Search for:
News

हसवाफसवी नाटकातील गुलछबू वाघमारे कालवश!

Pinterest LinkedIn Tumblr

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. लीलाधर कांबळी यांचे २ जुलै, २०२० रोजी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेली २ वर्षे ते कॅन्सरशी लढा देत होते. हसवाफसवी, केला तुका नि मका झाला, वस्त्रहरण या नाटकांमधील त्यांनी साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या. त्यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्याही बरोबर अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली. दिलीप प्रभावळकरांच्या बहुरूपी भूमिकांनी अजरामर झालेल्या हसवाफसवी नाटकामध्ये लीलाधर कांबळी यांनी दिलीप सरांना अचूक साथ दिली होती. त्यामुळेच हसवाफसवी नाटकामधील वाघमारे प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. वस्त्रहरण आणि हसवाफसवी या नाटकांचे त्यांनी परदेश दौरेही गाजवले.

‘भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही त्यांनी काम केले. ‘बे दुणे तीन’ ही मालिका खूप लोकप्रिय ठरली.

‘हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे ३० हून अधिक नाटकांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ अशा त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका.

२०२० साली रंगसृष्टीपासून दूर गेलेल्या ताऱ्यांमध्ये आज हा अजून एक तारा जोडला गेला. श्री. लीलाधर कांबळी यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.