Tuesday, November 30, 2021

६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशाला सुरुवात — नियम, प्रवेशिका आणि माहिती येथे वाचा!

हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या राज्य नाट्य स्पर्धेची घोषणा झाल्यावर तमाम रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच नाट्यसंघ हिरीरीने या स्पर्धेत उतरण्यासाठी आतुर झाल्याचे दिसून येत आहे. वृत्तानुसार, शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र राज्य हौशी स्पर्धेची प्राथमिक फेरी १ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणार असून हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी १ फेब्रुवारी, २०२२ पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी नाट्यसंघांना ₹३०००/- रकमेचा धनाकर्ष संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या नावाने पाठवायचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर ही रक्कम संस्थांना परत करण्यात येईल. विहित मुदतीनंतर कोणत्याही प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत, याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी. स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यावर प्रयोग सादर करणे अनावर्य आहे. तसे न केल्यास, प्रवेशिकेसोबत भरलेली रक्कम परत करण्यात येणार नाही व ती शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.

स्पर्धेसंबंधीची इत्यंभूत माहिती व प्रवेशिका पुढील PDF मध्ये उपलब्ध आहे. पुढील लिंकवर उपलब्ध असलेली प्रवेशिका आवश्यक त्या कागदपत्रासह ३० नोव्हेंबर, २०२१ पर्यंत नमूद केलेल्या पत्त्यावर सादर कराव्यात.

Rajya Natya Spardha 2022 Form Download

हीरक महोत्सवी स्पर्धा जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून रंगकर्मींच्या प्रतिक्रिया

प्रदीप देवरुखकर (प्रयोग मालाड)

बहूप्रतिक्षित, बहुअपेक्षित, बहुचर्चित आणि बहुप्रसवा महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा लॉकडाऊनच्या मोठ्या कालखंडानंतर जाहीर झालीय.

बहुप्रसवा का?

कारण याच नाट्य स्पर्धेने आजपर्यंत अनेक रंगकर्मी जन्माला घातले आहेत. या स्पर्धेच्या पायऱ्या चढत अनेकांनी व्यावसायिक नाटक व चित्रपटात अभिनय करण्याचे स्वप्न साध्य केले आहे.

राज्य नाट्य स्पर्धा म्हणजे हौशी नाट्य संस्थांसाठी एक वार्षिक उत्सव असतो. वर्षातून एकदाच ही स्पर्धा होत असली तरी तयारी मात्र वर्षभर सुरू असते. स्पर्धेच्या तयारीची एक नशाच सर्व रंगकर्मींना चढते. योग्य संहिता निवडण्यापासून हळूहळू स्पर्धेचा नशीला रंग रंगकर्मींना चढायला लागतो. पडद्यामागील आणि पुढील कलाकार, तंत्रज्ञ, संस्थेचा व्यवस्थापन संघ व कार्यकारिणी सगळेच व्यस्त आणि ग्रस्त असतात. तालमीला सुरुवात होते. दिग्दर्शक नावाचा चाबुकस्वार शब्दांचा चाबूक पाराजत कलाकारांच्या नाकीनऊ आणतो. प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. कारण प्रयत्नांती परमेश्वर त्यानंतरच दिसणार असतो.

वास्तविक दरवर्षी ऑगस्ट महिन्यात या स्पर्धेसाठी अर्ज करायचा असतो. पण यावर्षी ‘देरसे आये दुरुस्त आये’ या न्यायाने सांस्कृतिक संचालनालयाने ही स्पर्धा या महिन्यात जाहीर केलीय. यावर्षीच्या स्पर्धेचे नवे स्वरूप खुपच आकर्षक आहे. सातासमुद्रापारचे स्पर्धकही या स्पर्धेत आता सामील होऊ शकणार आहेत.

लॉकडाऊनमुळे मरगळलेल्या सर्व रंगकर्मींना आता नवसंजीवनी मिळाली आहे. खरं तर हौशी नाट्य संस्थांसाठी यावर्षीची ही स्पर्धा म्हणजे खडतर परीक्षा ठरणार आहे. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या उत्पन्नावर गदा आलीय. त्यामुळे स्पर्धेच्या खर्चाचे हे शिवधनुष्य उचलायचे कसे याच चिंतेत हौशी रंगकर्मी असणार आहेत.

तरीसुद्धा ‘तुझ्यासाठी काय पण’ असं म्हणत प्रत्येकजण इरेला पेटलाय.

… लगे रहो.

 


अभिजीत झुंजारराव (अभिनय, कल्याण)

दोन अडीच वर्षांच्या गॅपनंतर जवळजवळ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा होतेय ही निश्चितच मराठी रंगभूमीच्या दृष्टीने, हौशी आणि समांतर रंगभूमीच्या दृष्टीने खूपच जमेची बाजू आहे. महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेने आजपर्यंत खूप कलाकार मराठी रंगभूमीला दिले आहेत. एकमेव अशी स्पर्धा आहे भारतातील जी राज्य शासन स्वतः आयोजित करतं आणि नाटकाबद्दल असलेली एकूणच आत्मियता यातून दिसून येते. त्याच्याबद्दल आम्हा सर्व रंगकर्मींना मनापासून अभिमानदेखील वाटतो. कोणत्याही राज्यात अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जात नसून फक्त महाराष्ट्र राज्यात या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. कोविड काळात बरेच प्रयोग आपण ऑनलाईन माध्यमातून पहिले. त्याच पद्धतीने ऑनलाईन माध्यमातूनसुद्धा ही स्पर्धा यावर्षी घेतली जाणार आहे. त्यामुळे भारताबाहेरील संघही आता ऑनलाईन माध्यमातून स्पर्धेत सहभागी होणार आहेत ही अतिशय सुंदर आणि जमेची बाजू आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांना या सर्व नाट्यछटा बघता याव्यात आणि त्याचा आनंद घेता यावा अशी सदिच्छा मी व्यक्त करतो.

 


महेश कापरेकर (कालांश थिएटर, रत्नागिरी)

जसं भारताततला माणूस हा प्रत्येक सणाची आतुरतेने वाट बघत असतो आणि त्या त्या सणानुसार तयारी करून तो सण आनंदने साजरा करत असतो. अगदी तसच राज्यनाट्य स्पर्धेची कुठलाही कलाकार आतुरतेने वाट पाहत असतो आणि २ वर्षाच्या गॅप नंतर संपूर्ण तयारीनिशी सर्वच कलाकार आणि प्रेक्षकवर्ग सुदधा आता राज्यानाट्य स्पर्धेचा एक सण साजरा करण्यासाठी सज्ज झालाय. तर लवकरात लवकर तिसरी घंटा वाजून राज्यानाट्य स्पर्धेला सुरुवात व्हावी हीच नटराजा चरणी प्रार्थना.

तमाम रंगकर्मी वर्गाचा उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोन पाहता यावर्षीची स्पर्धाही तितकीच रंजक आणि रोचक याबद्दल वादच नाही. सर्व स्पर्धक संघांना शुभेच्छा!

तुमचे प्रोत्साहन लाख मोलाचे

आम्हाला आशा आहे की तुम्हाला प्रस्तुत लेख आवडला असेल व यापुढेही आमचे लेख वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तुम्हाला काही छोटीशी रक्कम रंगभूमी.com च्या प्रोत्साहनार्थ देणगी स्वरुपात द्यायची असेल तर आम्ही त्याचे स्वागत करू.

- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

— जाहिरात —

Latest Articles