Monday, June 14, 2021

टुरिंग टॉकीज, कंटेनर थियेटर आणि टेरेस थियेटर…

- जाहिरात -

कोरोनाच्या lockdown मुळे घरात बसलोय. उगाचच भूतकाळाबद्दल विचार करायला लागलो आणि अचानक आठवण आली की कॉलेजात असताना मला वाचनाचा जबरदस्त छंद होता. जो आता माझ्या बाबतीत जवळ जवळ नामशेष झालायं. कारण एकच – संसारात पडलो आणि निवृत्तीनंतर आळस. मग ठरवलं – वाचन सुरु करायचं. घरातली सर्व वर्तमानपत्रं काढली. माझी एक सवय, मी वर्तमानपत्र शेवटच्या पानापासून वाचायला सुरुवात करतो. त्याप्रमाणे म.टा. च्या १५ मार्चच्या अंकाचं शेवटचं पान समोर घेतलं. प्रथमेश राणे लिखित लेखाचा मथळा पाहिला, “चित्रपटांना ‘कंटेनर थियेटर’ चे दिवस” हा लेख वाचून काढला.

सिंधुदुर्ग फिल्म फेस्टिवल मध्ये ही संकल्पना उदयास आली असं लेखकाने लिहिलंय. ‘कंटेनर थियेटर’ म्हणजे फिरते थियेटर म्हणजेच टुरिंग टॉकीज – मोबाईल थियेटर. शहरातील थियेटरमध्ये, शहराबाहेरील – गावातील रसिक सिनेमा पहायला येऊ शकत नाहीत म्हणूनच अशी मोबाईल थियेटर म्हणजेच टुरिंग टॉकीज आणि कंटेनर थियेटर अस्तित्वात आली.

मनोरंजन हा मानवी जीवनाचा स्थायीभाव. मानवी जीवनाची करमणुकीची भूक आजपर्यंत कलाक्षेत्र भागवीत आले आहे. प्रामुख्याने विचार करायचा झाला तर, तमाशा क्षेत्र ग्रामीण भागासाठी व काही प्रमाणात शहरी भागासाठी खूप मोठ्या प्रमाणात करमणुकीचे कार्य करीत आहे. खेड्यापाड्यातील जत्रांमधून तमाशा फडांना मिळणारा प्रतिसाद हे त्याचे द्योतक आहे. कोकणातील दशावतार हा मनोरंजनाचा प्रकार देखील कोकणवासियांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

- Advertisement -

तसं पाहिलं तर समाजप्रबोधनाबरोबरच मनोरंजनाच्या बाबतीत नाट्यक्षेत्र अग्रेसर आहे. १८४३ साली मराठी नाटकाचे जनक विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ नाटकाचा प्रयोग झाला. १८६१ साली वि. ज. कीर्तने यांनी ‘थोरले माधवराव पेशवे’ हे नाटक लिहिले. पहिले भाषांतरित नाटक ‘ऑथेल्लो’. त्याचे मराठी भाषांतर म.गो. कोल्हटकर यांनी १८६७ साली केले. बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांचे ‘शाकुंतल’, हे खऱ्या अर्थाने ‘संगीत नाटक’, १८८० साली रंगभूमीवर आले. अर्थात त्यावेळच्या रंगभूमीचे स्वरूप वेगळे होते. उपलब्ध माहितीनुसार, पहिला मूकपट ‘राजा हरीश्चंद्र’ एप्रिल १९१३ साली तर पहिला बोलपट ‘आलमआरा’ १९३१ साली प्रदर्शित झाले.

आता काही तरुण उत्साही कलाकार / निर्मात्यांनी कंटेनर थियेटरची संकल्पना अंमलात आणली आहे. त्यामुळे ग्रामीण रसिकांची चित्रपटांची भूक भागवणारे आणखी एक क्षेत्र उपलब्ध झाले.

पण रंगमंचित होणारी व्यावसायिक नाटके ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोचण्यात अपुरी पडली. तिथेच व्यावसायिक नाट्यक्षेत्राचे तोकडेपण लक्षात येते. दौऱ्यावर जाणाऱ्या काही नाटकाचे प्रयोग, सिनेमा थियेटरच्या पडद्यासमोरील उपलब्ध रंगमंचावर आवश्यक तेवढे नेपथ्य, प्रकाशयोजना आणि इतर तांत्रिक अंगाचा वापर करून होत आले आहेत. प्रेक्षकांना असेही प्रयोग आवडले आहेत. पण त्यात सातत्य नाही.

बंदिस्त थियेटर मध्ये जाऊन प्रयोग पहाणे बऱ्याच वेळा शक्य होत नाही. बऱ्याचदा परवडत नाही. कारण तिकिटांचे दर आणि इतर खर्च, कॉर्पोरेट जगातील अनिश्चित कार्यालयीन वेळ, अशी इतर अनेक कारणे आहेत. त्यामुळे शहराबाहेरील रसिक प्रेक्षक नाटक पहायला क्वचितच आणि शहरात आले तरच जातात. तर शहरातील रसिकांची वेगळीच अडचण. उपनगरे फोफावली आणि कार्यालयातून घरी पोचायलाच रात्र होऊ लागली. त्यानंतर नाट्यगृहात जाऊन नाटक पहाणे कमालीचं कठीण होत गेले. शनिवार किंवा रविवारी नाटक पहाणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. त्यामुळे नाट्यगृहातील प्रेक्षक संख्या कमालीची रोडावली. निर्मात्यांची कुचंबणा झाली. पण तरीसुद्धा नाटके बंदिस्त नाट्यगृहातच सादर होत आहेत. विंगा, मागील पडदा, पुढील पडदा, रंगभूषा, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना इत्यादी तांत्रिक गोष्टीत अडकून पडली आहेत. कारण या सर्व गोष्टी फक्त बंदिस्त नाट्यगृहातच शक्य आहेत. मराठी नाटक जिवंत ठेवायचे तर प्रेक्षक नाट्यगृहाकडे यायलाच हवा. पण तेच शक्य होत नाही.

प्रयोग मालाड’ या हौशी नाट्यसंस्थेने ४१ वर्षापूर्वीच आपल्या परीने यावर उपाय शोधून काढला. प्रेक्षक नाट्यगृहाकडे येत नसतील तर नाट्यगृहच प्रेक्षकांकडे नेलं तर? विंगा, मागील पडदा, पुढील पडदा, रंगभूषा, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना इत्यादी तांत्रिक गोष्टीत न अडकता फक्त आवश्यक गोष्टी म्हणजेच शक्य असलेली प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत आणि मुख्य गोष्ट, जे पहायला रसिक प्रेक्षक नाट्यगृहात येतात, तो अभिनय, एवढचं नाटक सादर करायला पुरेसं आहे का? प्रेक्षकांच्या सोयीच्या वेळेतच, त्यांच्याच दारात रंगमंच नेला तर? सर्व कलाकारांची चर्चा झाली आणि तिथेच “टेरेस थियेटर” चा जन्म झाला.

त्यावेळचे “प्रयोग मालाड” चे नाट्यशाखा प्रमुख आणि आजचे ज्येष्ठ रंगकर्मी, श्री. रामकृष्ण गाडगीळांच्या मार्गदर्शनाखाली १२ ऑक्टोबर १९७९ रोजी गणेशवाडी, चिंचवली, मालाड (पश्चिम) येथे दोन एकांकिकांचा पहिला प्रयोग झाला. त्यानंतर “टेरेस थियेटर” वर “प्रयोग मालाड” चे नाट्यप्रयोग होतंच राहिले. त्यावेळी “प्रयोग मालाड” ने फक्त दोन मोठे लाईट आणि पार्श्वसंगीतासाठी एक टेपरेकॉर्डर एवढ्याच साहित्यासह वेगवेगळ्या इमारतींवर “टेरेस थियेटर” चे शेकडो प्रयोग केले. पण हे उपद्व्याप फक्त काही हौशी नाट्यसंस्थाच करीत होत्या.

आज नाट्यगृहातील रोडावलेली प्रेक्षक संख्या पहाता, अशा प्रकारच्या “टेरेस थियेटर” ची खरोखरच आवश्यकता आहे. “प्रयोग मालाड” ने त्यावेळी मोजक्याच साहित्यासह नाटकाचे सादरीकरण केले. बदलत्या काळात सोसायटीचे सभागृहही थियेटर म्हणून वापरले गेले. पण नाट्यसाहित्य मोजकेच राहिले. नेपथ्यही उपलब्ध टेबल आणि खुर्च्यांचेच राहिले. क्वचित प्रसंगी ठोकळे आणि बाकडेही वापरले गेले.

आज आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. “टेरेस थियेटर” साठी folding चे नेपथ्य सहज बनवता येईल. प्रकाशयोजना, विंगा, ध्वनीयंत्रणा, पार्श्वसंगीतासाठी अशाच प्रकारे “easy to carry” व्यवस्था करता येईल. प्रेक्षक सोसायाटीचेच. नाट्यगृहच आपल्यापाशी आल्यावर सोसायाटीतील प्रेक्षक का नाही येणार नाटक पहायला? 

संपूर्ण नाट्यक्षेत्राला सध्या मरगळ आली आहे, अशी ओरड करणाऱ्या व्यावसायिकांनी बंदिस्त रंगमंचाची चौकट मोडून बाहेर आले पाहिजे. शाळांमधील मोठा हॉल, हौसिंग सोसायट्यांमध्ये असलेला कम्युनिटी हॉल किंवा काही ठिकाणी असलेली ऍम्फी थियेटर्स, नाटकाच्या सादरीकरणासाठी उपलब्ध होऊ शकतात. सर्व सुखसोयी नसतील, उत्पन्न अपेक्षेनुसार नसलेही. पण नाट्यक्षेत्र जिवंत ठेवण्यासाठी थोडी पदरमोड सोसून व्यावसायिकांनी नाट्यप्रयोग करावेत असे वाटते.

थोडक्यात, इमारतींच्या टेरेसचे, शाळेतील / सोसायटीतील सभागृहाचे, दोन इमारतींमधील मोकळ्या जागांचे नाट्यगृहात रुपांतर करता येईल. हे फक्त हौशी नाट्यसंस्थाच शक्य करू शकतात असे नव्हे. व्यावसायिक निर्मातेही थोडी जोखीम पत्करून अशा प्रकारे नाट्यगृह उभे करू शकतात. मार्ग आहे पण इच्छा हवी.

सिनेमा दाखविण्यासाठी निर्माते जर टुरिंग टॉकीज, कंटेनर थियेटर सारखे प्रयोग करून यशस्वी करून दाखवतात तर नाटकासाठी “टेरेस थियेटर” का नाही?

— रामकृष्ण गाडगीळ आणि प्रदीप देवरुखकर

- Advertisement -
- Advertisement -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.