Tuesday, November 30, 2021

सोलापूरची रंगभूमी — इतिहास ७० वर्षांचा

सोलापूरच्या रंगभूमीला सत्तर वर्षाची परंपरा आहे.  सोलापूर हे गिरणगाव म्हणून ख्यातकीर्त असले तरी कलेची रुजवण येथे अमाप होती.  शंभर वर्षापूर्वी मेकॅनिकी थियेटर व नूतन संगीत थियेटर या नावाची नाटकासाठी बांधलेली दोन सभागृहे येथे होती.  नाटकाचा अर्थात संगीत नाटक व गद्य नाटकाचा खास एक प्रेक्षकवर्ग त्या काळी होता. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळी, आनंद विकास मंडळी, शाहू नगरवासी या व्यावसायिक नाट्य संस्थांचे प्रयोग तेथे होत असत.  तसेच आचार्य अत्रे, मामा वरेरकर, मो.ग. रांगणेकर यांचे नाट्य प्रयोगही हौशी रंगभूमीवर होत होते.  

प्रत्यक्ष रंगमंचावर सोलापूरातील काही कलाकार मंडळी एकत्र येऊन नाटकांचे प्रयोग करत होते.  १९४० च्या दरम्यान नवयुग नाट्य मंडळ, दत्त क्लब, हिमगंगा नाट्य मंडळ, नाट्य सौरभ, नटराज नाट्य मंडळ, नाट्य उपासना, जवाहर नाट्य मंडळ, कामाठीपुरा क्रीडा मंडळ या दहा-बारा नाट्य संस्था कार्यरत होत्या.  शंभर-दीडशे माणसे अशा रीतीने नाटकाला जोडली गेली होती.  हरीभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पिले, प.मा. कामतकर वकील, पद्माकर देव सर, करंदीकर सर या मान्यवरांचा या नाट्यप्रवाहास सशक्त करण्यात मोठा वाटा होता. विद्यमान १००व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, अमीर तडकळकर व गुणी अभिनेता अतुल कुलकर्णी ही सोलापूरचीच देणं आहेत. विषय जोडून घ्यायचा म्हणून अभिनेत्री शशिकला, सरला येवलेकर, अक्षर कोठारी, किशोर महाबोले  व फैयाज या गुणी कलावंत सोलापूरचेच.

या सर्व संस्था गणेशोत्सव, साहित्य संमेलन १९५१ नंतर कामगार नाट्य स्पर्धा अशा निमित्ताने नाटके करीत होती.  याच दरम्यान १९५७ ला ‘अभिनय साधना मंदिराने’ ३९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित केले होते.  संमेलनाचे अध्यक्ष होते पार्श्वनाथ आळतेकर आणि उदघाटक केशवराव दाते.  याचवेळी सोलापूरात नाट्यपरिषदेची शाखा स्थापन झाली.  या संमेलनात अभिनय साधना या संस्थेने ‘सुंदर मी होणार’, ‘तुझं आहे तुजपाशी’ ही नाटके मंचित केली.  

साठच्या दशकात नाट्य आराधना, निशिगंध नाट्य मंदिर, ललित कला मंदिर, जवाहर नाट्य संस्था, श्रुती मंदिर अशा नाट्य संस्था उदयास आल्या व त्यांनी स्वतंत्रपणे नाटके मंचित करून स्वत:ची स्वतंत्र, वेगळी ओळख निर्माण केली.  नाट्य आराधना – डॉ. वामन देगांवकरांच्या मार्गदर्शनाखाली आपली प्रायोगिकता जपत नाटके बसवत होती.  राज्य नाट्य स्पर्धा, विविध नाट्य महोत्सवात आपली नाटके सादर करीत होती व त्यांना यशही प्राप्त होत होते.  कलावंत गुरुराज अवधानी हे आराधनाचेच. तसेच महाराष्ट्राचे विनोदवीर, हास्यकल्लोळकार प्रा. दीपक देशपांडे, अतुल कुलकर्णी ही मंडळी सुध्दा आराधनाचीच.

निशिगंध नाट्यमंदिर – अरुण मेहता, प्रा. निशीकांत ठकार आणि प्रशांत देशपांडे या साखळीने महाराष्ट्र शासनाची राज्यनाट्य स्पर्धा आपल्या जोरकस सादरीकरणाने गाजवली.  प्राथमिक फेरी व अंतिम फेरीत सलग प्रथम क्रमांक मिळविणा-या अनेक रुपांतरीत, भाषांतरित नाट्यकृती त्यांनी सादर केल्या.  १९८८ पासून हयवदन, धुम्मस, गान पंचरंगी पोपटाचे, अग्निवर्षा, नटी विनोदिनी, महामाया अशी हिंदी व मराठीतून नाटके सादर केली.  शैला मेहता यांचा अभिनय, प्रशांत देशपांडे यांचं (लिव्ह म्युझिक) प्रत्यक्ष साथ-संगीत, प्रा. निशिकांत ठकार यांचे लेखन, अरुण मेहतांचे दिग्दर्शन ह्या जमेच्या बाजू होत्या.

नाट्य आराधानाने काळोख देतो हुंकार, शांतता कोर्ट चालू आहे, नाटककाराच्या शोधात सहा पात्र, चाफा, आपण सारे घोडेगावकर अशी प्रायोगिक अंगाने जाणारी नाटके मंचित केली. 

याच सुमारास १९७१ मध्ये सोलापूरातील तेलुगु भाषिक एकत्र येऊन मराठी नाटके सादर करता यावी म्हणून त्यांनी अश्विनी नाट्यमंदिर संस्था उभारली.  लक्ष्मी नारायण बोल्ली, नागेश कन्ना, शोभा बोल्ली, अजय दासरी व इतरांनी मध्ययुगीन नाटके सादर केली.  

ललित कला मंदिर – ही प्रयोगशील संस्था.  यात बहुसंख्य रेल्वे कर्मचारी होते.  नामदेव वठारे हे त्याचे अध्वर्यू होते.  तगडी संहिता, भक्कम तांत्रिक बाजू, मॉबची नाटके या ललित कला मंदिरच्या जमेच्या बाजू होत्या.  उत्तमराव कसबे, शैलजा मराठे, पितांबरे, संजीवनी काळे, सुशीला वनसाळे, फैय्याज, जब्बार पटेल, निशा खांडेकर, नंदलाल भैया, शिवशरण, रमेश उपारे, मंदार काळे, सुहास बांदल, कमल हावळे, मीरा पांढरे, सत्यनारायण दुबे, गुरु वठारे, विश्वास पाळंबे आदीजण यात कार्यरत होते.  कै. नामदेव वठारे यांनी नेपथ्यात वैविध्य आणले.  त्यांनी ‘डाऊन ट्रेन’ या नाटकासाठी प्रत्यक्ष रेल्वे मंचावर आणली.  चंदुलाल श्रावण, बाबा राजपूत, इसाक मजियार, लक्ष्मण काटे, नंदलाल भैया, अरुणकुमार यादव ही मंडळी स्त्री भूमिका करत होती.  एक होती वाघीण, हे झाड जगावेगळे, चांगुणा, दिंडी अशी अनेक नाटके त्यांनी सादर केली.  ललित कला मंदिर ने मराठी बरोबर हिंदी नाटकेही केली.  

पुढच्या काळात, नव्वदच्या दशकात आणखी काही संस्था उदयाला आल्या.  रंगसंवाद प्रतिष्ठान, अस्तित्व मेकर्स, जवळीक, समर्पित नाट्य संस्था, संकल्प युथ फौंडेशन, झंकार नाट्य संस्था, या संस्थांमध्ये सोलापूरची चवथी पिढी कार्यरत आहे.  दुसऱ्या पिढीत मोहन अंग्रे, शिकुर सय्यद, अशोक शेट्टी, आमदार प्रकाशजी येलगुलवार, आनंद किरपेकर, सुहासा वर्तक, डॉ. हेमंत वर्तक, शशिकांत लावणीस, वनिता म्हैसकर, वनमाला किरपिकर. तर उत्तरार्धात सुनील गुरव, मंजुषा गाडगीळ, मीरा पांढरे, रजनीश जोशी, शिवानंद चलवादी, अनुजा मोडक, मंदार काळे, सुमित फुलमामडी, अशी जंत्री सांगता येईल.या सगळ्यांचे नाट्य क्षेत्रातील योगदानात सातत्य होते.  

कलावंतांप्रमाणे नाटककारांचीही मांदियाळी होती.  अगदी साहव्या दशकापासून पहिल्या पिढीत कै. पं.मा. कामतकर वकील, कुमार कोठावळे, कै. रा.बा. पवार, त्र्यं.वि. सरदेशमुख, कै. व्यंकटेश कामतकर, अजिज नदाफ. कै. चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, आनंद किरपेकर होते.  १९७० नंतर मनोहर देखणे, अप्पासाहेब शेडजळे, पांडुरंग काळे, लक्ष्मीनारायण बोल्ली, शरदकुमार एकबोटे, निशिकांत ठकार, जयप्रकाश कुलकर्णी, मुकुंद हिंगवे, शिरीष देखणे, विद्या काळे, प्राचार्य राजेंद्र शेंडगे, संजय लांडगे, कीर्तीपाल गायकवाड, विजय खटके, आनंद खरबस अशा नाटककारांनी नाटके लिहून साहित्य क्षेत्रात मोलाची भर टाकली.  १९४० मध्ये सुरु झालेली ही लेखन परंपरा २०१० पर्यंत स्थिरावते.  

सोलापूरची संगीत रंगभूमी १९४७ पासून अस्तित्वात होती.  सोलापूरच्या लक्ष्मी-विष्णू मिलचे इंजिनियर व ‘रंगवैभाव’ संस्थेचे संस्थओपक कै. नानासाहेब चक्रदेव यांच्या संस्थेने संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, संशयकल्लोळ, शाकुंतल अशी नाटके मंचित केली.  

१९६४ पासून श्रुती मंदिरने आजतागायत संगीत रंगभूमी सातत्याने जिवंत ठेवली.  पद्माकर देव, विद्या काळे, रमाकांत कुलकर्णी, श्रीकृष्ण खाडिलकर, डॉ. माधवी रायते, शिरीष बोकील, रवींद्र मोहोळकर, मनोज परांजपे असे नटसंच त्यांच्या सहयोगातून राज्य संगीत नाट्य स्पर्धा गाजवत राहिले.  अजूनही संगीत व गद्य अशी दोन्ही नाटके या संस्थेकडून सादर होतात.  त्याची धुरा विद्या काळे यांनी सांभाळली आहे.  एकच प्याला संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत मृच्छकटिक, संशयकल्लोळ अशी नाटके त्यांनी सादर केली.  या उपक्रमांतर्गत नाट्य आराधाना, सोलापूर व थियेटर ऍकॅडेमि यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गोष्टींच्या गोष्टीची गोष्ट’ हा नाट्यप्रयोग सादर केला गेला.  १९९७ मध्ये याचे ६६ प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर झाले.  प्रसाद वनारसे यांचे दिग्दर्शन आणि शोभा बोल्ली, मंजुषा गाडगीळ, ज्ञानेश लिमये, सुनील गुरव, किरण माने असे कलावंत या चमूत होते. 

१९६५ पासून नाटकातील प्रायोगिकता जपत अनेक नाट्यप्रयोग सादर केले गेले.  पद्माकर देव सरांनी माया मल्लापूर यांना घेऊन संगीत सौभद्र हे नाटक केवळ दोन पात्रांना घेऊन सादर केले. ललित कला मंदिर या नाट्य संस्थेने चांगुणा या नाटकात प्रत्यक्ष नदीचा तीर उभा केला. नाट्य आराधानाचे सारेच नाट्यप्रयोग प्रायोगिक अंगाने जाणारे होते. ‘अकरा कोटी गॅलन पाणी’ या नाटकातून ध्वनी व प्रकाशाच्या माध्यमातून ‘खाणींची’ अनुभूती दिली होती.सुनील गुरव यांचे ‘त्रिकोणाची चवथी बाजू’ हे नाटक दिग्दर्शकीय प्रायोगिकता जपणारे होते.  अरविंद काणे लिखित ‘लक्षमण रेषा’ हा आर.के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांवर आधारित विलक्षण नाट्यप्रयोग रजनीश जोशी यांनी केला.  शशिकांत वटाणे, विजय साळुंके, राजू मोडक, शिरीष देखणे, गुरु वठारे, साहीर नदाफ, रामप्रकाश दुबे, रवी माल्पुरी, गोविंद दाते, सतीश वैद्य,श्रावण डावरे, दीपक कसबे, अविनाश साखरे, देवदत्त सिध्दम, ओमप्रकाश श्रावण, रेवण ऊपारे, (बापू) बाबुराव आहेरकर, प्रशांत देशपांडे ही मंडळी सगळे रंग व्यवधान सांभाळत होती.  नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत, रंगभूषा या रंगमंचीय महत्वाच्या बाबी सांभाळत नाटकाळा परिपूर्ण करत होती.  कीर्तीपाल गायकवाड, प्रमोद लांडगे, आशुतोष नारकर यांनी पथनाट्याची परंपरा अव्याहत ठेवली आहे.  निशिगंध व ललित कला मंदिर बरोबरच निशांत ऍकॅडेमिच्या जी.एम. पटेल यांनी बंजर, खाला खालिदा, अधे अधुरे सारखी अनेक नाटके मराठी व हिंदी भाषक नाट्य कलावंतांना घेऊन राज्य नाट्य स्पर्धेत सादर केली.  इसाक मण्यार यांचीच नाट्य उपासना या संस्थेने २५ हिंदी नाटके दरवर्षी मंचित केली.  रियाज हुंडेकरी, खाकीन कादरी, महिबूब नालाचंद, फैय्याज हकीम, बाबू भाई हे त्यांचे कलावंत होते. बाबू मिया करजगीकर यांनी ३३ हिंदी एकांकिका लिहून मंचित केल्या.  महाराष्ट्र राज्य ऍकॅडेमि, मुंबई येथे त्यांचे सादरीकरण होत होते. 

निशिकांत ठकार यांनीही अनेक हिंदी नाटके आणि मराठी व काही कानडी कादंबरीचे नाटकात रुपांतर केले जे निशिगंध नाट्यसंस्था नेहमी सादर करीत असे.   बोधी सत्व नाट्य मंडळ व बुद्द्धिष्ट कल्चर ऍकॅडेमि या संस्था विक्रम कांबळे, रेवण उपारे, रेवण गावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगळ्या प्रकारची नाटके एका विशिष्ट विचारधारा घेऊन सादर करत.  

पारंपारिक लोकरंगभूमीचाही एक सशक्त प्रवाह स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात होता.  जनजागृती, प्रबोधन, या हेतूने अनेक कलापथके आपल्या मेळाव्यातून कार्य करत होती. नवभारत कलापथक, पंचशील कलापथक, जय बालाजी कलापथक, लाल तारा कलापथक, उदय कलापथक, माउली कलापथक, लोकसेवा कलापथक ही सर्व कलापथके लोकरंगभूमी जगवण्याचा नेटाने प्रयत्न करत होते.  ज्ञान आणि मनोरंजनाच्या हेतूने ही मंडळी ‘कलायज्ञ’ चालवत होती.  

शाहीर विरच्या कामूर्ती, शिणू तात्या काडगावकर, शाहीर झळकीकर, सुखदेव फड, शाहीर दिवाकर, शाहीर विश्वासराव फाटे, शाहीर डॉ. अजित नदाफ, रामसिंग यांनी अनेक लोकनाट्य, फार्स, प्रहसने लिहून त्याचे शेकडो प्रयोग केले.  शिवाय स्वातंत्र्य चळवळीला योगदानही दिले.

एकूणच सोलापूरची रंगभूमी ही बहुरंगी बहुढंगी आहे.  काळाचे, भाषेचे सर्व अडसर बाजूला सारून ती चोहोअंगाने बहरत गेली.  आजही महाराष्ट्रात मराठी नाटकाच्या अनुषंगाने विषय निघतो तेव्हा सोलापूरची रंगभूमी व तीवर घडणारे सर्व नाट्यकला प्रकार याची दाखल मराठी नाट्य इतिहासात घ्यावी लागेल.  ही रंगभूमी नवोन्मेषशालिनी राहण्यासाठी तीन पिढ्यातील जवळ जवळ शेपाचशे कलाकारांचे योगदान आहे.  म्हणूनच सोलापूरच्या रंगभूमीची अनेक वैशिष्टे  सांगता येतात.  इतकी की भारताचे उर्जामंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय सुशीलकुमार शिंदेसाहेबही महाविद्यालयीन जीवनापासून बेबंदशाही – औरंगजेब, लग्नाची बेडी – कांचन, तो मी नव्हेच – लखोबा या नाटकातून सोलापूरच्या रंगभूमीवर आपली कला सादर करत होते.  

कै. सिध्दा पाटील सारखा अमराठी भाषिक कलाप्रेमी अगदी मोक्याची जागा सोलापूरात नाट्यगृह व्हावे म्हणून महापालिकेला देतो व ‘हुतात्मास्मृती मंदिर’ (नाट्यगृह) आकाराला येते.  त्यांचे कुटुंबीय संगीत नाटकांना आश्रय देतात.  गेली २० वर्षे नाटकातील योगदानासाठी हे कुटुंब गुणी कलावंताना पुरस्कारही देत आहेत.  प्रसाद कुलकर्णी हे व्यावसायिक व हौशी कलावंताना गेली तीस वर्षे जेवणाची सोय करतात.  ललित कला मंदिरचे गुरु वठारे, कै. नामदेव वठारे नाट्य महोत्सव आयोजित करतात.   अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या वतीने गेली १५ वर्षे सुशील करंडक एकांकिका स्पर्धा घेण्यात येत आहे.  सोलापूरात एकूण तीन नाट्य परिषदा कार्यरत असून त्याचे तीन हजार सदस्य आहेत.  महाराष्ट्राच्या लावणी परंपरेला व्यावसायिक आधुनिक रूप देऊन लोककलावंताना साम्भाराणारे विजय साळुंखे सारखी वेडी माणसे आहेत.  स्वस्त नाटक योजनेच्या तीन शाखा कार्यरत आहेत.  शिवाजी उपारे, गुरु वठारे सारखे नाट्य व्यवस्थापक येथे आहेत.  हुतात्मा स्मृती मंदिर, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे सकुंल, होमी थियेटर, पद्माकर देव हॉल अशी रंगभूमी इथे उपलब्ध आहे.

मराठी नाटकाचे वेड महाराष्ट्रातील माणसाला कसे आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सोलापूरची बहुभाषक बहुआयामी रंगभूमी होय.  

सध्या २०१० पासून सोलापूरी चवथी पिढी रंगभूमीवर कार्यरत आहे.  ही तरुण पिढी काही वेगळे करून दाखविण्याच्या उर्मीतून मरगळ आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेला उर्जितावस्था प्राप्त करून देत आहे.  यात प्रामुख्याने अमीर तडवळकर (व्यावसायिक नट), अश्विनी तडवळकर, ममता बोल्ली, मिहिका शेंडगे, प्रथमेश माणेकरी, श्रद्धा हल्लेनवरू, सुरज कोंडमुर, डॉ. अजित मोरे, अमोल देशमुख, श्रुती मोहोळकर, अमृत ढगे, अपर्णा गव्हाणे, निलेश फुलारी, आकाश गोरे, निमिष गोडबोले, पंचम देशपांडे, प्रणव अलाट, ओंकार हुच्चे, प्रदीप सलगर, सागर देवकुळे,अद्वैत कुलकर्णी, गणेश मरोड, देवदत्त सिद्द्धम आधी तगडी तीं उद्याच्या उज्ज्वल तेजोमय रंगभूमीसाठी नटराज सेवा करत आहेत.  

Dr. Meera Shendge

डॉ. मीरा राजेंद्र शेंडगे, सोलापूर

नाटय लेखिका व दिग्दर्शिका

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles