सध्या नाट्यप्रेमींमध्ये स्पर्धात्मक मौसम बहरला आहे. स्पर्धा म्हणजे प्रत्येक रंगकर्मीचा जिव्हाळ्याचा विषय! त्यातही एकांकिका स्पर्धा म्हणजे वेगळीच धमाल! स्पर्धेआधीच्या तालमीचे दिवस एक वेगळीच ऊर्जा देऊन जातात. काही नावाजलेल्या स्पर्धांपैकी एक महत्त्वाची स्पर्धा म्हणजे ‘कल्पना एक आविष्कार अनेक’! ‘नाट्यदर्पण’ या संस्थेने सुरू केलेली ही स्पर्धा ‘अस्तित्व’ संस्थेने पुनर्जीवित केली. ‘अस्तित्व’ आणि ‘बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने याही वर्षी ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Kalpana Ek Avishkar Anek 2024 – Ekankika Competition
यंदाचे या स्पर्धेचे २१ वे वर्ष आहे. मान्यवरांनी सुचविलेल्या विषयावर आधारित एकांकिका लिहून ती सादर करणे, ही या स्पर्धेची सर्वसाधारण संकल्पना आहे. यावर्षी, ज्येष्ठ अभिनेते आणि मानसशास्त्रज्ञ मोहन आगाशे यांनी या स्पर्धेसाठी ‘मरणोत्तर आयुष्य’ हा विषय दिला आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला व प्रतिष्ठेला साजेशी अशी अद्भुत कल्पना त्यांनी सुचवली आहे. हा क्लिष्ट विषय स्पर्धक कसा हाताळतात आणि किती विभिन्न धाटणीच्या नाट्यकृती आपल्याला बघायला मिळतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
कल्पना एक आविष्कार अनेक — प्रवेश प्रक्रिया
प्रवेश प्रक्रिया ११ ऑगस्ट, २०२४ पासून सुरू झालेली आहे. स्पर्धेचा प्रवेश अर्ज, नियम व अटी पुढीलप्रमाणे:
अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर घोषित करण्यात आलेली आहे.
अधिक माहितीसाठी ९०८२६३३२८८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
कल्पना एक आविष्कार अनेक ही स्पर्धा रंगकर्मींसाठी खूपच महत्वाची मानली जाते. दरवर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी प्रेक्षकांना कमी दर तिकीटांत बघता येते. यावर्षी ही अंतिम फेरी कुठे, कधी, केव्हा बघायला मिळणार आहे, याबद्दल तपशील लवकरच मिळेल. तोपर्यंत, प्राथमिक फेरीसाठी स्पर्धक संघांना खूप खूप शुभेच्छा!