अभिनेता-अभिनेत्री यांना आपण त्यांच्या चांगल्या-वाईट कलाकृतीने ओळखतो. दिग्दर्शक या कलाकृतींना वळण देतात. तांत्रिक बाजू भक्कम करत त्या कलाकृतीच्या रुपात अधिकच भर पडत जाते. पण, एखादी कलाकृती घडण्याची प्रक्रिया सुरू होते ती लेखकापासून! लेखक जे लिहितो तेच आपल्या डोळ्यासमोर सादरीकरणाच्या स्वरुपात जिवंत उभं राहतं. याच लेखकाच्या अंगीभूत असलेल्या लेखन कलेच्या अस्मितेवर आणि पर्यायाने त्याच्या ‘कलाकार’ असण्यावरच सांस्कृतिक कार्य संचालनालकडून प्रश्नचिन्ह उभं करण्यात आलेलं आहे. एका लेखकाला म्हाडाच्या सोडतीमध्ये ‘कलाकार’ कोट्यातून घर लागलं. परंतु, पुढील प्रक्रिया पूर्ण करताना त्यांना एका विचित्र पेचात अडकविण्यात येत आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडे ‘कलाकार प्रमाणपत्र’ मागितले असता, ‘लेखक हे कलाकार नाहीत’, असे खळबळजनक उत्तर संचालनालयाकडून मिळाले.
महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना लेखकाने(नाव अद्याप समोर आलेले नाही) कलाकार कोट्यातून म्हाडाचा अर्ज भरला होता. त्याला घरही लागलं. पण, पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हवे असलेले कलाकार प्रमाणपत्र मिळविण्यासाठी त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेले दोन आठवडे ते संचालनालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत, असे मटाच्या वृत्तात मांडण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या मते लेखक सादरीकरण करत नाहीत. त्यामुळे, ते कलाकार नाहीत. म्हणून, त्यांना ‘कलाकार प्रमाणपत्र’ देता येणार नाही. एवढ्यावरच न थांबत, ‘ज्या लेखकांना याआधी घरे मिळाली आहेत, त्यांच्याकडून ती परत घेण्यासाठी आम्ही म्हाडाला पत्र लिहू,’ अशी भूमिकाही संबंधित अधिकाऱ्यांनी मांडल्याचे मटा प्रतिनिधीला सांगण्यात आले.
प्रयोगात्मक सादरीकरण करणाऱ्या कलाकारांना आम्ही कलाकार प्रमाणपत्र देतो. लेखक सादरीकरण कलेत येत नाहीत. ज्यांनी केवळ लिखाण केले आहे, त्यांना आम्ही प्रमाणपत्र देऊ शकत नाही. ज्या लेखकांनी अभिनय केला आहे, अशांना यापूर्वी कलाकार प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
विभीषण चवरे, संचालक सांस्कृतिक कार्य (सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स)रंगकर्मींच्या संतप्त प्रतिक्रिया
मराठी मनोरंजन क्षेत्रातील लेखकांच्या या शोकांतिकेचा परिणाम राज्यातील सर्जनशील वातावरणावर होऊ शकतो. सरकारने लेखकांच्या भूमिकेला मान्यता देऊन त्यांच्या कलात्मक कार्याला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. लेखकांशिवाय कोणताही कलाकार काम करू शकत नाही. मालिका, नाटक, सिनेमा लिहिणारे सर्व लेखकही ‘कलाकार’च आहेत. या प्रकरणी आम्ही सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊ.
विवेक आपटे, अध्यक्ष, मानाचि (सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स)
लेखकांच्या कलात्मक कार्यामुळेच नाटक, मालिका, चित्रपटांची निर्मिती होते. लेखकांना कलाकार म्हणून मान्यता न मिळणे हा त्यांच्या कलेच्या अपमान आहे. लेखक हा सादरीकरण कलेचा मूळ आहे. लेखकाने कालाकृतीचे लिखाणच केले नाही, तर कलाकार कोणत्या कलाकृतीत काम करणार? संचालनालयाच्या नजरेत लेखक कलाकार का होऊ शकत नाही? विभागाने त्यांच्या धोरणांचा पुनर्विचार करावा.
राजेश देशपांडे (सौजन्य: महाराष्ट्र टाईम्स)
सरकारी जाहिराती लिहायला लेखक लागतात ना?
शशांक केतकर(अभिनेता)
बरोबरच आहे, लेखक कलाकार नाहीतच. सगळे दिग्दर्शक व अभिनेते स्वयंभूच आहेत. स्टेजवर, स्क्रीनवर येऊन ते बाराखडी आणि पाढेच म्हणतात. लेखन ही कला थोडीच आहे? किराणा मालाची यादी आणि संहीता यात काही फरक नाही. अच्छा ते स्टेजवर भाषण देणाऱ्या नेत्यांना अधिकृत कलाकार मानायचं का आता?
समीर विद्वंस(मराठी व हिंदी चित्रपट दिग्दर्शक)
खरं आहे सरकारचं…त्यांच्या लेखी सध्याच्या काळात नेत्याइतका श्रेष्ठ कलावंत दुसरा कोणीही नाही…हुजरेगिरी करणारे…लाळघोटे… कलावंत म्हणून मिरविणाऱ्यांचीच संख्या आजूबाजूला जास्त…लेखकानेही आपले कलम हल्लीच्या काळात म्यान करून ठेवले…राज्यकर्ते सर्वात जास्त घाबरतात ते लेखकांनी केलेल्या शब्दवारांना…त्यांना कलावंत म्हणून बहुमान देणार तरी कसा?…सरकारला लेखक कलावंत म्हणून मान्य नसेल तर आता वेळ आली आहे लेखकाने आपल्या लेखणीतून सरकारला जागा दाखविण्याची…कलावंत म्हणून लेखकाचे स्थान सर्वप्रथम होते…आहे…आणि असणार आहे. कलावंत म्हणून या कृतीचा मी निषेध करतो.
सचिन शिंदे(नाटक व चित्रपट दिग्दर्शक)
1 Comment
सांस्कृतिक कार्य संचालनालयानं घेतलेल्या या निर्णयाचा एक लेखक म्हणून मी तीव्र निषेध करतो.लेखक हा तर कलेचा निर्माता आहे. त्याला कलाकार म्हणून न ओळखणाऱ्या संचालनालयाची कीव करावी तेवढी थोडीच आहे. लेखक हा तर पाया आहे आणि त्यानं जी दुनिया उभी केलेली असते त्यावर सगळा डोलारा उभा असतो. संचालनालयाने आपला निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि लेखक हा कलाकार आहेच हे मान्य करावे
रवींद्र भगवते
( कथाकार, नाटककार, कवी, अनुवादक )