शुभारंभाचा प्रयोग | रविवार,२ मार्च २०२५, दु. १:०० वाजता | बालगंधर्व रंगमंदिर
लेखक – डॉ. समीर वसंत कुलकर्णी
दिग्दर्शक – अमित वझे
संगीत – जयदीप वैद्य, निनाद सोलापूरकर
चित्रे – मिलिंद मुळीक
प्रकाशयोजनाकार – सुजय भडकमकर
सादरकर्ते – अंजली मराठे, पार्थ उमराणी, शौनक कुलकर्णी, केतन पवार, ओंकार जोशी, गजानन परांजपे, अमित वझे आणि मधुराणी गोखले
खरं सांगायचं तर आज ३ – ४ दिवसांनंतरही मी अजून त्या रंगमंचीय भारावलेपणातच आहे. पण, हा अनुभव नव्हे ही अनुभूती ताजी असेपर्यंतच आपल्यापर्यंत पोचवावी असंही मला वाटतंय, म्हणून हा शब्दप्रपंच.
सांस्कृतिक भूक असलेला रसिक म्हणून काही गोष्टी आपण पाहतो, ऐकतो, त्याचा आस्वाद घेतो. परंतु, काही गोष्टी आपल्यातला रसिक ओलांडून थेट पल्याडच्या माणसाच्या अंतःकरणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. ही कलाकृती तशीच आहे. आपल्या जाणिवांना घडवणारी, त्यांना अजून गडद करणारी.
देव – परमेश्वर – भगवंत… आपल्याकडे ही संकल्पना खूप व्यक्तीसापेक्ष आहे. कुणी त्याला सगुण साकार म्हणतो; तर कुणी निर्गुण निराकार. कुणाला तो मूर्तीतून दिसत असतो तर कुणाला एखाद्या माणसाच्या रुपात. काहीही असलं तरीही ज्याचा त्याचा देव, ज्याचा त्याचा विठ्ठल केव्हातरी ज्याला त्याला सापडत असावा, सापडतो. ह्या कार्यक्रमात एक सुंदर वाक्य आहे, “ शुभंकर वाट्याला यायचं असेल तर किमान आपली ओंजळ तरी उघडी असावी लागेल की नाही !? ”
(हे एकच नाही अशी अनेक सुंदर वाक्यं या कार्यक्रमातून वळणावळणावर आपल्याला ऐकायला मिळतात आणि आपण आपल्या मनातलं एखादं कोडं अचानक उकलल्यासारखं विस्मयाने मंद हसू लागतो आपल्याशीच!!)
ही ताकद असते त्या शब्दांत, त्या संगीतात, त्या सुरांत-स्वरांत, एकुणात त्या सादरीकरणात की आपण तत्क्षणी अंतर्मुख होऊन जातो. डॉ. समीर वसंत कुलकणी यांच्या लिखाणाच्या मी ‘कवी जातो तेव्हा…’ पासून प्रेमात आहे. आणि सुदैवाने मी त्यांना हे भेटून कळवू शकलो. शब्दांतला सोपेपणा पण तरीही त्यात गहन अर्थ असलेलं लिखाण मनाला प्रचंड भावतं.
अंजली मराठे, पार्थ उमराणी, शौनक कुलकर्णी ही मंडळी आपल्या गायनातून एक वेगळंच अवकाश आपल्या समोर उभं करतात. मला भावलेली अजून एक गोष्ट म्हणजे वापरात असलेल्या प्रचलित असलेल्या चालींपेक्षा अभंगांना दिलेल्या नवीन चाली. ते अभंग अशा स्वरुपात खूप छान वाटतात. ह्या कार्यक्रमाचे संगीतकार जयदीप वैद्य आणि निनाद सोलापूरकर या दोघांचं या निमित्ताने विशेष कौतुक!! केतन पवार, ओंकार जोशी ही साथीदार मंडळी देखील आपल्या वादनाने बहार आणतात.
(हे नवीन चालींचे अभंग कुठले? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा कार्यक्रम बघावाच नव्हे अनुभवावाच लागेल)
कवी जातो तेव्हा.. , प्रिय भाई एक कविता हवी आहे आणि ज्याचा त्याचा विठ्ठल या तिन्ही कार्यक्रमांसाठी मिलिंद मुळीक यांनी चित्रे काढलेली आहेत. त्यांचं काम काय परिणाम घडवून आणतं, सादरीकरणाला कसं पूरक ठरतं ही अशी सांगण्याची नाही, तर त्याचा साक्षीदार होऊन पाहण्याची गोष्ट आहे. त्यांच्या ब्रशने जादू केली आहे.. जादू. नेहमीप्रमाणे!!
अभिवाचकांच्या भूमिकेत असलेली त्रयी अर्थात अमित वझे, गजानन परांजपे आणि मधुराणी गोखले यांच्या सादरीकरणाबद्दल मी काय बोलू ? त्यांचं अभिवाचन अंतर्मुख व्हायला भाग पाडत राहतं. आपण आपल्या विचारांच्या लूप मध्ये अडकतो की काय असं वाटत असताना पुढचं एखादं कमालीचं वाक्य येतं आणि आपण मागचे विचार तिथेच सोडून त्या पुढच्या विचारांत बुडू पाहतो. गजानन परांजपे हे या क्षेत्रातलं एक अजब रसायन आहे!
त्यांचं अभिवाचन हा सुरुवातीला माझ्या आवडीचा विषय होता, तो आता जिव्हाळ्याचा विषय बनलेला आहे.
आणि लास्ट बट नॉट द लिस्ट,
सुजय भडकमकर.. सुजय भडकमकर हा माझा एकदम लाडका माणूस आहे. मी त्याची प्रकाशयोजना अनेक कार्यक्रमांतून, प्रयोगांतून पाहिली आहे. त्याची प्रयोगशीलता मला विलक्षण आवडते. ह्या कार्यक्रमात त्याची प्रकाशयोजना पाहणं हे एक स्वतंत्र सौदर्यस्थळ आहे.
ह्या कार्यक्रमाला उभा करण्यात ज्यांचा ज्यांचा छोटा-मोठा हातभार लागला अशा सर्वांचे एक रसिक प्रेक्षक म्हणून मी खूप खूप आभार मानतो. असे आशयघन कार्यक्रम आम्हाला वारंवार पाहायला मिळावेत, ही नटराजाकडे प्रार्थना!!
हा कार्यक्रम तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात जेव्हा केव्हा लागेल तेव्हा तो नक्की अनुभवा. आणि शक्य असल्यास रिकामे जा कारण जितके रिकामे जाल तितके भरून याल!!
ओंकार चंद्रशेखर केसकर