नाटक ही एक लोकप्रिय आणि मानाची कला मानली जाते. महाराष्ट्रातील रसिक मायबाप प्रेक्षकांच्या आयुष्यात नाटकासाठी एक वेगळी जागा कोरली आहे. वाढत्या लोकप्रियतेसोबत ही कला व्यवसाय म्हणूनही नावारुपाला आला आहे. व्यावसायिक नाटकांमधून कितीतरी कलाकारांचा उदर्निरवाह होत आहे. एकीकडे मराठी नाटकं मोठी होत आहेत आणि दुसरीकडे नाट्यगृहे मात्र अजूनही खराब अवस्थेत आहेत. काल पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात भरलेल्या सर्वसाधारण सभेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी आमदार शिरोळे यांच्या समोर परत या सर्व तक्रारींचा पाढा वाचून दाखवला. प्रशांत दामले हे त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांनी स्पष्टपणे विचारलं की, ‘नाट्यगृह नूतनीकरण होत असताना आवश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष कसं केलं जातं?’
एकाच वेळी कितीतरी व्यावसायिक नाटकं यशस्वीपणे महाराष्ट्रात सुरू आहेत. अशावेळी, या सर्व नाटकांना तिकीट काढून येणारा प्रेक्षक आणि रंगमंचावरील सादरीकरण करणारे कलाकार या दोघांच्याही मूलभूत सोयींचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबद्दल कित्येकांनी तक्रारीही केल्या आहेत. परंतु, वारंवार कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, प्रेक्षक यांनी सांगितलं असूनसुद्धा नाट्यगृहांच्या परिस्तिथीत काहीच बदल झालेला नाही.
विशाखा सुभेदार यांची फेसबुक पोस्ट द्वारे तक्रार (१५ मे, २०२२)
“बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे ला ‘कुर्रर्रर्रर्र’चा प्रयोग झाला. सातत्याने गंधर्व बद्दल बातम्या कानावर येत आहेत.. बांधकाम करायचं आहे.. पण म्हणून आत्ता जे नाटका साठी वापरात येत आहेत त्याची काळजी घ्यायला नको का?
बालगंधर्व.. जिथे प्रयोग करायला आम्ही कलाकार मंडळी आसुसलेले असतो. पण तिथे ग्रीनरूम मध्ये गेल्यावर मात्र जीव नकोसा होतो. मेकअपरूम ची अवस्था भयाण असते. स्वच्छता याचा काहीही संबंध नसतो.. आरसे डागळलेले.. Makeup box ठेवायला त्या खालचा कट्टा जेमतेम, बसायला “खुर्च्या” नुसत्या म्हणायला.. चारपाय आणि बुड टेकायला एक फळी प्लास्टिक ची इतकीच तीची खुर्ची म्हणून ओळख.. ती कधीही तुटेल अशी तीची अवस्था.. त्यात मी बसले तर पुढच्या प्रयोगातील माणसांची गैरसोय होईल म्हणून मी बसतही नाही..
आणि मग वेळ येते ती तिथल्या बाथरूम ची.. अतिशय घाण. अस्वछ..वास.. कधी कधी नुसतच मरणारंच फिनेल मारून ठेवतात.. पण बाकी अस्वछच.. काहीच कशी फिकीर बाळगत नसावेत…? बालगंधर्व च्या प्रयोगा नंतर मी कायम युरीन इन्फेकशन घरी घेऊन जाते.प्रयोग संपल्यावर प्रेक्षक फोटो काढायला म्हणून येतो तेव्हा मला उगाचच लाज वाटते.. तिथे लॉबी मध्ये येणाऱ्या घाणेरड्या वासाची.काय म्हणतील लोक? लोक काही ही म्हणत नाहीत…!
आणि ac ची सोय.. त्या ac ला आपला जन्म थंड हवा देण्यासाठी झालाय हे माहितीच नसावं…इतका तो निवांत फुंकत बसलेला असतो. बर ह्याबद्दल तक्रार करावी तर, तर तिथले कर्मचारी म्हणतात.. कीं तो स्लोच आहे.. मग काय आम्ही स्टेजवर घाम गाळीत करतोय अभिनय.
श्वास जो एकेक वाक्य घेताना पुरावायचा, तो घेता येणं मुश्किल होतं आणि त्यात movment ची धावपळ…timming साधायच, कपडे बदल, ही तारेवरची कसरत असते.. घामामुळे कपडे चिकटलेले असतात.. जवळ जवळ कापडं खेचून काढावी लागतात. त्यामुळे चेंजिंग ची वेळ बदलते.. अमुक वेळातच व्हायला हवं ते घडत नाही. वारं नसतंच तिथे. त्यामुळे कामं करा आणि राहिलात तर जगा किंवा मग मरा. भाडे मात्र नीट आकारलं जातं.”
‘सकाळ’च्या लेखात नाट्यनिर्माते श्रीपाद पद्माकर यांचे मनोगत (९ मे, २०२२)
“बालगंधर्व रंगमंदिरात डासांचा प्रचंड प्रमाणात त्रास जाणवतो. विशेषतः रात्रीच्या प्रयोगांना हा त्रास असह्य होतो. महापालिकेने याबाबत युद्धपातळीवर तोडगा काढला पाहिजे. अण्णाभाऊ साठे स्मारकात इतर सुविधा उत्तम आहेत. मात्र साउंड सिस्टिमची व्यवस्था निर्मात्यांना स्वतःलाच करावी लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतो. हा खर्च खरेतर परवडत नाही, परंतु पर्याय नसल्याने नाईलाजाने हा खर्च करावा लागतो आहे.”
सुयश टिळक या अभिनेत्याने BBC मराठीशी केलेलं वक्तव्य (१७ मे, २०२२)
अभिनेता सुयश टिळक याने बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, “स्पष्ट सांगायचं झालं तर केवळ बालगंधर्वच नाही, तर महाराष्ट्रातल्या अनेक नाट्यगृहांची दुरवस्था आहे. बालगंधर्वबद्दल बोलायचं झाल्यास इथले वॉश रुम खरंच खराब आहेत. एसी फंक्शनल नाहीयेत. काही प्रयोगांना पाहिलं की, डासांचा पण त्रास आहे. असे अनेक प्रॉब्लेम आहेत.”
“आता बालगंधर्वाच्या पुनर्विकासाची चर्चा सुरू आहे. यासंबंधी जो काही निर्णय आहे, तो लवकरात लवकर घेतला जावा असं मला वाटतंय. कारण जिथे प्रयोग सुरू आहे, असं नाट्यगृह बऱ्याच काळासाठी बंद राहिलं तर नाटकांचे प्रयोग करणार कुठे?” असा प्रश्न सुयश टिळकने उपस्थित केला.
जर बालगंधर्वचा पुनर्विकास झालाच तर प्रयोगांसाठी पर्यायी सोय उपलब्ध करून द्यायला हवीत. जी नवीन नाट्यगृहं बांधली आहेत, ती तातडीनं खुली करण्यात यावीत असंही सुयशनं म्हटलं.
बालगंधर्व रंगमंदिर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं नाट्यगृह आहे. मेकअप रुममध्ये लाईट नसणं, मेकअप रूमची वेळोवेळी न झालेली स्वच्छता, प्रेक्षागृहात तुटलेल्या खुर्च्या असणे, वातानुकूलित सभागृह असतानाही AC बंद असणे या आणि इतर अनेक तक्रारींकडे रंगमंदिर व्यवस्थापन आणि प्रशासन कानाडोळा करीत आले आहेत. या अव्यवस्थेबद्दल सामाजिक माध्यमावर काही कलाकार व्यक्त सुद्धा झाले आहेत.
दामले यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदार शिरोळे म्हणाले, पार्किंग-लॉजिंगचा प्रश्न, मेकअप रूमचा प्रश्न, खराब झालेल्या AC चा प्रश्न या सर्व प्रश्नांना लवकरात लवकर मार्गी लावण्याचा सरकार म्हणून आम्ही प्रयत्न करू आणि परत अशी कोणतीही तक्रार करायची वेळ येणार नाही ही काळजी आम्ही घेऊ. आमदार शिरोळे यांनी दिलेलं आश्वासन खरच काही फायद्याचं ठरतं का… की नेहमीप्रमाणे कलाकार आणि प्रेक्षकांच्या वाटेला वाट बघणंच येतं याचं उत्तर मिळेलच काही दिवसात!
[Cover image by Pakshya via Wikimedia Commons]
1 Comment
ही सर्व गैरव्यवस्था आहे कारण कि सगळी नाट्यगृहे महानगरपालिकेच्या ताब्यात आहेत. ती जर खाजगी व्यवस्थापनात गेली तर चांगली होतील.