Saturday, September 25, 2021

माझ्या आठवणीतील नाटक — दशावतारी नाटकं

- जाहिरात -

माझं बालपण आणि आत्तापर्यंतचं सारं आयुष्य लालबागला गेलं. लालबाग म्हणजे गिरणगांव. कोकण, घाट, विदर्भ अशा चहूबाजूंनी आलेल्या हौशी गिरणीकामगारांनी येथील सण, उत्सव मोठ्या हौसेने व अहमहमिकेने सजवले, फुलवले. इथे गणेशोत्सव आणि नवरात्रात नाटके होत असत. ही नाटके बहुतेक काल्पनिक ऐतिहासिक अशा स्वरूपाची असत. “जल्लाद” हे असंच एक लोकप्रिय नाटक सादर करून नावारुपाला आलेली “नवहिंद बाल मित्र मंडळ” ही नाट्यसंस्था. या नाटकांमध्ये ट्रिक सीन्स असत. सुरुवातीची श्रेयनामावली सुद्धा ट्रिक सीन्सद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने दाखवली जात असे. आम्हा लहान मुलांना त्याचे फारंच आकर्षण वाटत असे. जंगल, राजवाडा, राजमार्ग असे सुंदर रंगीत पडदे वातावरणनिर्मितीत बदल म्हणून अधेमधे टांगले जात असत. अधूनमधून गाण्यांची व तलवार युद्धाची रेलचेल असे. शेवटी राजपुत्र व दुष्ट जादूगार किंवा राक्षस यांचे तलवारीने युद्ध सुरू झाले की पुढील बाजूस वर टांगलेले माईक वर ओढले जात. न जाणो चुकून तलवार वगैरे लागेल म्हणून! अशा वेळी आम्ही सरसावून बसत असू. मी आईबरोबर गणेशगल्लीच्या मैदानात बसून अशी अनेक नाटके पाहिली. कधीमधी या उत्सवातून नाट्यसंस्थांची गाजलेली सामाजिक नाटकेही होत असत. “दूरितांचे तिमिर जावो” हे असेच त्याकाळी पाहिलेले व त्यातील मधुर गाण्यांनी लक्षात राहिलेले नाटक! आमच्या माळ्यावर होणाऱ्या श्रीदत्तजयंती उत्सवांतही अशी छोटी छोटी नाटुकली होत असत. त्यात माझा दादा व त्याची समवयस्क मित्रमंडळी कामे करत असत. मराठी माणूस व त्याचे नाटकांवरील प्रेम मी अशा रीतीने लालबागला बऱ्यापैकी अनुभवले.

पुढे काही वर्षांनी म्हणजे मी सातव्या इयत्तेत असताना माझ्या आईबरोबर माझ्या गांवी, आजोळी वेंगुर्ला, उभादांडा येथे जाण्याचा योग आला. समज येऊ लागल्यानंतरची गावी जाण्याची ती पहिलीच वेळ, तसेच चौगुलेंच्या कोकणसेवक बोटीने प्रवासही तेव्हा प्रथमच झाला. तो बऱ्यापैकी लक्षात राहीला. उभादांडा हा सुंदर, स्वच्छ अथांग समुद्रकिनारा लाभलेला निसर्गरम्य गाव. छोटंसं टुमदार घर, सभोवती माणकूर आंबा, फणस, माड, चिकू, जाम, जांभळे, कारमळे, राय आवळे अशा विविध झाडांची रेलचेल. आई, आजी, बेबी मावशी, शाली मावशी यांचा प्रेमळ व मायाळू सहवास. अन्नपूर्णास्वरूप असलेल्या आजीच्या हातची पेज व वालीची भाजी, ताज्या फडफडीत मासळीचं चविष्ट जेवण, मोकळी स्वच्छ हवा यात मी बऱ्यापैकी रमून गेलो. तशातच एके दिवशी आईनं तिचा चुलतभाऊ किशोर याच्या दुकानाकडे “दशावतारी नाटक” असल्याचे सांगितले. या किशोरमामाच्या किराणामालाच्या छोट्याशा दुकानात गोटीसोडा, शेंगदाणा लाडू, बिस्किटे इ. पण मिळत असत. आम्ही अधूनमधून त्यावर ताव मारत असू. “दशावतारी नाटक” हा शब्दप्रयोग माझ्यासाठी तेव्हा नवीनच होता. त्यामुळे त्याविषयी नाना प्रश्न विचारून मी आईला भंडावून सोडले होते. तू प्रत्यक्ष बघ म्हणजे तुला कळेल असे आईने मला समजावले आणि खरंच तो दिवस एकदाचा उजाडला. त्या दिवशी सकाळी भल्या पहाटेपासून ढोल वाजवल्याचा आवाज ऐकू लागला. एक काळासावळा तगडा इसम ठराविक तासाभराच्या अंतराने विशिष्ट ठेक्यावर ढोल वाजवत होता. नाटकाची जाहिरात करण्याची ती एक पारंपारिक विशिष्ट अशी तिथली पद्धत होती. दुकानामागील मोकळ्या मैदानवजा जागेत एका कोपऱ्यात चार ठिकाणी बांबू रोवून वर एक माडाच्या झावळ्यांचे छप्पर केले होते. पाठीमागे फक्त एकच पडदा लावला होता. समोर एक बाक व बाजूला कोपऱ्यात पेटीवाला, तबला इ. वाद्ये वाजवणाऱ्यांसाठी खुर्च्या मांडल्या होत्या. मी, माझा दादा व मामा यांच्याबरोबर जाऊन ते पाहून आलो. नेपथ्याचा तो अनोखा प्रकार पाहून मी चकित झालो. सूर्य मावळतीला गेल्यावर अंधारून येऊ लागलं. घराघरातून त्या मैदानात बसण्यासाठी घरातील बाकं, खुर्च्या मैदानांत आम्हाला बसण्यासाठी म्हणून पाठवून दिले. काही वेळाने मैदानाभोवती छोटी छोटी दुकाने मंडळी जाऊ लागली. कंदिलांच्या, पेट्रोमॅक्सच्या उजेडात मालवणी खाजे, खटखटे लाडू, शेंगदाणा लाडू, कांदाभजी इ. अशा प्रकारची पदार्थांची विक्री होऊ लागली. ही नाटके, रात्री उशिरा ११ वा. वगैरे सुरू होतात असे समजले. आम्ही आजीच्या हातचे मासळीचे चविष्ट जेवण जेऊन मैदानाकडे निघालो.

मी दादा व मामाबरोबर फेरी मारण्यासाठी गेलो तेव्हा एका घराच्या पडवीमध्ये नाटकात काम करणारे नट आपला मेकअप करताना दिसले. त्याचे भरजरी पोशाख, मुकूट, शस्त्रे व अस्त्रे पाहून मी खुश झालो. विशेष म्हणजे स्त्रीभूमिकासुद्धा पुरुषच वठवणार होते हे ऐकून मन अचंबित झालं. त्यांनीही छान दागिने घालून मेकअप केला होता. पेट्रोमॅक्सच्या उजेडात त्यांचे पोशाख व अलंकार खूपच चमकत होते. त्यानंतर काही वेळाने स्त्रीवेष घेऊन सजलेला एक युवक हातात देवाची आरती (तळी) घेऊन सर्व प्रेक्षकांत हजेरी लावून आला, त्याला तिथे “भिलीमारो” असं म्हणतात. त्या तळीत सर्वानी यथाशक्ती दक्षिणा ठेवली. काही वेळाने नाटकाला सुरुवात झाली. पहिला मान अर्थातच गणपतीचा! गणपती व सरस्वती येऊन वंदना घेऊन गेले. मुखवटाधारी गणपती व सरस्वती वेषधारी पुरुष यांनी थोडेसे नृत्य केले. पेटीवादकांनी व गायकांनी वंदना म्हटली. नंतर ब्रह्मदेव संकासूर व भटजी यांचे संवाद झाले. ब्रह्मदेवाचे चारही वेद काळा विशिष्ट मुखवटाधारी संकासूर पळवून नेतो व विष्णू त्याच्याशी युद्ध करून ते मिळवून देतो. अशा कथेवर ते छोटेसे नाटुकले होते. गणेश वंदना व हे नाटुकले नाटकाचा धार्मिक भाग म्हणून प्रत्येक नाटकाच्या सुरुवातीला सर्वत्र सादर करावेच लागतात. यातले भटजी, ब्रह्मदेव व संकासूर यांतले संवाद मोठे विनोदी व गमतीशीर असतात. हे झाल्यावर मुख्य नाटकाला सुरुवात झाली. “भीष्म वध” हे आख्यान म्हणजे विषय होता नाटकाचा! महाभारतातील युद्धावरील तो विषय होता. सुरुवातीला दुर्योधनाची एन्ट्री झाली. अत्यंत खड्या आवाजात, भाषेचा डौल सावरीत छान अभिनय करत त्याने आपला परिचय करून दिला. त्याकाळी गावी वीज नसल्याने माईक, लाऊड स्पीकर वगैरे काही नसतानाही आपल्या पल्लेदार आवाजाने व उत्तम अभिनयाने प्रत्येक नट आपली भूमिका शेवटच्या प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थितपणे पोचवत होता. काही ठिकाणी गरज असेल तेथे सुरेल आवाजात नाट्यपदेही म्हणत होते. लिखित स्वरूपातील मजकूराची घोकंपट्टी करून केलेलं पाठांतर कुणीच नट म्हणत नव्हते. उत्स्फूर्त व सहज सुचत गेलेले संवाद म्हणत सर्व नट नाटक फुलवत नेट गेले. स्त्री नट पुरुष साकारत असूनही कुठेच पुरुषीपणा जाणवत नव्हता. नाटकातील युद्धप्रसंग तर फारच वेगळ्या पद्धतीने म्हणजे तलवारीचे टोक दुसऱ्या हाताच्या मुठीने पकडून गोल रिंगण करून पेटी व मृदूंगाच्या ठेक्यावर ताल धरत थिरकत थिरकत पदन्यास करत फेर धरून रंगवत होते. नाटकाच्या शेवटी अर्जुन आणि भीष्म युद्ध सुरू झाले आणि मध्ये शिखंडीचे पात्र अवतरले तेव्हा भीष्माचार्यांनी आपले शस्त्र खाली ठेवत प्रतिज्ञा पूरी केली व अर्जुनाने त्यांना बाण मारले. समारोपाचे पद झाले व नाटक संपले. मुंबईहून इकडे येणाऱ्या बोटीचा भोंगा ऐकू आला. त्यावेळी पहाटेचे साधारण ४.३०/५ वाजले होते. नाटक संपले होते. आम्ही आता घरी निघालो होतो. कुठेकुठे कोंबडे बांग देत होते. पक्ष्यांची मंजूळ किलबिल सुरू झाली होती. नाटक सुरू करण्याची त्या कलाकारांची पारंपारिक पद्धत, पाठांतराची घोकंपट्टी न करता केलेलं सादरीकरण, अलंकारिक भाषेचा डौल, वेशभूषा सारंच मला भावलं होतं. एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातील प्रसंग तन्मयतेने वाचावा व तद्रूप होऊन जावं तसं समोर घडलं होतं. मी दशावतारी नाटकाच्या प्रेमात पडलो होतो.

- Advertisement -

नाटकाच्या मोसमाव्यतिरिक्त इतर वेळी शेती, गणेशमूर्ती बनवणे इ. कामे करून पोट भरणारे हे कलावंत एक धार्मिक आस्था बाळगून ही लोककला जपत तो ऐतिहासिक वारसा टिकवण्याचे काम करतात ही मोलाची कामगिरी आहे यात काय संशय? त्यांना खरंतर प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे.

[Photo Credit: Nimish Sawant]

Mohan Tanksali

मोहन टंकसाळी

Commercial Artist, हौशी लेखक

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

2 COMMENTS

  1. अप्रतिम मांडणी टंकसाळी साहेब, आपण आम्हाला म्हणजे ज्या कुणाला “दशावतार” हा प्रकार माहीती आहे त्या सगळ्यांना आपण सिंधुदुर्गात जाऊन “दशावतार” नाटक पहायला बसलो असा भास-आभास झालाच असणार, ह्यात वादच नाही….
    आपण आम्हाला जत्रेत घेऊन गेलात खाजं, शेंगदाण्याचे लाडु आणि इतर जत्रेतील पदार्थ खायल घालण्याचा अनुभव दिलात…
    सद्ध्या ललाॅकडाऊन मुळे कुणालाच दशावतार नाहीच व्यावसायिक नाटकं सुद्धा पहायला मिळत नाहीयत…
    आपण जो धर्म केला आहात त्याबद्दल धन्यवाद…..

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.

%d bloggers like this: