एक काळ होता जेव्हा माणूस सुखासाठी धडपडत होता. जीवनातही कुटुंब आणि मित्रपरिवारासाठी वेळ काढत होता. पण आजचा काळ वेगळा आहे. आज माणूस सुखी राहण्यासाठी नाही तर फक्त सुखी दिसण्यासाठी झगडतोय. कमालीचं औदासिन्य आलेलं असतानाही सोशल मीडियावर खूश दिसण्यासाठी आजकाल प्रत्येकामध्ये चढाओढ सुरू आहे. आजची पिढी सोशल मिडियाच्या आहारी गेलेली आहे. लाईक्स आणि फॉलोअर्सच्या विळख्यात अडकलेली दिसतेय. सहजसुंदर आयुष्यातील हेलकावे सहन करण्याची क्षमता या पिढीत उरलेली नाही. अशाच प्रकारचं, वरवरचं आयुष्य जगणारा आणि ‘आज’च्या पिढीचं दर्शन घडवणारा ‘Sad सखाराम’ आपल्या भेटीसाठी आला आहे.

आविष्कार निर्मित, युगंधर देशपांडे लिखित आणि नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘Sad सखाराम’ हा एक भन्नाट, आगळा वेगळा पण तरीही जवळचा वाटणारा प्रयोग सद्ध्या रंगभूमी गाजवतोय आणि प्रेक्षक पसंतीही मिळवतोय.

YouTube player

युगंधर देशपांडे यांचे लिखाण

ज्वलंत विषयाला इतक्या हटके पद्धतीने हात घालण्याचा युगंधरचा अट्टहास कौतुकास्पद आहे, यात काही शंकाच नाही. त्यामुळे, सुरुवात लेखकापासूनच करावी लागेल. युगंधर यांनी येत्या काळात काय भीषण चित्र आपल्याला समाजात दिसू शकतं याची एक शक्यता त्यांच्या लिखाणातून मांडली आहे. विडी, सिगारेटच्या पाकीटावर ‘आयुष्यासाठी हानिकारक आहे. धुम्रपान करू नका.’ असं लिहिलेलं असलं तरी माणसं त्याचं सेवन करणं थांबवत नाहीत. त्याचप्रमाणे, ईजा होतेय हे लक्षात येऊनही, सोशल मीडियापासून माणूस स्वतःला दूर ठेवण्यामध्ये अयशस्वी होतोय याचे चित्रण करणारे अचूक शब्दांकन युगंधर देशपांडे या युवा लेखकाने ‘Sad सखाराम’ मधून केलेलं आहे. हा दीर्घांक बघितल्यावर वाहवत चाललेल्या तरुण पिढीच्या मानसिकतेबद्दलचा लेखकाच्या मनातील असंतोष प्रकर्षाने जाणवतो. विजय तेंडुलकर यांच्या अजरामर अशा ‘सखाराम बाईंडर’ नाटकातील जे संदर्भ अधूनमधून जोडले आहेत ते लक्ष वेधून घेतात. काही वेळेस थरार निर्माण करतात. नाटक दोनपात्रीच असलं तरी बऱ्याच व्यक्तिरेखा आपल्याला नाटकभर खिळवून ठेवतात.

sad sakharam pic 1

पूर्वी ‘चित्रहार’ बघण्यासाठी मिळेल ती लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा पकडून लोकं आपापल्या घरी पोहोचायची. रविवारी सकाळी कुटुंबियांसोबत चहा पोहे खात दूरदर्शनवर रामायण, मोगली अशा कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायची. आज मात्र चित्र बदललेलं आहे. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी ‘Netflix’वरील एक दोन वेब सिरीज खाऊनही समाधान मिळत नाहीये. सोशल मीडियामुळे माणसाला एक प्रकारचं एकलकोंडेपण आलेलं आहे. माणूस दुसऱ्याकडे व्यक्त होणं विसरुन गेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घेणं माणूस विसरुन गेला आहे. स्वतःशीच त्याची झुंज सुरू आहे. ही झुंज लेखकाने समर्पकरीत्या दर्शविली आहे.

sad sakharam pic 2

“सखाराम Sad का आहे?”

सखाराम नामक एका युवकाला काहीही भावना वाटणं अचानक बंद होतं. भावना परत मिळवण्यासाठी त्याचा झगडा सुरू होतो. मोबाईल ऍप, थेरपी, व्हायोलेंस अशा बऱ्याच मार्गांचा वापर करुन तो भावना परत मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण अयशस्वी होतो. हा झगडा हळूहळू रौद्ररूप धारण करतो. व्हायोलेंसमधून त्याला काही प्रमाणात समाधान मिळतं. पण, कालांतराने तेही बंद होतं. यापलीकडे, या नाटकाचं कथानक मला अजिबात उलगडायचं नाही आणि या नाटकाला अमुकच अशी कथादेखील नाही. पण, नाटकाला एक सुरुवात आणि समर्पक शेवट नक्कीच आहे.

सखारामला भावना परत मिळतात का? कशा मिळतात? त्यासाठी त्याला काय किंमत मोजावी लागते? हे जाणून घेण्यासाठी ‘Sad सखाराम’ नाटकाला नक्की भेट द्या.

‘Sad सखाराम’ Team

लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीनही स्तरांवर ‘Sad सखाराम’ प्रेक्षकांचं मन जिंकून टाकतो. यामध्ये, लेखकासोबतच दिग्दर्शक नीरज शिरवईकर आणि कलाकार सिद्धार्थ बोडके, वैष्णवी आरपी यांचाही मोलाचा वाटा आहे.

sad sakharam pic 4

तुम्ही ‘अनन्या’ नाटक बघितलं असेल तर अनन्याच्या अपघातानंतर तिच्या आयुष्यात येणारा प्रिन्स चार्मिंग म्हणजे सिद्धार्थ बोडके! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम २’ चित्रपटातील डेविडची भूमिकाही त्याने साकारली आहे. हा अभिनेता मिळालेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं सोनं करतो. या नाटकात त्याला वैष्णवीने कमालीची साथही दिलेली आहे. तिने प्रत्येक व्यक्तिरेखा तितक्याच ताकदीने वठवली आहे. ज्या सहजतेने एका व्यक्तिरेखेतून दुसऱ्या व्यक्तिरेखेत हे कलाकार क्षणर्धात स्विच होतात त्यातून या कलाकारांच्या अभिनयाची क्षमता दिसून येते.

अ परफेक्ट मर्डर’, ‘आमने सामने’, ‘यू मस्ट डाय’ अशी सद्ध्या गाजत असलेली नाटकं युवा लेखक नीरज शिरवईकरने लिहिलेली आहेत. ‘आमने सामने’ नाटकाच्या लेखनासोबतच नाटकाचे दिग्दर्शनही त्याने केले होते आणि ‘Sad सखाराम’ या नाटकाचे दिग्दर्शनही नीरज शिरवईकर याचेच आहे. युगंधर देशपांडे यांच्या लेखनाला परिपूर्ण न्याय देत दिग्दर्शकाने एक नीटनेटका आणि अंतर्मुख होण्यास भाग पाडणारा प्रयोग प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. सखारामचा खूपच गुंतागुंतीचा प्रवास अगदी सहजसोप्या पद्धतीने मांडण्यात दिग्दर्शकाचा सिंहाचा वाटा आहे.

sad sakharam pic 3

या नाटकाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचं नेपथ्य ‘आटोपशीर’ आहे. आटोपशीर म्हणजे हे नाटक कुठेही सादर करता येईल असे याचे नेपथ्य आहे. नाटक म्हणत असले तरी हा साधारण ९० मिनिटांचा दीर्घांक आहे. त्यामुळे, श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह, दादर असो किंवा गोरेगावमधील केशव गोरे स्मारक हॉल, हा दीर्घांक सगळीकडे तितक्याच ताकदीने सादर होताना दिसत आहे.

आजच्या काळात आजच्या पिढीसाठी अशा नाटकाची नितांत गरज आहे. हे नाटक आमच्या भेटीसाठी आणल्याबद्दल आविष्कार संस्थेचे आणि नाटकाच्या संपूर्ण टीमचे खूप आभार!!!

“त्याला आनंद होत नाही. त्याला दुःख होत नाही. त्याला काहीच होत नाही. सखाराम sad आहे… पण आपण नाही, आपण नाटक बघू आणि chill करु! नक्की या.” अशी टॅगलाईन असलेल्या या दीर्घांकाला नक्की भेट द्या.


रंगभूमी वरच्या ताज्या घडामोडीपुढील प्रयोग आणि समिक्षणे मिळवण्यासाठी रंगभूमी.com ला Follow करा:

Natak Tickets Online Booking
Share.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.