Monday, June 14, 2021

तेंडुलकरांच्या सुमारे ३० वयोवर्षीय ‘पाहिजे जातीचे’ नाटकावर बंदी – ज्येष्ठ रंगकर्मींमध्ये असंतोषाचे वातावरण

- जाहिरात -

ज्येष्ठ नाट्य लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे‘ या नाटकाचे हिंदी अनुवादित रूपांतर म्हणजेच ‘जात ही पूछो साधू की’ मध्य प्रदेशातील एका नाट्यमहोत्सवात सादर होणार होते. ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन‘ म्हणजेच इप्टा या संस्थेतर्फे हा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. परंतु बजरंग दलाकडून या नाटकाच्या प्रयोगांवर बंदी आणण्यात आल्याने संस्थेला हा नाट्यमहोत्सव रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

लोकसत्ता वृत्तपत्राच्या काही सूत्रांनुसार, नाटकाच्या शीर्षकामध्ये फक्त “साधू” हा शब्द असल्याने या नाटकावर बंदी आल्याचेही लक्षात येत आहे. परंतु, इतकी वर्षे मनाशी जोपासलेल्या या सुंदर कलाकृतीवर निरर्थक कारण देऊन अचानक बंदी आणण्यात आल्याने नाट्यसृष्टीमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

महाराष्ट्र टाईम्सच्या प्रतिनिधींशी बोलताना ज्येष्ठ रंगकर्मी रवी आविष्कार यांनी सांगितले की, “तेंडुलकर यांच्या नाटकांवर या आधीही बंदी आणली होती. आता मध्य प्रदेशात सादर होणारे नाटक हे मूळ नाटकाचे भाषांतर आहे. हे नाटक २०१८ मध्येही भोपाळमध्ये सादर झाले होते. त्यावेळी त्याची तालीम पोलिसांना आधी द्यावी लागली होती. हे नेहमीच असे होत आले आहे. पण आता पुन्हा बंदी आणल्याने प्रत्येक रंगकर्मीने याविरुद्ध आवाज उठवायला हवा. अन्यथा सतत असा अन्याय होतच राहणार. मध्य प्रदेशात बंदी आली, महाराष्ट्रात काही नाही, असा विचार रंगकर्मींनी करू नये”. “सर्वांनी एकत्रित येऊन अशा सत्तांध मानसिकतेविरुद्ध आवाज उठवायला हवा,” असेही ते म्हणाले.

- Advertisement -

ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी या संपूर्ण नाटक बंदी प्रकरणामागे राजकीय पार्श्वभूमी असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. “२५-३० वर्षांपासून सुरू असलेले हे नाटक चुकीचे होते तर इतकी वर्षे त्याला विरोध का झाला नाही? एवढ्या मोठ्या कालावधीत ते कोणालाच आक्षेपार्ह वाटले नाही? शिक्षणव्यवस्था आणि जातव्यवस्थेवर उपहासात्मक भाष्य करणारे हे नाटक आहे. म्हणूनच आता अचानक विरोध होण्यामागे राजकीय दडपशाही हे एकच कारण असू शकते. सर्वांनी या विरोधात आवाज उठवायला हवा”.

“तेंडुलकरांच्या या नाटकाला विरोध हे सांस्कृतिक अज्ञानाचे दर्शन आहे,” अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी लोकसत्ता वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. “नाटकाच्या शीर्षकाचा ‘साधू’ या शब्दाशी कोणताही संबंध नाही. हे शीर्षक नाटकाच्या अनुवादकाने एका दोह्यावरून घेतले आहे. त्याचा राजकीय किंवा धार्मिक बाबींशी काहीही संबंध नाही.” असेही ते म्हणाले.

“जे नाटक सेन्सॉरसंमत आहे, अशा नाटकाचा प्रयोग बंद पाडणे हे कोणत्याही सुबुद्ध रंगकर्मीला मान्य होणारे नाही,” असे मत प्रसिद्ध रंगकर्मी अतुल पेठे यांनी व्यक्त केले. “आपले मतभेद असतील तर ते वैध मार्गाने लिहून, टीका करून व्यक्त करण्याची संधी आपल्या घटनेने आपल्याला दिली आहे. त्यामुळे बळजबरी करून, धाकदपटशा दाखवून, भीती दाखवून, दहशत निर्माण करून कलेवर बंधने आणणे योग्य नाही. यामध्ये अंतिमत: कलाकारांचेच नाही, तर सर्व समाजाचे नुकसान आहे. भीतीपोटी कलाकार मग स्वत:च काही गोष्टी सेन्सॉर करायला लागतात, ही मला अतिशय चिंताजनक बाब वाटते,” असे पेठे यांनी सांगितले.

ज्येष्ठ अभिनेते नासीरुद्दीन शाह यांनीही लोकसत्ता वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना या संपूर्ण प्रकरणावर परखड शब्दात टीका केली. ते म्हणाले की, “ज्या लोकांनी गदारोळ माजवला, त्यांना हे नाटक कोणत्या विषयावर आहे याची कल्पना आहे, असे मला वाटत नाही. जनतेला विचार करण्यास भाग पाडेल, अशा कोणत्याही कामास अथवा निवेदनास या हिंदुत्ववादी संघटनेस मान्यता द्यायची नाही. तेंडुलकर यांच्या नाटकाला घेतलेला आक्षेप हा मुनावर फारुकी याच्या अटकेशी साधर्म्य दर्शवतो. उजव्या विचारसरणीच्या लोकांना त्रासदायक वाटतील, अशा कोणत्याही विचारांपासून इतर समाजाला दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

इप्टा च्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार ‘जात ही पूछो साधू की’ नाटकाचे आतापर्यंत विविध भाषांतून शेकड्यांनी प्रयोग झाले. आक्षेप घेणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक वाचलेले किंवा पाहिलेलेही नाही असेही आयोजकांनी स्पष्ट केले.

बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र शिव्हारे यांनी, आपल्या संघटनेने कोणतीही धमकी दिल्याचे नाकारले असून, केवळ पोलीस आणि प्रशासनास पत्र लिहून या नाटकांच्या प्रयोगांना बंदी करावी, अशी मागणी केल्याचा खुलासा लोकसत्ता वृत्तपत्राकडे केला आहे.

- Advertisement -
- Advertisement -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.