एकांकिका स्पर्धा म्हणजे प्रायोगिक रंगभूमीवरील काम करणाऱ्या कलाकारांसाठी उत्सवच. ऑगस्ट पासून सुरू होणारा हा प्रवास. सुरुवातीला पुरुषोत्तम करंडक, INT, लोकसत्ता लोकांकिका करंडक, जी एच रायसोनी करंडक, दाजीकाका गाडगीळ करंडक, अशा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आणि मग त्यानंतर कोकणातील राज्यस्तरीय स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा, अशा अनेक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा खेळण्याचा अनुभव हे तरुण कलाकार घेत असतात. याच दरम्यान रंगायतन करंडक, अटल करंडक, अहील्यानगर महाकरंडक, असे काही मानाचे करंडक देखील असतात जे मिळवणे हे सर्वांचे स्वप्न असते. अशाच मानाच्या करंडकांमध्ये एक अशी स्पर्धा जी फार जुनी आणि मानाची असून सर्वांचेच त्या स्पर्धेकडे लक्ष असते. ही मानाची राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा म्हणजे, चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई एकांकिका स्पर्धा. सवाई करणं हे प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. ही स्पर्धा ३५ वर्ष जुनी असून नाट्यक्षेत्रातील फार मोठ्या कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा या स्पर्धेचे वैशिष्ठ म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एखाद्या संघाने सदर वर्षात महाराष्ट्रातील कोणत्याही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक पटकावला असेल तरच ते सवाई स्पर्धेचा अर्ज भरण्यास पात्र होऊ शकतात. राज्यभरातील प्रथम क्रमांक मिळवलेल्या २५ ते ३० एकांकिका सवाईसाठी अर्ज करतात आणि त्यांच्यात प्राथमिक फेरी होते. सवाई अंतिम फेरीसाठी ७ एकांकिकांची निवड होते. आणि मग दि. २५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ही स्पर्धा सुरू होते. पहाटे ५ वाजता वंदेमातरम् गाऊन प्रजासक्ता दिन साजरा केला जातो आणि मग पारितोषिक वितरण सोहळा सुरू होतो. २५ जानेवारी ची ती रात्र स्पर्धक म्हणून जगण्यासाठी सर्वच कलाकार आतुर असतात.
याही वर्षी दि. ११ आणि १२ जानेवारी रोजी चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२४ ची प्राथमिक फेरी पार पडली ज्यामध्ये २७ प्रथम क्रमांक मिळवलेल्या एकांकिकांचा समावेश होता.
यावर्षीच्या सवाई अंतिम फेरीतील ७ एकांकिका खालीलप्रमाणे
सिडनहॅम महाविद्यालय, मुंबई
सादर करीत आहे,
अविघ्नेया
कलादर्शन व नाट्यशृंगार, पुणे
सादर करीत आहे,
Boiled – शुद्ध शाकाहारी
संहिता क्रिएशन्स, मुंबई
सादर करीत आहे,
१४ इंचाचा वनवास
महर्षी दयानंद महाविद्यालय, परेल
सादर करीत आहे,
ब्रह्मपुरा
क्राऊड नाट्यसंस्था, डोंबिवली
सादर करीत आहे,
चिनाब से रावी तक
मराठवाडा मित्रमंडळाचे वाणिज्य महाविद्यालय, पुणे
सादर करीत आहे,
सिनेमा
तिसरी घंटा, परळ – मुंबई
सादर करीत आहे,
सेक्स ऑन व्हील्स
चतुरंग प्रतिष्ठान आयोजित सवाई राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२४ च्या प्राथमिक फेरीसाठी महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक श्री. सचिन गोस्वामी, ज्येष्ठ अभिनेते श्री. अरुण नलावडे, आणि अभिनेत्री व लेखिका सौ. शिल्पा नवलकर असे परीक्षक होते.
शनिवार, २५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता, यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे सवाई स्पर्धा होणार असून प्रेक्षकांनी ही स्पर्धा हाऊसफुल्ल देखील केली आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या ७ एकांकिकांना रंगभूमी.com तर्फे मनापासून शुभेच्छा!