Monday, November 29, 2021

नाटकाच्या तालमीसाठी हक्काची जागा नाही — रंगकर्मींची शोकांतिका

तब्बल दीड वर्षे प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात जाऊन नाट्याविष्काराचा जिवंत अनुभव घेण्यासाठी हपापलेला होता. आज सरकारने ५०% आरक्षणासह नाटक दाखवायला मान्यता दिली आहे. त्यामुळे, रंगकर्मी थोडे आशावादी झाले आहेत आणि गेल्या दीड वर्षात झालेलं नुकसान विसरून, नव्या ताकदीने प्रेक्षकांच्या सेवेसाठी हजार झाले आहेत. ५०% आरक्षणाच्या अटीमुळे रंगकर्मींचे आजही नुकसान होत आहे आणि त्याबद्दल ते वारंवार आपल्याला बोलूनही दाखवत आहेत. अशा या दोलायमान परिस्थितीत काही कलाकारांवर याही पलीकडले एक नवे संकट कोसळले आहे. या रंगकर्मींना नाटकाच्या तालमी करण्यासाठी जागा नाही आणि जी जागा सांस्कृतिक कार्यासाठी उपलब्ध आहे ती त्यांना वापरता येत नाही.

कल्याणमधील वायले नगर, खडकपाडा येथील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या जमिनीवर दुमजली वास्तू उभारण्यात आली आहे. परंतु, या वास्तुवर अद्याप एकही सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही अथवा रंगकर्मींनाही या वास्तूचा एकदाही वापर करता आलेला नाही. इमारतीच्या तळमजल्यावर पोलीस उपायुक्त कार्यालय असून पहिल्या माळ्यावर निवडणूक ऑफिस तर दुसऱ्या मजल्यावर प्रांत ऑफिस असून गेल्या कित्येक वर्षांपासून या सरकारी कार्यालयांचे भाडे थकले आहे. रंगकर्मींनी याविरोधात आवाज उठवूनही गेली कित्येक वर्षे ही सरकारी कार्यालये तिथेच आहेत. या कार्यालयांवर काहीच प्रशासकीय कारवाई होत नसल्यामुळे रंगकर्मींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

महापालिकेने या संस्थांना व कलाकारांना तालमीसाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी माफक अपेक्षा कलाकार व्यक्त करीत आहेत. प्रख्यात अभिनेते व दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी WhatsApp द्वारे मोहीम राबवली आहे. या मोहिमेदरम्यान, इतरही बऱ्याच संस्थांनी विविध भागात अशा सांस्कृतिक कार्यासाठी आरक्षित केलेल्या जागांचा इतर कामांसाठी वापर होत असल्याचे निर्देशनास आणून दिले आहे. त्यामुळे, जनमानसात या प्रकाराबद्दल जागृती निर्माण झाल्याने सर्व संस्था एकजुटीने तालमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करत आहेत.

अभिजीत झुंजारराव यांच्या वक्तव्याप्रमाणे सर्व रंगकर्मींच्या या मागण्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या आहेत. “इतकी वर्ष नाटक खेळूनही हक्काच्या जागेसाठी लढावं लागतंय. या पेक्षा दुसरी मोठी शोकांतिका नसेल. हा प्रश्न घेऊन पार विधानसभेपर्यंत गेलोय. आता तरी प्रशासकीय यंत्रणेला जाग यावी.”, अशा परखड शब्दांत त्यांनी प्रशासनाच्या या संपूर्ण कारभाराबद्दल निराशा व्यक्त केली आहे.

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles