प्रकाशयोजनाकार उन्मेष वीरकर यांच्या अनुभवाची शिदोरी


एखादा सिनेमा जर यशस्वी करायचा असेल तर तुमचा छायाचित्रकार (कॅमेरामन) आणि संकलनकार (एडिटर) हे खुप महत्वाचे घटक असतात. छायाचित्रकार दिग्दर्शकाला सिनेमाद्वारे काय सांगायचे आहे हे टिपत असतो आणि संकलनकार सिनेमाची लय, गती यांचा योग्य समन्वय साधून सिनेमा दिग्दर्शकाच्या हवाली करतो. किंबहुना असंच म्हटलं जातं सिनेमा हा नेहेमी एडिटिंग टेबलवरच बनतो.  म्हणूनच विदू विनोद चोप्रा, सत्यजित रे यांच्यासारखे एडिटिंगवर वर्चत्व असलेले दिग्दर्शक खूप यशस्वी झाले. सिनेमा क्षेत्रातील छायाचित्रकार आणि संकलनकार या भूमिका नाट्यक्षेत्रामध्ये प्रकाशयोजनाकार हा एकटा पार पाडत असतो. 

रंगमंचावर अनेक कलाकार असताना बाकी सर्व कलाकारांना कमी प्रकाशात ठेऊन, फक्त एका कलाकारांवर फोकस करून संपूर्ण प्रेक्षागृहाचे लक्ष प्रकाशयोजनाकार जेव्हा त्या फक्त एका कलाकारांवर आणतो, तेव्हा तो कॅमेरामनच्या भूमिकेत शिरून कलाकारांचा close up घेत असतो. आणि एखाद्या प्रवेशाच्या शेवटी आवश्यक तो परिणाम साधला गेल्यावर रंगमंचावर अंधार करून तो प्रवेश संपवतो आणि जेव्हा प्रेक्षकांच्या टाळ्यांची दाद मिळवतो, तेव्हा ती प्रकाशयोजनाकारामधील Editor ला मिळालेली दाद असते. 

खरं तर प्रकाशयोजनेची गरज ही रंगमंचावरील नाटक प्रकाशित करण्यासाठी असते आणि त्यासाठी आवश्यक दिवे सर्वच रंगमंचावर असताना प्रकाशयोजनाकारची गरजच काय ? असा प्रश्न सर्व साधारणपणे सर्वांना पडत असतो. आपल्या अंतर्मनातील कल्पना पडद्यावर बघू पाहणारा किंवा रंगमंचावर अनुभवु पाहणारा प्रेक्षक हा मुळातच डोक्यात काही प्रतिमा घेऊन प्रेक्षागृहतील काळोखात प्रवेश करतो. त्याला उत्सुकता असते ती समोर पडणाऱ्या पहिल्या प्रकाशझोताची.  चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या मागून प्रकाशझोत पडद्यावर पडतो आणि नाट्यगृहात प्रेक्षकांच्या समोरील दर्शनी पडदा उघडल्यानंतर. प्रकाशाची खरी सुरुवात ही इथूनच होते आणि त्यानंतर समोरील रंगीत चौकट पुढील काही तास प्रेक्षकाला मंत्रमुग्ध करते.

आपल्याला लहानपणापासून अभ्यास करताना एक सवय असते, वाचन करताना महत्वाचे मुद्दे आपण अधोरेखित करतो किंवा हल्लीच्या सवयीनुसार रंगीत हायलायटरने highlight करतो. म्हणजेच संपूर्ण धड्यातील महत्वाचा भागावर आपले लक्ष केंद्रित करण्याचा हा आपला प्रयत्न असतो. या महत्त्वाच्या मुद्यांमुळे संपूर्ण धंद्याचा सारांश आपल्या लक्षात राहातो.

प्रकाशयोजनाकार नेमक्या याच भूमिकेतून नाटकाच्या / एकांकिकेच्या महत्वाच्या भागांवर प्रेक्षकांचे लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीनेच प्रकाशयोजनेची आलेखन करीत असतो. यासाठी तो नाटकांच्या अधिक तालमी पाहत असतो. 

लेखकाला नाटकातून काय मांडायचे आहे, तसेच दिग्दर्शकाला काय अभिप्रेत आहे,  नाटकाचा काळ, स्थळ, वेळ काय आहे,  प्रवेशात कुठले प्रसंग / पात्र महत्वाचा मुद्दा मांडते आहे, प्रवेश कुठल्या नोट वर संपतो आणि पुढील प्रवेश किती काळानंतरसुरू होतो, या सर्वांची नोंद प्रकाशयोजनाकार नाटकाच्या तालमी दरम्यान लिटमस पेपरप्रमाणे टिपत असतो आणि याचसाठी प्रकाशयोजनाकाराने नाटकाच्या जास्तीत जास्त तालिमींना उपस्थित राहणे, हे त्याच्याच फायद्याचे ठरते.

इथे सहज एक आठवण सांगतो. साधारण १९९३ साली संभाजी सावंत लिखित आणि रामकृष्ण गाडगीळ दिग्दर्शित “भागपुरुस” नावाच्या एकांकिकेमध्ये, मुख्य भूमिकेत असलेली श्रुजा प्रभुदेसाई ही घरातून कंदील घेऊन संवाद म्हणत दरवाज्यातून घराच्या ओट्यावर येते, असा प्रसंग होता. म्हणजेच तू दरवाज्यातून बाहेर आल्यावर कंदिलाचा प्रकाश घराच्या ओटीवर द्यायचा असे माझे ठरले होते. एकांकिकेचा स्पर्धेतील प्रयोग दामोदर हॉल, परळ येथे होता. प्रयोग सुरू झाला… दामोदर हॉल ज्यांना माहीत असेल त्यांना समजेल की प्रेक्षकांच्या उजव्या बाजूला विंगेत वर असणाऱ्या लायटिंग रुममधून रंगमंचाचा अर्धाच भाग दिसतो. तरीदेखील ज्यावेळी श्रुजा प्रभुदेसाई कंदील घेऊन दरवाज्यातून बाहेर आली त्याचवेळी मी ओटीवरचा प्रकाश दिला. एकांकिका संपल्यानंतर एका जाणकाराने मला आत येऊन भेटून विचारले, लायटिंग रुमधून दिसत नसताना देखील तू त्याच वेळी कंदिलाचा प्रकाश कसा दिलास. मी त्याला सांगितले की मी एकांकिकेच्या सतत तालीमी पाहिल्या होत्या, त्यामुळे संवाद म्हणत घरातून बाहेर येत असताना कुठल्या शब्दाला तिचे पाऊल घराच्या उंबरठ्याबाहेर पडते हे माझ्या लक्षात होते… हाच एकांकिका किंवा नाटकाच्या अनेक तालीमी पाहण्याचा फायदा.

प्रकाशयोजना यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्वाचे असते नाटकाचे पार्श्वसंगीत. वास्तविक जीवनात प्रकाशाचा वेग हा ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे. म्हणजेच आधी वीज चमकते आणि मग विजेचा कडकडाट ऐकू येतो. मात्र रंगमंचावर आधी पार्श्वसंगीत वाजते आणि मग प्रकाश येतो.  त्यामुळे रंगमंचावर प्रकाशयोजनेला पार्श्वसंगीताची साथ मिळाल्यावर कमाल परिणाम साधला जातो.

प्रकाशयोजनाकाराने नाटकाच्या तालमी पाहताना त्या नाटकातील प्रसंगांच्या वेळी वाजणारे पार्श्वसंगीतदेखील ऐकले पाहिजे. त्यामुळे प्रकाशयोजना पार्श्वसंगीताच्या तालावर किंवा लयीत करता येते.  म्हणजे,  एखाद्या दुःखद प्रसंगी जर बांसुरी,  वीणा किंवा सतार अशी शांत सुरावट वाजवली जात असेल, तर त्या लयीतच हळुवारपणे बाकी सर्व लाईट्स कमी करून दुःख व्यक्त करणाऱ्या कलाकारावर फोकस करून वातावरण निर्मिती करता येते. मात्र एखाद्या आघाताच्या प्रसंगी पार्श्वसंगीतातील आघाताबरोबरच, त्याच वेगात बाकी सर्व लाईट्स कमी करून आघात ओढवलेल्या कलाकारावर फोकस करून वातावरण निर्मिती करता येते. म्हणूनच नाटकात नेहेमीच  पार्श्वसंगीतकार आणि प्रकाशयोजनाकार यांची जुगलबंदी अनुभवता येते. त्यामुळे नाटकाचे पार्श्वसंगीत जितके प्रभावी असेल, तितका प्रकाशयोजनेला जास्त वाव मिळतो.

नाटक पाहताना अनेकदा आपण रंगीत प्रकाशझोत पाहतो.  रंगीत प्रकाशझोतासाठी वेगवेगळ्या रंगांचे जिलेटीन पेपर्स वापरले जातात. या जिलेटीन पेपर्सच्या प्रत्येक रंगाला एक स्वतःचा स्थायी भाव पडतो. उदा.  केशरी किंवा पिवळा रंग म्हणजे आल्ह्याददायी,  हिरवा रंग म्हणजे गूढता,  निळा रंग म्हणजे शांत तरलता,  गुलाबी रंग म्हणजे प्रेम, लाल रंग म्हणाजे क्रूरता इत्यादी.  प्रकाशयोजनाकार नाटकातील प्रसंगामधील भावानुरूप प्रकाशाची रंगसंगती ठरवीत असतो.  याचबरोबर नाटकाच्या नेपथ्याचा रंग आणि कलाकारांच्या वेशभूषेचा रंग या दोन्हीचा विचार करूनच प्रकाशयोजनेसाठी रंगांची निवड केली जाते.

नाटकात / एकांकिकेत दोन प्रवेशांमध्ये होणारा काळोख (ब्लॅक आऊट)  हा सुद्धा प्रकाशयोजनेतील महत्वाचा भाग असतो. आधी म्हटल्याप्रमाणे प्रवेश संपल्यावर अचुकवेळी केलेला ब्लॅक आऊट हा प्रेक्षकांची दाद मिळवून जातो. त्या क्षणी वाजणाऱ्या पार्श्वसंगीताच्या लयीत ब्लॅक आऊट करताण गाठलेली अचूक सम प्रेक्षकांना खिळवून ठेवते. हा ब्लॅक आऊट दोन प्रवेशांमधील काळ, स्थळ बदलाचा संकेत असतो. त्यामुळे प्रकाशयोजनाकाराला त्याप्रमाणे ब्लॅक आऊट चा अंतराल ठरवता येतो. किंबहुना ब्लॅक आऊट हा विराम असतो त्यामुळे हा अंतराल जास्त झाला तर प्रेक्षकांची नाटकाशी जोडली गेलेली भावनिक नाळ तुटू शकते. त्यामुळे प्रेक्षकांना पार्श्वसंगीताद्वारे गुंतवून ठेऊन कमीत कमी वेळात पुढचा प्रवेश सुरू केला जातो. एकांकिकांचा एकूण कालावधी लक्षात घेता एकांकिकेत कमीत कमी ब्लॅक आऊट असणे परिणामकारक ठरते.

सरतेशेवटी सर्वात महत्वाचे. सर्व नाट्यगृहातील तांत्रिक कर्मचाऱ्यांशी आपले चांगले संबंध असावेत. जे आपल्याला खूपच मदतीचे ठरतात. आपण काही अंतरालाने प्रयोग करण्यासाठी नाट्यगृहात जात असतो. पण हे तांत्रिक कर्मचारी दररोज तिथे असतात. नाट्यगृहात होणारे प्रयोग त्यांनी पाहिलेले असतात. त्यामुळे त्यांचा अनुभव आपल्याला कित्येक वेळा खूप मोठा मदतीचा हात ठरतो. हे मी स्वतः अनुभवले आहे.

रंगमंचावरील प्रकाशयोजना ही रंगमंचावरील आविष्कार आणि प्रेक्षक यांच्यामधील एकमेकांचे भावविश्व जोडणारी प्रकाश रेषा आहे.


साहित्य सहवास

हा लेख आमच्या साहित्य सहवास या सदरातील असून तुम्हाला या सदरातील नवनवीन लेख आपोआप तुमच्या ई-मेल ईनबाॅक्समध्ये मिळवायचे असल्यास खालील फाॅर्ममध्ये तुमचा ई-मेल वापरून Subscribe करा.


Unmesh Virkar

उन्मेष वीरकर

असंख्य मोहक रंगछटांनी रंगमंच उजळणारा अनुभवी प्रकाशयोजनाकार

प्रकाशयोजनेतूनच ज्याच्या दिग्दर्शनाच्या कक्षाही रुंदावल्या असा हौशी रंगभूमीवरील यशस्वी दिग्दर्शक

Natak Tickets Online Booking
Share.

3 Comments

  1. Pingback: हौशी कलाकारांचा विविध कलाकृतींनी परिपूर्ण Online मेळावा • रंगभूमी.com

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.