साधारण १९९५ पासून प्रायोगिक नाटकांतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केलेलं आनंद इंगळे आजही सातत्याने नाटकातून प्रेक्षकांसमोर येत आहेत. असं कोणतंही वर्ष गेलं नाही ज्यात त्यांचं किमान एकतरी नाटक रंगभूमीवर सुरू नव्हतं. अभिनयाचं उत्तम शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी सत्यदेव दुबे, विजया मेहता, आणि श्रीरंग गोडबोले (ग्रीप्स थिएटर) यांच्या अभिनय प्रशिक्षण कार्यशाळेत सक्रीय सहभाग घेतला. ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ तर्फे सादर केलेल्या ‘पहिलं पान’, ‘आम्ही घरचे राजे’ सारख्या नाटकांतून आनंद इंगळे नावारूपाला आले. आज व्यावसायिक नाट्यक्षेत्रातील एक आघाडीचं नाव असूनही ते ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’ च्या ‘ये जो पब्लिक है’ नाटकामार्फत प्रायोगिक रंगमंचावरही काम करत आहेत. ऑल दि बेस्ट, माकडाच्या हाती शॅम्पेन, तुझ्या माझ्यात, लग्नबंबाळ, अफेअर डील, व्यक्ति आणि वल्ली, सोळा एके सोळा, ९ कोटी ५७ लाख, खरं खरं सांग, नकळत सारे घडले, सूर्याची पिल्ले या नाटकांत त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.