून अनेक गुणी कलाकारांना मंचावतरणाची संधी देखील दिली. एव्हढेच नव्हे तर रंगमंचालाही अवकाश, समीप, खुला, कलाघर, अंगणमंच आणि आता द बॉक्स अशी विवीधरंगी रूपं पुण्यातच मिळाली. त्यामुळे पुण्याला ‘वेगळे’पण नवीन नाही आणि प्रयोग करून बघण्याची एलर्जीही नाही. किंबहुना एकाच वेळी व्यावसायिकपेक्षा अधिक प्रायोगिक कलाविष्कार घडविणारे दुसरे ठिकाण निदान महाराष्ट्रात तरी नसावे.
‘भूमिका’चे वैशिष्ट्य म्हणजे, क्षितिज म्हणाला तसं, ते प्रायोगिक-व्यावसायिक रंगमंचाच्या अवकाशावर अधिकार सांगतं. आशय-विषय प्रायोगिकशी नातं सांगणारा पण सादरीकरण पक्कं व्यावसायिक अशी ही संधी… कलाकृतीने साधलेली आणि प्रेक्षकांना दिलेली. संहिता परखड आणि निर्दोष करण्यामागची तीन-साडेतीन वर्षाची मेहनत, सखोल अभ्यास जाणवतोच पण त्यापेक्षाही लेखकाची विषयाची प्रचिती थेट भिडते, कुठल्याच फिल्टरशिवाय.
अभिनयाबद्दल फार काही बोलण्याची गरज नाही कारण कसलेल्या कलाकारांनी नवोदितांना घरातल्या वडीलधाऱ्यांच्या भूमिकेतून सांभाळून घेतले आहे आणि प्रत्येकाने आपली भूमिका जगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याने त्याद्वारे साऱ्यांनाच आत्मपरीक्षणाची पुरेपूर संधी मिळाली असावी आणि दिग्दर्शकाने ती भरभरून दिली असावी यात शंका नाही. तांत्रिक बाजूही तेवढीच भक्कम असल्याने रंगानुभवात मोलाची भर घालते.
या नाट्याविष्काराच्या माध्यमातून नाट्य-चित्र-दूरदर्शन कलावंतांच्या जगण्याचे अनेक पैलू, त्यांची दृग्गोचर प्रतिमा आणि त्यामागची अगोचर घालमेल, त्यांच्या बदलत्या महत्वाकांक्षा, धारणा, त्याचा त्यांच्या घरावर, आप्तस्वकीयांवर आणि एकूणच समाजमनावर होणारा परिणाम या साऱ्याची झाडाझडती घेतली जाते, ते सारेच चिंतनीय. विशीष्ट प्रसंगात नायकाचा घसा बसल्याने बंद झालेला आवाज, करियर विषयीच्या पारंपरिक पठडीबाज कल्पना, नाटकातल्या लेखकाची बंदिस्त चौकट आणि ती तोडता न येण्याने होणारी तगमग, सगळ्याच भूमिकांचे यथार्थ नामकरण विशेषतः नायकाचे नाव ‘विवेक’, ही सारी या ‘भूमिके’ची बलस्थाने.
धोपट मार्गाने जाऊन विक्रमांबरोबरच व्यावसायिक गणितही सांभाळणाऱ्या लोकप्रिय फॉर्मच्या प्रेक्षकशरण नाटकांच्या मांदियाळीत आपल्या वेगळ्या रंगाचा झेंडा नाचवून प्रेक्षकांना अस्वस्थ करायला, विचार करायला भाग पाडायला आणि मुख्य म्हणजे कुठल्याही सोईस्कर निष्कर्षाला न येता स्वतःची ‘भूमिका’ घेण्याचे स्वातंत्र्य देण्याबरोबरच जबाबदारी सुद्धा घ्यायला लावायला धाडस लागते, ते या नाटकाने केले आहे.
नाटक बघतांना सांस्कृतिक, वैचारिक, सैद्धांतिक, सामाजिक अस्वस्थतेच्या लाटांवर हिंदकळतांना, डाव्या-उजव्या बाजूत कायमच घुसमटलेल्या मध्यममार्गी आणि मध्यमवर्गीय ‘मना’ला एकच प्रश्न सतावत होता, ‘हे नाटक लोक बघतील? त्यांना ते पचेल, रुचेल? की यातून एका भलत्याच वादाला तोंड फुटून (स)माजमाध्यमे त्याने बरबटलेली बघायला लागतील?’
सुदैवाने यातले (अजून तरी!) काहीही घडले नाही आणि सुजाण प्रेक्षकांचा केवळ प्रतिसादच नाही तर भक्कम पाठिंबा या नाटकाला मिळतोय याचे खूप खूप, अगदी विम्यावरील जीएसटी माफ झाल्याइतके, समाधान मध्यमवर्गीय मनाला होते आहे. या नाटकाचा रौप्यमहोत्सवोत्तर प्रवास असाच चालू राहो आणि अधिकाधिक प्रेक्षकांना अस्वस्थ करीत त्याने लवकरच सुवर्ण महोत्सव साजरा करो हीच आमची प्रार्थना आणि हेच (मराठी नाटकवेडा प्रेक्षक म्हणून) आमचे मागणे…!
शुभम भवतु !
अविस्मरणीय अनुभव, एक अप्रतीम नाटक जे तुम्हाला विचार करण्यास भाग पाडते, आणि आपली चूकीची भूमिका बरोबर करण्यास मदत करते 🫡🫡🫡🙏❣️
१३ ऑगस्टला बालगंधर्व रंगमंदिर येथे आम्ही हे नाटक पाहिले, हे एक असे नाटक आहे जे प्रत्येक भारतीय व्यक्तीने पाहायलाच हवे. अप्रतीम लेखन, अप्रतिम दिग्दर्शन, अप्रतिम अभिनय एकूण एक पात्रांचा, आणि अप्रतीम बॅकग्राऊंड स्कोअर — एकंदरीत एक परिपूर्ण नाटक जे तुम्हाला विचार करायला लावते आणि जे गैरसमज आपण पिढ्यान् पिढ्या आपल्या डोक्यात साठवून बसलेलो आहोत, त्या विषयावर वैचारिक मंथन करून, त्या गोष्टी बद्दल आपल्याला आणखीन उत्सुक करून त्या विषयावर आणखीन अभ्यास करायला भाग पाडते.
पटवर्धन सर, कुलकर्णी सर आणि खेडेकर सर आपले मनापासुन खूप खूप अभिनंदन इतका महत्त्वाचा विषय आपण इतक्या ताकदीने आणि इतक्या अभ्यासपूर्ण आणि तन्मयतेने मांडला आहे, आणि खेडेकर सरांचे खूप खूप आभार की त्यांनी इतक्या व्यस्तेत देखील या नाटक करिता हा वेळ दिला आहे… हॅट्स ऑफ ऑल युनिट 🫡🫡🫡🫡👏👏👏👏👌👌👌👌❣️❣️❣️
आपल्या या नाटकाला खूप खूप प्रसिद्धी मिळो आणि व्यावसायिक रित्या ही खूप खूप यश मिळो या मंगलमय शुभेच्छा! 🙏🫡🫡🙏❣️
सूचना: डॉक्टर बाबासाहे एक निष्ठावंत आणि सच्चे भारतीय होते, जसे की त्यांनी भारताचे संविधान आजारी अस्ताना देखील एकट्या ने पूर्ण केले, तसेच रिझर्व्ह बँक, भाकरा धरण, आणि बरेचं पैलू दाखवले गेले पाहिजेत ही नम्र विनंती.
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
You must be logged in to submit a review.