Saturday, July 31, 2021

वाड्यात जोडलेली माणसे – भाग २: भावना पोहचत नसल्या तरी मनात प्रेम राहतेच ना!

- जाहिरात -

आधी वाचावाड्यात जोडलेली माणसे – लेखकाचे मनोगत

आधी वाचावाड्यात जोडलेली माणसे – भाग १ – …आणि ही ‘वहिनी’ मला माझी वाटू लागली!

घरात एक आजी असली कि नातवंडाची मजा असते. आणि त्यात पणजीसुद्धा असली कि तर वेगळीच मजा. जेष्ठांकडून घरातील लहानांचे म्हणजेच नातवंडांचे आणि पतवंडांचे कोडकौतुक होणे खरंच दुर्मिळ असते. धडधाकट असलेल्या आजी-आजोबांसोबत आयुष्य सोबतीने घालवायला कोणालाही नक्कीच आवडेल. पण सतत चीडचीड करणारे एखादे आजोबा असले, किंवा सतत ओरडणारी एखादी आजी असली किंवा अगदीच एखादी आजारपणामुळे जागीच खिळलेली व्यक्ती असली तर मात्र घरात थोड्या संमिश्र भावना, स्वभाव पाहायला मिळतात. ‘वाडा चिरेबंदी’ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आपली धरणगावकर देशपांडे यांच्या वाड्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख होते तेव्हा सगळ्यात पहिल्या आपल्याला दिसतात त्या म्हणजे भास्कर आणि सुधीर यांच्या आजी. म्हणजेच वाहिनी आणि अंजलीच्या आजेसासूबाई… दादी ! ‘व्यंकटेशा… आरे व्यंकटेशा… कुठं गेला कि बापा हा… किती वाजले रे ?’ फक्त एवढेच सारखे सारखे विचारणाऱ्या ह्या दादीबाई कायम जागीच बसलेल्या अथवा झोपलेल्या दिसत असे.

- Advertisement -

वयोमानापरत्वे कानाने कमी ऐकू येणे आणि अधू होत गेलेली दृष्टी यांमुळे आता बोलून कळणार नाही आणि सांगून समजणार नाही, अशी ह्या दादींची परिस्थिती. एक कोपरा गाठून कायम झोपलेल्या. वाड्यात घडणाऱ्या घटनांचे जणू त्याना सोयरसुतकच नाही. फक्त आपलं दर १५-२० मिनिटानी आवाज द्यायचे, जेवणाची वेळ झाली कि आणून दिलेले पोटात ढकलायचे आणि टाकलेल्या अंथरुणावर मनातील विचारांची धांदोटी सावरत निजायचे, हाच दादीचा दिनक्रम. त्यात चंदुकाकाच तिचं सगळे करत असे. घरासाठी राबणारा चंदूकाका दादीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची संपूर्ण काळजी घ्यायचा.

वहिनी तर नेहमी म्हणायची, ‘दादी म्हणजे चंदू भावजींचे डिपार्टमेंट’. तिच्याविषयी सर्वाना खूप वाटायचे. म्हणून अगदी ऐकू येत नसले तरी सुधीर तिच्याशी बोलण्याचा, तिला परिस्थिती समजावण्याचा प्रयत्न करत असे.

खरच ह्या दादीकडे पाहिले कि असे म्हातारपण ‘चांगले कि वाईट?’ हा मज प्रश्नच पडतो. कारण कानाने ऐकता येत नाही का डोळ्यानी दिसतही नाही; त्यामुळे कोणतीही वाईट गोष्ट कानावर पडून मनावर चांगला – वाईट परिणाम करत नाही; पण याउलट ‘हे असे आयुष्यभर कसे जगायचे?’, हा ही प्रश्न पडतोच मनाला. आयुष्याला एक वेगळेच अनपेक्षित स्थैर्य मिळाल्यासारखे होते. एका प्रसंगात रात्री दादी अचानक उठून बाहेर अंगणातील ट्रॅक्टरजवळ जाऊन बसलेल्या असतात. त्यांना व्यंकटेश म्हणजेच त्यांचा मुलगा आल्याचा भास होतो. एरवी भ्रमिष्ट झाल्यासारखे सतत ‘व्यंकटेश’ला हाका मारणाऱ्या दादी आता मात्र त्याच्याशी बोलू लागतात. मनापासून व्यक्त होऊ लागतात. आता आपली सद्दी संपली. सुना, नातवंडे आली, आपली पोरं मार्गी लागली, आणि त्यात आता तुही(व्यंकटेशही) नाही त्यामुळे माझ्या जगण्यात काही राम राहिला नाही आणि म्हणूनच मला मुक्त कर, अशी इच्छा बोलून दाखवतात. म्हातारपणात आता वेळही जाता जात नाही आणि त्यामुळे मनात अनेक विचारांची सरमिसळ होत राहते.

दादीला जरी ऐकू येत नसले किंवा दिसत नसले तरी तिला वाड्यात होणाऱ्या मतभेदांची, कलहाची थोडीशी चाहूल लागलेली असते. धावणाऱ्या उंदरांमुळे तिच्या अंगावर माती पडली कि ती दचकते आणि लगेच व्यंकटेशला हाक मारते. जसे उंदीर घरभर फिरून घर पोखरून काढतात तसेच काहीसे देशपांडेंच्या वाड्यात घडते आहे, असा भास तिला होतोय. सर्वकाही अलबेल असल्यावर वाटणारे समाधान दादीला मिळत नाहीये त्यामुळेच बहुतेक ती काहीशी अस्वस्थ असते आणि म्हणूनच सतत ‘व्यंकटेश’चे नाव घेत आवाज देत राहते. चंदू काका सोडला तर कोणीही तसे तिच्याकडे विशेष लक्ष देत नाही. आईला मात्र आपल्या सासूबाईबद्दल आदर आहे. तात्याजी गेल्यावर आता त्यांना आयुष्यातील जुने दिवस आठवू लागतात. त्यात गृहप्रवेश करताना दिसलेले दादीबाईचे रूप त्यांना आजही लक्षात आहे. देशपांडेंच्या घराचे पिढीजात दागिने घातलेल्या आईंच्या पणजेसासूबाई, आजेसासूबाई यांच्या यादीत दादी सुद्धा होती. त्यांचाही स्पर्श त्या दागिन्यांना झाला होता.

दादीने आपल्या सासूबाईंकडून मानाने मिळालेले दागिने अभिमानाने आपल्या सुनेला (म्हणजेच भास्करच्या आईला) दिले. शेवटी शेवटी बोलणे सोडून फक्त रडायच्या. बहुतेक वाड्यातील जुने दिवस त्यांना आठवत असावेत. वाड्यात आल्या दिवसापासून ते आजपर्यंत त्यांनी अनेक चांगले – वाईट दिवस पाहिले. देशपांडेच्या घरातील बायकांनी खूप सोसले, अनेकींनी वाड्यातील अनेक बंद खोल्यात जाऊन आसवे गाळली आणि दु:खाला वाट करून दिली. वाड्यातील सुख-दु:खाच्या संसारात दादीसुद्धा होत्या. 

आता मात्र तिची जगण्याची इच्छाच संपली आहे. सगळे काही अनुभवून, सुख-दु:खाचा संसार करून, मुलाबाळांना योग्य मार्गावर सोडून, नातवंडे पाहून तृप्त झाल्यावर पुढे हे असे भकास आयुष्य जगणे तिला असह्य झालेले आहे. स्वत:चा मुलगा, पोटचा गोळा गेला तरीही त्याची पुसटशी कल्पनाही आईला नसणे, किती दुर्दैवी आहे. ते ही सर्वकाही अगदी हाकेच्या अंतरावर आणि समोर घडत असताना. ‘मग्न तळ्याकाठी’च्या अगोदरच दादीबाई निवर्तल्या. पण एक गोष्ट मात्र नक्की, दादीचे आयुष्य हे असे भकास झालेले असले तरी तिचा कोणाला त्रास होत नव्हता, कोणी तिला हटकत नव्हते. वहिनीचे सुद्धा दादीकडे पाहिल्यावर थोडे मन भरून यायचे, भास्करच्या बोलण्यात अहंकार असला तरी दादीविषयी तो काहीसा नरमलेला मी पाहिला.

रंजू दादीच्या सततच्या आवाज देण्याला थोडी वैतागायची; जे खरतर स्वाभाविक आहे. पण तिच्या मनात आपल्या पणजीविषयी प्रेम नक्कीच आहे; किंबहुना वाड्यात प्रत्येकाच्या मनात दादीविषयी प्रेम आहेच. फक्त आता ते व्यक्त करूनही दादीला कळत नाहीये… हीच प्रत्येकाच्या मनात खंत… पण भावना जरी माणसापर्यंत पोहचत नसल्या तरी मनात प्रेम राहतेच ना!


पुढे वाचा → वाड्यात जोडलेली माणसे भाग ३ – उलगडत गेलेला भास्कर! (१६ मार्च, २०२१ ला प्रकाशित होईल.)

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.